भाजपात आता गुंड घुसलेले आहेत. होय भाजपात खरोखरच गुंडाराज आहे. हे दुसरा तिसरा कोणी नव्हे आमदार विजय सरदेसाई सांगताहेत. ते म्हणतात, एक वेळ अशी होती जेव्हा भाजपात सभ्य माणसे, महिला, चांगले डॉक्टर, चांगले वकील शिवाय चांगल्या प्रशासनासाठीचे मित्र असायचे. आता भाजपचे परिवर्तन झाले आहे, त्यांना आता गुंडांशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही ते सांगतात. सरदेसाईंच्या सांगण्यात तथ्य असावे, कारण आताच्या व पूर्वीच्या भाजपात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे लोक बोलताहेत. ∙∙∙
सासष्टी आम्हीच काबीज करू अशा थाटात वावरणाऱ्या आम आदमी पक्षाला एक कोलवा वगळता अन्य कुठल्याही मतदारसंघात यश न आल्याने आम आदमी पक्षाने जो फुगा तयार केला हाेता, तो शेवटी फुटला असेच म्हणावे लागेल. बाणावलीचे आमदार वेंन्झी व्हिएगस यांनी कोलवा आणि बाणावली मतदारसंघात आपली संपूर्ण ताकद लावली हाेती. मात्र बाणावली मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. आणि कोलव्यातही जो विजय मिळाला तो निसटता असाच होता. आम्हीच भाजपाला पर्याय अशा फुशारक्या मारणाऱ्या आम आदमी पक्षाचे या निवडणुकीने पूर्णपणे वस्त्रहरण केले, असे म्हटल्यास ते वावगे ठरेल का? ∙∙∙
प्रचारात शहांजान आणि गद्दारीचे आरोप एकमेकांवर केले करण्यात आले, स्वाभिमानी आणि अभिमानी मतदारांचे गुणगान गावडे यांनी सातत्याने गायले, पण तोच सूर सुनील जल्मी यांनी एकाही नेत्याशिवाय सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसमोर लावला नाही. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आणि हजारोंच्या आघाडीने ते निवडणूक जिंकले. या मतदारसंघात उमेदवार श्रमेश भोसले बाजूलाच राहिले, मतदान झाले ते गावडेंविरोधात झाले. गावडे नको, म्हणून सुनील जल्मींना प्रत्येक प्रभागात आघाडी मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत नेत्याविरोधात कार्यकर्त्यांनी बाजी मारली! ∙∙∙
खोर्ली मतदारसंघात विजयाचा ‘नारळ’ फुटला. भाजपचे उमेदवार सिद्धेश नाईक यांनी या लढतीत बाजी मारत राजकीय मैदानात आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली. गोवा फॉरवर्डने त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला होता. प्रचारात टीकेचे बाण सुटले, शब्दांचे रण पेटले; विजय सरदेसाई यांनीही या लढतीला धार चढवली. भाजपवर आक्रमणांची सरबत्ती झाली, आरोप–प्रत्यारोपांचे वादळ उठले. मात्र, निकालाच्या दिवशी सर्व गणिते कोलमडली. विश्वास अजूनही सिद्धेश नाईक यांच्यावरच असल्याचे मतदारांनी स्पष्ट केले. सिद्धेशसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती, त्यामुळेच विजयानंतर कार्यकर्त्यांनी आणलेले ओले नारळ फोडून त्यांनी विजयोत्सव साजरा केला. गोवा फॉरवर्डचे आव्हान आपण सहज पेलल्याचे त्यांनी शब्दांत नव्हे, कृतीतून दाखवून दिले. ∙∙∙
प्रदेशाध्यक्ष म्हणून ताबा घेतल्यानंतर मंत्र्यांवर झालेल्या आरोपामुळे आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या वारंवार झालेल्या दिरंगाईमुळे प्रदेशाध्यक्ष नाईक यांच्यापुढे अडचणीचा डोंगर उभा राहिल्यासारखाच प्रकार होता. परंतु माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, खासदार तानावडे यांच्या संगतीने नाईक यांनी कार्यकारिणीत व पक्षाच्या कामातील खाणाखुणा ओळखल्या. त्यानुसार त्यांनी आव्हाने परतवून लावली आणि पहिल्याच झेडपी निवडणुकीत पक्षाला दणदणीत यश मिळवून दिले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली तरी प्रदेशाध्यक्षांचीही जबाबदारीही मोलाची राहिली आहे. या यशामुळे जनतेने भाजपवर विश्वास ठेवल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पुढील पालिकां निवडणुकीपर्यंत नाईक यांची ‘कॉलर’ निश्चित ‘टाईट’ राहील, यात शंका नाही.
प्रियोळ मतदारसंघात माजी मंत्री गोविंद गावडे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. बेतकी-खांडोळा, भोम-अडकोण, तिवरे-वरगाव पंचायती त्याच्या समर्थकांकडून विरोधकांनी हिसकावून घेतल्या. गावडेंनी अनेक प्रयत्न केले, पण पंचायतीवर सत्ता टिकवता आली नाही. मगो समर्थकांनी भाजपच्या एका गटाच्या सहकार्याने नियोजनबद्ध धक्के दिले आणि आत्ता जिल्हा पंचायतीत त्यांच्या समर्थक भाजपचे श्रमेश भोसले यांचा दारूण पराभव केला. हा पराभव एक प्रकारे गावडेंचाच झाला. यामागेही भाजप-मगोचे कार्यकर्तेच होते. प्रचारात ते नेटाने उघडपणे वावरले, पण त्यांच्यावर मगो-भाजप नेत्यांचे नियंत्रण नव्हतेच. गावडे पायाला भिंगरी लावून फिरले, पण अखेर त्यांच्या तत्वांचाच पराभव झाला. ∙∙∙
‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशी हिंदीत एक म्हण प्रचलित आहे.गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्या घरच्या मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार मराठे यांचा दारूण पराभव झाला.आता अमित आपल्याच घरच्या मतदारसंघात जर झेड पी निवडून आणू शकत नसेल, तर विधानसभेत आमदार कसे निवडून आणणार? असा प्रश्न अमित पाटकर यांचे घरचे शत्रू विचारणारच. युरी आलेमाव, एल्टन, काँग्रेसचे जिल्हा समितीचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी आपले गड राखले. मात्र, अमित पाटकर ज्या उमेदवाराला घेऊन घरोघरी फिरले, तो हरला. आता काँग्रेस पक्षातील अमित विरोधकांना त्यांच्यावर कुरघोडी करण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे, असे म्हणावे लागेल. ‘मागतल्याक मागतलो सोसंना’ असे म्हणतात ते खरे ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.