गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?
‘यू कॅन फूल सम ऑफ दी पीपल सम टाईम, यू कॅनॉट फूल ऑल पीपल ऑल दी टाईम’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. आपले राजकारणी जनतेला मूर्ख समजतात. मात्र जनता मूर्ख नसते हे आपल्या राजकारण्यांना समजणार तो भाग्याचा दिन म्हणावा लागेल. गिरदोली जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होत असल्याचा दावा मतदार करतात. काँग्रेस पक्षाने भाजपच्या माजी मंडळ अध्यक्षाला उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात कमळाला जास्त मते मिळोत, किंवा हातावर जास्त शिक्के पडोत विजय भाजपचाच असणार, असा दावा मतदार करतात. रात्री वाट चुकलेला उजेड झाल्यावर घरीच परतणार, अशा शब्दांत नेटिझन गिरदोली झेडपी निवडणुकीचे विश्लेषण करीत आहेत. एकूण या मतदारंघात भाजपसाठी ‘विन विन’ स्थिती असल्यामुळे ‘भिवपाची गरज ना’ असे भाजपवाले म्हणू लागले आहेत.
आणखी कोण कोण?
पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष संजना वेळीप यांच्यासह दहा जणांची भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नुकतीच पक्षातून हकालपट्टी केली आणि पक्षाच्या विरोधात जो जाईल, त्याच्यावर अशीच कारवाई होईल, असा सज्जड दमही या कारवाईच्या माध्यमातून इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिला. या दहा जणांवरील कारवाईमुळे प्रदेश भाजपात अंतर्गत बरीच खळबळ माजलेली आहे. दामूंनी कारवाईचे हत्यार उगारल्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणाऱ्यांच्या त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात आणखी कुणाकुणावर हे हत्यार उगारले जाणार? याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
संगीत मानापमान !
‘एकाने दुसऱ्यास गिळावे दुसऱ्याने तिसऱ्यास, हाच जगाचा न्याय खरा हीच जगाची परंपरा’ असे मराठीत एक बोधवाक्य आहे. कुडचडे मतदारसंघात आपले राजकीय अस्तित्व घडविण्यासाठी व टिकविण्यासाठी दोन नेते लढत आहेत. आमदार नीलेश काब्राल यांचे स्थान घेण्यासाठी रोहन देसाई अथक प्रयत्न करीत आहेत. कुडचडे पालिका क्षेत्रात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात दोघांत स्पर्धा लागली आहे.काब्राल समर्थक आयोजित चंदेरी मेळाव्यास आयोजनासाठी पालिकेने परवानगी दिली. आपल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे काब्राल विरोधक आक्रमक झाले आहेत. पालिकेने पैसे घेऊन चंदेरी कार्यक्रमाला परवानगी दिल्याचा आरोप मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडावर म्हणे काब्राल विरोधकांनी केला. चंदेरी बरोबर काब्राल विरोधक आपला स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वावरताना दिसतात. आता पाहूया कुडचडेच्या युवकांना कोण खुश करतो?
राजकीय गणितांची उलथापालथ...
राजकीय पटावर सध्या आकडेमोड बदलत असल्याची चर्चा जोरात आहे. काहींचा सूर, आम्ही मूळचे, घाम गाळलेले कार्यकर्ते; पण उमेदवारी मात्र आमच्यापर्यंत आलीच नाही, तर काहींचा राग अजूनच खोल आहे. काल ज्यांनी पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी दिवसरात्र ताकद लावली, त्यांनाच आज पक्षाची उमेदवारी! अशी चर्चा विशेषतः चहाच्या टपरीपासून ते विद्वानांच्या बैठकीपर्यंत रंगू लागली आहे. नाराजीला थोडा मिश्किल, थोडा टोमण्यांचा रंग चढला आहे. ‘नेते जास्त झाले की, गणित बिघडणारच,’ असे म्हणत काहीजण हसून विषय टाळत आहेत, तर काहीजण मात्र हिशेब वही उघडून बसले आहेत. आता प्रश्न एकच, हा सावळा गोंधळ भाजपसाठी फायदेशीर ठरणार की, विरोधकांना आयती संधी देणार? सध्या तरी ही चर्चा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
..म्हणून टीका नाही?
जिल्हा पंचायत निवडणुकीत उतरलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचार सभांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते विरोधी काँग्रेसवर कमीतकमी टीका करीत आहेत आणि गेल्या तेरा वर्षांत भाजप सरकारने राज्यात केलेली विकासकामे, आणलेल्या योजनांवर भर देत आहेत. त्यामुळे अनेक भागांतील मतदारांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पण, आप आणि आरजीपी हे दोन पक्ष काँग्रेससोबत युती करण्यापासून अलिप्त राहिल्याने मते कुणाची फुटणार आणि विजय कुणाचा होणार, हे भाजप नेत्यांना माहीत असल्यामुळेच काँग्रेसला किंमत देण्याचे ते टाळत असल्याची चर्चाही मतदारांत सुरू आहे.
