Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील जमशेदपूर एफसीचे आव्हान संपुष्टात आलेले आहे, त्यातच त्यांची कामगिरीही उठावदार नाही. याच पार्श्वभूमीवर जमशेदपूर येथे मंगळवारी (ता. 9) एफसी गोवा संघाला विजयासह प्ले-ऑफ फेरीपूर्वी आत्मविश्वास उंचावण्याची संधी राहील.
दरम्यान, स्पर्धेतील बाकी असलेल्या दोन्ही सामन्यांत विजय नोंदवले, तरीही एफसी गोवा संघाला शिल्ड जिंकणे अवघडच आहे. कारण त्यांना मुंबई सिटी, मोहन बागान, ओडिशा एफसी यांच्या लढतींतील निकालावरही अवलंबून राहावे लागेल. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ मागील पाच सामने अपराजित आहे, तर खलिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर संघाने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे जेआरडी टाटा क्रीडा संकुल मैदानावर एफसी गोवाचे पारडे जड असेल.
दुसरीकडे, एफसी गोवा संघाने 20 सामन्यांतून 39 गुणांची कमाई केली आहे. सध्या ते चौथ्या क्रमांकावर आहेत. फातोर्डा येथे अगोदरच्या लढतीत त्यांनी नोआ सदोई याच्या हॅटट्रिकच्या जोरावर हैदराबाद एफसीचा 4-0 असा धुव्वा उडवला होता. जमशेदपूरच्या विस्कळित खेळाची मालिका कायम राहिल्यास एफसी गोवास स्पर्धेतील 12वा विजय नोंदवणे शक्य होईल. जमशेदपूरचे 21 सामन्यानंतर 21 गुण असून ते दहाव्या स्थानी आहेत. मंगळवारी ते स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना खेळतील.
दरम्यान, तुलनेत जमशेदपूर संघ कमजोर असला, तरी प्रतिस्पर्ध्यांना गृहीत धरण्यास एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ तयार नाहीत. ‘‘त्यांनी मुंबई सिटीविरुद्ध नोंदविलेला विजय अजूनही माझ्या स्मरणात आहे. दोन्ही संघांसाठी सामना कठीणच असेल. आम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. त्यांच्या बचावफळीत चार भारतीय खेळाडू असले, तरी मध्यफळीत सहा खेळाडू कार्यरत असतात याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आयएसएलमधील प्रत्येक सामना खडतर आहे. अगोदरच्या सामन्यात आम्ही तळाच्या संघाविरुद्ध (हैदराबाद एफसी) खेळलो आणि गोलशून्य पूर्वार्धानंतर उत्तरार्धात आम्हाला गोल करण्यासाठी वाट पाहावी लागली. त्या लढतीच्या पहिल्या अर्धात आम्हालाही समस्यांनी भेडसावले होते,’’ असे सामन्याच्या पूर्वसंध्येला एफसी गोवाचे मार्गदर्शक म्हणाले.
‘‘संघाच्या कामगिरीवर मी खूष नाही. मला वाटतं, आम्ही पहिल्या सहा संघांतील जागेसाठी लायक होतो. मी प्रत्येकाला दोष देणार नाही. खेळाडू समर्पित आहेत आणि त्यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे सहा संघांत आमचे स्थान असायला हवे होते.’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.