

दक्षिणेची सून उत्तरेची ‘झेडपी’ उमेदवार!
‘ताकाला जाऊन भांड लपवण्यात काय अर्थ!, असा एक वाक्प्रचार आहे. काँग्रेस पक्षातून भाजपात आलेले काही आमदार व कार्यकर्ते आजही भाजपचा मफलर गळ्यात घालायला लाजतात हे सत्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईकही नाकारू शकत नाहीत. भाजपच्या कळंगुट जिल्हा पंचायत मतदार संघाच्या उमेदवार फ्रेंझिया रॉड्रिगीश यांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे.भाजपाचे कार्यकर्ते व स्वतः कळंगुटचे आमदार भाजपच्या ‘झेडपी’ उमेदवाराला घेऊन मते मागण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. मात्र, या प्रचाराच्यावेळी आमदार व भाजप कार्यकर्ते गळ्यात मफलर घालण्याचे टाळतात. काही कार्यकर्त्यांनी या संदर्भात विचारणा केली असता ती पक्षाची ‘स्ट्रेटेजी’आहे, असे उत्तर मिळाल्याचे सांगण्यात येते. मूळ भाजप कार्यकर्ते मात्र प्रचारात भाग घेताना क्वचित दिसतात. पक्षाने उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या कळंगुट ‘झेडपी’ची उमेदवारी दक्षिणेतील सुनेला दिल्यामुळे पक्ष कार्यकर्ते म्हणे नाराज आहेत. आता पाहूया मायकल लोबो ही नाराजी कशी कमी करतात ते!
‘तो’ गट कोणता?
सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय रिव्हॉल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने घेतला. त्यानुसार आरजीचे अध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांनी काँग्रेस नेत्यांशी बैठकाही सुरू केल्या. परंतु, युतीवर शिक्कामोर्तब होण्याआधीच काँग्रेसने आपल्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने परब आणि बोरकर यांच्या ‘तळपायाची आग मस्तकात’ गेली. काँग्रेसमधील एका गटाला ‘आरजी’शी युती नको आहे. हा गट ‘आरजी’ला संपवू पाहत असल्याची प्रतिक्रिया ‘आरजी’चे काही नेते खासगीत बोलताना व्यक्त करीत आहेत. त्यामुळे असा निर्धार केलेला काँग्रेसमधील ‘तो’ गट कोणता? त्याचे नेतृत्व कोण करीत आहे? असे सवाल अनेकांना पडले आहेत.
रुपेश देसाईला धारबांदोड्याची लॉटरी!
प्रयत्न केले तर फळ मिळतेच, असे म्हणतात ते खरे. कॅटरिंग उद्योगांत नाव कमावलेले भाजपचे युवा कार्यकर्ते रुपेश देसाई यांना भाजपची धारबांदोडा मतदार संघाची ‘झेडपी’उमेदवारी मिळाली आहे. साईभक्त असलेल्या रुपेश देसाईंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आम्ही याच सदरात व्यक्त केली होती. रुपेश देसाई यांनी पंच म्हणून या पूर्वी राजकीय योगदान दिले होते. उमेदवारी मिळाली म्हणजे ‘झेडपी’ ची निवडणूक जिंकले असे थोडेच आहे; त्यांना बराच घाम गाळावा लागणार हे निश्चित.
दवर्लीत सत्यविजय नाईक?
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपने आपले १९ उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित ३१ उमेदवार लवकरच जाहीर केले जातील, अशी शक्यता असली तरी दवर्लीत उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दल सर्वानाच कुतूहल आहे. विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक किंवा नावेली भाजप मंडळाचे अध्यक्ष विजय सुरमे यांच्यात चुरस असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता भाजपने धक्कातंत्र अवलंबून नावेलीतील भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष सत्यविजय नाईक यांच्या गळ्यात माळ घालण्याचे ठरविल्याचे कळते. मध्यंतरी नाईक ‘आप’, ‘मगो’ मध्ये जाऊन आले. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत ते वाळपईत ‘आप’चे उमेदवार होते, दवर्लीतून त्यांनी या पूर्वी निवडणूक लढवली आहे. २०१५ साली ते नावेलीचे विद्यमान आमदार उल्हास तुयेकर यांच्या विरोधात लढले. २०१७ मध्ये ते ‘मगो’च्या उमेदवारीवर नावेलीत विधानसभा निवडणूक लढले. सांगायचे काय तर राजकारणात नेमके कुणाला कशी व का संधी मिळेल हे सांगता येणार नाही, असेच बोलले जाते. नावेलीत मात्र, भाजप ओबीसी महिला उमेदवार मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे, अशी चर्चा सुरू आहे.
‘मास्टर ब्लास्टर’ गोव्यात
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर बुधवारी काही तासांसाठी गोव्यात आला होता. हा त्यांचा वैयक्तिक दौरा असल्याने संपूर्ण भेटीबाबत गोपनीयता पाळण्यात आली. तरीही काही अतिउत्साही चाहत्यांमुळे तेंडुलकर गोव्यात आल्याची माहिती थोड्याच वेळात बाहेर पसरली. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या गोवा क्रिकेट संघातून खेळत असल्याने सचिन त्याच्या भेटीसाठी आला होता, अशी माहिती त्यांच्याच जवळच्या मित्रांकडून सर्वश्रूत झाली. दक्षिण गोव्यातील एका शांत परिसरात त्यांनी स्थानिक मित्रांसोबत काही निवांत क्षण घालवले. गोवा हे सचिन तेंडुलकर यांचे आवडते ठिकाण असून, वेळ मिळताच ते इथल्या शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठी जीवाचा गोवा करण्याची ‘टूर’ आखतात. यावेळीही अल्प नियोजनातच त्यांनी गोव्याचा हा झटपट दौरा पूर्ण केला.