जामिनाचा महामार्ग की ‘शॉर्टकट’?
गोव्यात असा सूर आहे की, लुथरा बंधूंचा जामीन ही कायदेशीर प्रक्रिया नसून जणू एखादा ‘हायवे प्रोजेक्ट’च आहे. दिल्लीतून सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील, त्यांच्यासोबत सहाय्यकांची फौज आणि गोव्यात स्थानिक वकिलांची जोड पाहता अस वाटतंय की, जामिनासाठी सत्र न्यायालय नव्हे तर संयुक्त राष्ट्र परिषदच भरतेय! इतकी मोठी कायदेशीर तयारी म्हणजे जामीन नक्कीच ‘लवकर’ मिळणार, अशीही चर्चा रंगतेय!
अन्य बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई कधी?
उत्तर गोव्यातील काही क्लब हडफडे दुर्घटनेनंतर बंद केल्यावर दक्षिण गोव्यात काब द राम येथील केप गोवा हे रिसॉर्ट बंद करुन दक्षिण गोव्यातही आम्ही काही कमी नाही हे दाखविण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. वास्तविक केप गोवाला सुरुवातीला आठ बाय अठराचा साधा शॅक घालण्याची परवानगी पर्यटन खात्याने दिली होती. पण राजकीय बॉसच्या आशिर्वादाने तिथे ११ कॉटेजीस्चे रिसॉर्ट उभे झाले. काब द राममध्ये फक्त केप गोवाच बेकायदेशीर आहे असे नव्हे तर जवळपासची आणखी काही रिसॉर्टही अशीच बेकायदेशीररित्या बांधलेली आहेत. त्यातील काही केप गोवालाही वरचढ ठरु शकतील. तरीही या आस्थापनांवर अजुनही कारवाई का बरे हाेत नाही0 यावर कुणी उत्तर देईल का?
पाटकरांचा दावा खरा?
राज्यात २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसकडून येत्या शनिवारी होणारी जिल्हा पंचायत निवडणूक रंगीत तालीम म्हणून लढवण्यात येत आहे. दोन्हीही पक्ष या निवडणुकीच्या माध्यमातून आपापल्या पक्षांच्या सद्यस्थितीतील बळाचा अंदाज घेणार आहेत. या दोन्हीही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष प्रचारा दरम्यान एकमेकांवर तुटून पडत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी तर बुधवारच्या पत्रकार परिषदेत बोलताना, भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच त्यांना जिल्हा पंचायतीसारख्या निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांना उतरवावे लागल्याचा दावा केला. पाटकरांच्या दाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष जोरदार प्रत्युत्तर देतीलच. पण, गेल्या काही महिन्यांत राज्यात घडलेल्या घटना पाहता पाटकरांच्या या दाव्यात तथ्य असल्याचा कयास मतदार बांधत असल्याचीही चर्चा सुरू आहे.
‘निवडणूक रद्द’चे पत्रक चर्चेत
गोवा विद्यापीठाने काल अकस्मित उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रक जारी केले परंतु हे पत्रक अशा पद्धतीने काढले की, ते बनावट असल्याचे, विद्यार्थ्यांना भ्रमित करण्यासाठी कोणीतरी व्हायरल करत आहे असे वाटले कारण, हे पत्रक गोवा विद्यापीठाच्या ‘लेटर हेड’वर नव्हते केवळ अधिकाऱ्याची सही आणि अधिकाऱ्याचे नावही चुकविले होते. त्यामुळे या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना साधे पत्रक कसे काढावे, हे कळत नाही ते गोव्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार तो काय करतील? अशी टीका सध्या होत असून मागील दोन-तीन वर्षांत पार विद्यापीठ प्रशासनाकडून अभिमानाने मान वर काढावी, अशा प्रकारची एकही कृती घडत नसल्याचे बोलले जात आहे.
उपांत्य की अंतिम सामना?
जिल्हा पंचायत निवडणूक उपांत्य की अंतिम सामना या वरून सत्ताधारी व विरोधकांत वाद सुरू झाला आहे. आज मडगावात नाट्य कलाकार व समाज कार्यकर्ता राजदीप नायक यांनी सांगितले की ‘झेडपी’ निवडणूक हा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा उपांत्य सामना आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सांगतात की, आमच्यासाठी कुठलीही निवडणूक अंतिम सामनाच आहे. आता जिल्हा पंचायत निवडणूक उपांत्य की अंतिम सामना हे लोकच ठरवतील .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.