Curti Ponda ZP seat dispute: गोवा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) अखेर आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शनिवारी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी 'गोमन्तक'शी बोलताना यादी रविवारी (दि.३१) जाहीर करण्याची माहिती दिली होती. त्यानुसार, भाजपच्या १९ उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. जनसंपर्क, जिंकण्याची क्षमता, पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणा या निकषांवर उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे दामू नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी दामू नाईक यांनी जाहीर केले की, भाजप सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला (मगो) एकूण ५० पैकी तीन जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या जागावाटपावरून भाजप आणि मगो यांच्यातील युतीत उघड संघर्ष निर्माण झाला आहे. विशेषतः कुर्टी-फोंडा मतदारसंघावरून मगो पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कुर्टी-फोंडा मतदारसंघात भाजपने युतीचा उमेदवार न देता स्वतःचा उमेदवार उभा केल्याने मगो पक्षाचे नेते केतन भाटीकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाटीकर यांनी स्पष्ट केले की, कुर्टी-फोंडा ही पारंपारिकरित्या मगो पक्षाची जागा आहे आणि या जागेवर भाजपने उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न करणे आश्चर्यकारक आहे. 'भाजपने या जागेवर युतीचा उमेदवार का उभा केला नाही, हे आम्हाला कळत नाही,' असे भाटीकर म्हणाले.
केतन भाटीकर यांनी यावेळी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. 'आम्ही भाजपच्या राजकीय दबावापुढे झुकणार नाही,' असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांनी जाहीर केले की, मगो पक्ष कुर्टी-फोंडा मतदारसंघात आपला स्वतंत्र एसटी (ST) उमेदवार उभा करणार आहे आणि हा मतदारसंघ जिंकण्याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे.
भाटीकर यांनी पक्ष कार्यकर्त्यांना 'पक्षाला बळकट केले पाहिजे' असा संदेश दिला आणि पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्याला पाठिंबा देतील, अशी आशा व्यक्त केली. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी फोंडा पोटनिवडणूकही लढवण्याची घोषणा केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.