धक्का इजिदोरला की गोवा फॉरवर्डला?
गोवा फॉरवर्डने काणकोणचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस यांना पक्षात प्रवेश देण्यामागे जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवार प्रशांत नाईक यांना निवडून आणण्यास सहकार्य करावे हा हेतू होता. पण आता इजिदोर यांचे अगदी जवळचे कार्यकर्ते शैलेश पागी यांनी पैंगीणमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केल्याने हा धक्का इजिदोरला की गोवा फॉरवर्ड पक्षाला, अशा चर्चेला ऊत आला आहे. आपण माजी सरपंच होतो, लोकांची सेवा केली आहे व अजूनही करीत आहे, अशी कारणे पागीबाब देतीलच. पण आपली अपक्ष उमेदवारी जाहीर करण्यामागचे हेच एक कारण असू शकेल का? की त्याला काणकोणमधील बड्या राजकारण्याने आमिष दाखवून आपल्या बाजूने तर ओढलेले नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अपेक्षितच!
कॅश फॉर जॉब प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिच्यावर बूमरॅंग होणार हे माहीतच होते. मंत्री, सरकारी अधिकारी सुटतील, हे भविष्य जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता, तेव्हाच सर्वांना कळाले होते. कारण लोकशाहीत मंत्री, सरकारी अधिकारी यांच्याकडून कधी चुकाच होत नसतात. ‘बॉस इज ऑलवेज राईट’ या उक्तीप्रमाणे सर्व काही चालत असते. पोलिसांना मंत्री व सरकारी अधिकाऱ्यांविरोधात काहीच पुरावे सापडले नाही व ते सापडणारही नव्हते, असे बोल सर्वांच्याच तोंडी ऐकू येतात. पोलिसांनी मात्र चांगली शक्कल लढवली. मंत्री व अधिकाऱ्यांना या प्रकरणातून बाहेर काढून पूजा नाईककडून ते पैसे वसूल करणार. म्हणजे ज्यांच्या विरोधात पुरावे सापडले नाहीत, ते आता पूजाकरवी ज्यांच्याकडून नोकरीसाठी पैसे घेतले ते त्यांना परत करणार. म्हणजे काही दिवसांनी पूजाने सर्व रक्कम फेडली की, तिची सुद्धा यातून सुटका होईल. ‘मेरी भी चूप, तेरी भी चूप’ अशातलाच हा प्रकार, असे सुद्धा लोक आता बोलू लागलेत.
‘ती’ धमकी?
‘कॅश फॉर जॉब’मधील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने या प्रकरणात नावे घेतलेल्या आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना क्राईम ब्रांचने मंगळवारी ‘क्लिनचिट’ दिली. या दोघांनी आपण दिलेले पैसे परत न केल्यास ॲड. अमित पालेकर यांच्या मदतीने त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा पूजाने आधीच दिलेला होता. त्यामुळे क्राईम ब्रांचच्या भूमिकेनंतर पूजा निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर यांच्याविरोधात न्यायालयात जाणार? की ती तिची केवळ धमकी होती? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे ना?
बाबूंचे पेडण्यात आव्हान
विधानसभा निवडणुकीत पेडण्यातून उमेदवारी नाकारल्याने मडगावला जावे लागलेले माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याचे पेडणे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. आपण २०२७ मध्ये पेडण्यातून लढणारच, अशी त्यांची घोषणा आता जुनी झाली असली तरी त्यांनी आता जिल्हा पंचायत निवडणुकीत आपली ताकद आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची आपणास गरज नाही, असे वक्तव्य केल्याच्या २४ तासात बाबू यांनी दंड थोपटले आहेत. एका बाजूने राजन कोरगावकर यांनी आर्लेकर यांच्यासमोर आव्हान उभे केल्यानंतर आता बाबू यांनी आज गुरुवारी वझरी येथे समर्थकांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत उमेदवार ठरवणार असल्याचे बाबू यांनी म्हटल्याने त्यांनी आव्हान उभे करायचे ठरवल्याचे दिसते.
आमदारांचे उमेदवार कधी होणार जाहीर?
‘चॅरिटी बिगीन्स ॲट होम’असे इंग्रजीत एक बोधवाक्य आहे. काँग्रेसने ११ ‘झेडपी’ उमेदवारांची यादी जाहीर केली. आता या यादीत संभाव्य युतीतील घटक पक्षांचे मतदार संघ येत असल्याने न झालेली आघाडी तुटणार, अशीही चर्चा आहे. मात्र काँग्रेसने आपले आमदार असलेल्या मतदारसंघातील ‘झेडपी’ उमेदवार पहिल्या यादीत का जाहीर केले नाहीत? असा प्रश्न आता कार्यकर्ते विचारू लागलेत.विरोधी पक्षनेते युरी, आमदार एल्टन व आमदार कार्लूस यांच्या मतदारंघात सहा झेडपी मतदारसंघ येतात. तिघांनीही आपल्या मतदार संघातील झेडपी उमेदवार प्रथम जाहीर करून एक उदाहरण घालून देणे गरजेचे होते.मात्र, काँग्रेसने जी पहिली यादी जाहीर केली, त्यात बहुतांश उमेदवार विरोधी आमदारांच्या मतदार संघात येतात. ‘आरजी’ व ‘आप’चे आमदार जिथे आहेत, तेथील उमेदवार पाहिल्या यादीत येण्यामागचे गणित अनाकलनीय आहे, असे आम्ही नव्हे कार्यकर्तेच म्हणू लागलेत! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.