Tanisha Crasto Has Qualified For Paris Olympics Dainik Gomantak
गोवा

Paris Olympics 2024: गोमंतकीय बॅडमिंटनपटू तनिशा ऑलिंपिकसाठी पात्र; महिला दुहेरीत करणार भारताचे प्रतिनिधित्व

Tanisha Crasto Has Qualified For Paris Olympics: बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो आगामी पॅरिस ऑलिंपिकमध्ये अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अश्विन पोन्नाप्पा हिच्या साथीत भारताचे महिला दुहेरीत प्रतिनिधित्व करेल.

Manish Jadhav

Tanisha Crasto Has Qualified For Paris Olympics: दुबई येथे जन्मलेली गोमंतकीय बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो आगामी पॅरिस ऑलिंपिकमध्ये अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अश्विन पोन्नाप्पा हिच्या साथीत भारताचे महिला दुहेरीत प्रतिनिधित्व करेल. तनिशा 20 वर्षीय असून 2017-18 पासून ती राष्ट्रीय पातळीवर गोव्याचे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. तिचे पालक मूळ गोमंतकीय आहेत. तनिशाने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये ज्युनियर गटात 2016 पर्यंत बाहरीनचे प्रतिनिधित्व केले. तिचे प्रारंभिक प्रशिक्षण दुबईत झालेले आहे. संयुक्त अरब अमिरातीची ती नोंदणीकृत खेळाडू होती.

दरम्यान, तनिशाची महिला दुहेरीतील सहकारी अश्विनी 34 वर्षीय आहे. जागतिक महिला दुहेरी क्रमवारीत अश्विनी-तनिशा जोडीला 20 वा क्रमांक मिळाला असून त्याद्वारे ही जोडी भारताची अव्वल महिला दुहेरी जोडी ठरली आहे. तनिशा हिची ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा ठरेल. अश्विनी तिसऱ्यांदा ऑलिंपिकसाठी पात्र ठरली आहे. पॅरिसमध्ये या वर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत महिला दुहेरीत 16 जोड्या पात्र ठरतील. ऑलिंपिकसाठी पात्रता मिळविलेली अश्विनी-तनिशा ही 12वी जोडी ठरली आहे. ऑलिंपिक पात्रतेसाठी 28 एप्रिलपर्यंतची कामगिरी गृहित धरली जाईल. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अश्विनी-तनिशा जोडीचे आव्हान राऊंड ऑफ 16 फेरीत संपुष्टात आले. मात्र ही मजल गाठल्यामुळे त्यांना भारतीय महिला दुहेरीत अव्वल क्रमांक प्राप्त झाला, तर ट्रीसा जॉली व गायत्री गोपिचंद जोडीला दुसऱ्या स्थानी घसरावे लागले.

राज्य संघटना तनिशाला गौरवणार

ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी तनिशा क्रास्टो 23वी गोमंतकीय क्रीडापटू ठरणार आहे. तिची कामगिरी केवळ राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठीही भूषणावह आहे. गोमंतकन्येचा लवकरच तिचा गोवा बॅडमिंटन संघटनेतर्फे भव्य सत्कार केला जाईल आणि त्यावेळी संघटनेतर्फे तीन लाख रुपयांचा धनादेश देण्याचे नियोजन असल्याची माहिती संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी दिली. राज्य सरकार योजनेमार्फतही तिला ऑलिंपिकपूर्वी आर्थिक मदत प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे हेबळे यांनी नमूद केले.

राज्य सरकारकडून अपेक्षा

तनिशाचे वडील क्लिफर्ड मडगाव येथील असून आई लोटली येथी आहे. व्यावसायिक कारणास्तव क्लिफर्ड कुटुंबासह यूएईमध्ये स्थायिक झाले. त्यांचे नातेवाईक असोल्णे व चिंचोणे येथे राहतात. देशासाठी तनिशाने गौरवास्पद कामगिरी बजावली, परंतु राज्य सरकार दरबारी ती अदखलपात्र राहिल्याने क्लिफर्ड यांनी खंत व्यक्त केली आहे. `गोवा सरकारप्रती मी निराश आहे. तिने राष्ट्रीय, आशियाई पातळीवर स्पर्धा जिंकल्या, परंतु राज्य सरकारकडून एक रुपयाही मिळालेला नाही. माझे संपूर्ण कुटुंब गोमंतकीय आहे,` असे क्लिफर्ड यांनी एका वर्तमानपत्रास दिलेल्या मुलाखतीत नमूद केले.

`ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न तनिशाने जोपासले होते. त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. पात्रतेचा प्रवास खूपच खडतर ठरला. `

-क्लिफर्ड क्रास्टो, तनिशाचे वडील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT