काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या तीन पक्षांतील युतीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असतानाच आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी गुरुवारी ‘सोशल मीडिया’द्वारे मारलेल्या काही ‘बाणां’मुळे काँग्रेस आणि आरजीपीतील दरी काही प्रमाणात मतदारांना दिसून आली. ‘आगीशी खेळू नका’, ‘हा खाणींसाठीचा करार हे लोकांना माहीत आहे’, ‘जेव्हा नेता खोटे बोलतो तेव्हा पक्ष संघटनेसह विश्वासही मरतो’ असे म्हणत परब यांनी मनातील खदखद सोशल ‘मीडिया’द्वारे बाहेर काढली. काँग्रेसमधील एक गट आरजीपीला संपवू पाहत आहे. त्यामुळेच ते आमच्याशी युतीबाबत बोलत नाहीत, असे परब यांनी बुधवारीच म्हटले होते. त्यामुळे गुरुवारी ते कोणत्या गटावर तुटून पडले? त्या गटाचे प्रमुख कोण? हे वेगळे सांगण्याची गरज नाही... ∙∙∙
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सध्या घाईत आहेत. एकतर ते बैठकीत असतात किंवा उमेदवार उमेदवारी अर्ज सादर करताना उपस्थित असतात. ते आपल्या मतदारसंघात यावे असे प्रत्येक आमदाराला वाटते. त्यामुळे सध्या दामू यांची मागणी वाढली आहे. त्यांना राज्यभर प्रवास करावा लागत आहे. उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करतील पण त्याआधी दामू यांना राज्यभर फिरावे लागत आहे. हे सगळे सांभाळून प्रदेश निवडणूक समितीच्या बैठका घेत उमेदवार निश्चितीवर मोहोर उमटवावी लागत आहे. जिल्हा
पंचायत निवडणुकीत विरोधकांच्या फाटाफुटीमुळे भाजपच्या यशाचा आलेख उंचावेल. अर्थात दामू यांना त्याचे श्रेय मिळेलच... ∙∙∙
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत दिल्लीला गेले. मंत्री म्हटल्यावर दिल्लीवारीचे काय अप्रुप असा प्रश्न पडू शकतो. मात्र, कामत आपल्या व्याह्यांसह सहकुटुंब दिल्लीला गेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून वाटचाल करणारे कामत यांची पंतप्रधानांशी काय चर्चा झाली हे समजण्यास मार्ग नसला तरी कामत यांनी सकारात्मकतेचाच संदेश तेथेही दिला असेल यात शंका नाही. हा कौटुंबिक दौरा होता, असे मानले तरी पंतप्रधानांच्या भेटीमुळे त्याला महत्व प्राप्त झाले. कामत यांचे राजकीय वजन वाढण्यास या भेटीचा निश्चितच उपयोग होईल असे दिसते. ∙∙∙
खोर्ली मतदारसंघात विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य सिद्देश नाईक यांच्या समोर गोवा फॉरवर्डने आव्हान उभे केले आहे. गेल्या अनेक दिवसापासून विक्रम यांनी प्रचाराला सुरूवात केली असून विजय सरदेसाई यांनीही दोन-तीन वेळा मतदारसंघात दौर केला. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. सिद्देशच्या सोबतीला खुद्द आमदार राजेश फळदेसाई धावून आले असून त्यांनी श्री शांतादुर्गेच्या प्रांगणातच त्यांना निवडून आणण्याचा शब्द दिला, तोही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या समक्ष त्यामुळे सिद्धेशला दहा हत्तीचे बळ प्राप्त झाले, अशी चर्चा मतदारांत सुरू आहे. कदाचित राजेश-सिद्धेशच्या एकत्र जोडीमुळे आव्हान परतवून लागेल, अशा विश्वास समर्थकांत व्यक्त होत आहे. ∙∙∙
पणजी महानगरपालिकेत बाबूश मोन्सेरात यांच्या भाजप आघाडीच्या गटातील नगरसेवकांना आगामी २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, हे आताच सांगता येणार नाही. आमदार मोन्सेरात यांनी प्रत्येक नगरसेवकाचे कार्डच तयार करण्यासाठी आपल्या खास हस्तकांकरवी माहिती गोळा करण्यास सुरवात केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महानगरपालिकेतील उमेदवार हे बाबूश मोन्सेरातच ठरवतात, त्यात पक्षाचा कोणताच हस्तक्षेप नसतो. ते देतील तोच उमेदवार निश्चित असतो. आत्तापर्यंत सत्ताधारी गटातील बोटावर मोजणाऱ्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात होते. पण आता आमदारांनी काही पत्तेच फिरवल्याने या नगरसेवकांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. आमदारांच्या कार्यालयातील सूत्रांकडून प्राप्त माहितीतून याला अधिकच दुजोरा मिळत आहे. ∙∙∙
‘सांडिले पाडिल्ले गोरुं काँग्रेसच्या गोठ्यांत’ अशी म्हण आता ‘सोशल मीडिया’वर गाजत आहे. पक्ष बदलू गद्दारांना काँग्रेसची दारे बंद! पक्षांतर केलेल्यांना काँग्रेस पक्षांत स्थान नाही, असा दावा करणाऱ्या काँग्रेसने आता राजकीय गद्दारांना ‘ओपन आर्म एन्ट्री’ देण्यास सुरवात केली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने इजिदोर फर्नांडिस यांना पक्षात घेतल्यानंतर विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी मोठा संताप व्यक्त करून आपला पक्ष पक्षांतराच्या विरोधात असल्याचा दावा केला होता. मात्र खुद्ध युरीनेच भाजपात राहून जिल्हा अध्यक्षपद भूषविलेल्या संजना व भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष संजय वेळीप यांना काँग्रेस पक्षात घेऊन ‘मास्टर स्ट्रोक’ मारल्याचा दावा केला जात आहे. युरीबाब आपण ‘रिजेक्टेड’ माल खरेदी केला असल्याची टीका आता आम जनता करायला लागलीय त्याचं काय?. ∙∙∙
भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीत ८० टक्के नवे चेहरे देण्याचे ठरवून प्रस्थापितांना सूचक इशारा दिला आहे. प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक आल्यानंतर भाजप पक्ष संघटनेच्या जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत त्यांनी संघटनात्मक फेरबदल केले. मंडळ अध्यक्ष निवडतानाही वेगळे धोरण अवलंबले. आताही उमेदवार निश्चितीवेळी केवळ आमदाराच्या शिफारशीवर उमेदवारी देणे टाळले आहे. वर दिलेला उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमदारावर दिली आहे. जिल्हा पंचायतीचा कित्ता भाजप विधानसभा निवडणुकीत गिरवल्यास काय अशी चर्चा त्यामुळे आतापासूनच सुरू झाली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.