पणजी : किनारपट्टी परिसरातून ड्रग्ज व्यवहार शैक्षणिक संस्थांच्या आवारापर्यंत पोहोचला असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात ड्रग्जचा फैलाव होण्यास सरकार जबाबदार आहे. गोमेकॉ वसतिगृहातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या (इटर्न) खोलीत गांजा सापडल्याचा दावा करण्यात आला असला, तरी पोलिसात अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे हकालपट्टी केलेल्या 5 इंटर्नना बळीचा बकरा करण्यात आला आहे. त्यांच्या हकालपट्टीचा आदेश मागे घेण्याची मागणी गोवा प्रदेश युथ काँग्रेसने केली आहे.
बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळ डीनच्या कार्यालयाबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर म्हणाले की, गोमेकॉ वसतिगृहात इंटर्न विद्यार्थ्यांकडून ड्रग्जसह ओल्या पार्ट्या होत होत्या. मात्र, त्याची गंभीर दखल कधी घेण्यात आली नव्हती व त्याविरुद्ध कारवाईसाठी पावले उचलण्यात आली नव्हती. ड्रग्ज वसतिगृहात पोचतात यावरूनच गोमेकॉ प्रशासन तसेच गृह खाते यंत्रणा कुचकामी ठरली आहे. डॉक्टरीसारख्या पेशामध्येही ड्रग्ज पोचल्याने मुख्यमंत्री या गंभीर प्रकाराकडे बेदखल असल्याचा पर्दाफाश झाला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा करणारे आता शैक्षणिक क्षेत्रापर्यंत पोचल्याचे उघड झाले आहे. या वसतिगृहापासून कुजिरा शिक्षण संकुलातील हायस्कूल जवळच आहे. त्यामुळे तो शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यास वेळ लागणार नाही, असा आरोप म्हार्दोळकर यांनी केला.
गोमेकॉ मुलांच्या वसतिगृहात सापडलेला गांजा हा तेथील सार्वजनिक शौचालयात सापडल्याचे अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे तर या 5 इंटर्नना त्यांच्याकडे गांजा मिळाल्याचा ठपका ठेवून तेथून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे या इंटर्नना बळीचा बकरा करू नये व त्यांच्या हकालपट्टीचा आदेश मागे घ्यावा अशी मागणी एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी त्यांनी केली.
गोमेकॉ वसतिगृहात ड्रग्ज पोचणे ही धोक्याची घंटा आहे. यावरून राज्यातील गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे हा गांजा तेथील इंटर्न विद्यार्थ्यांपर्यंत पोचला कसा याची सखोल चौकशी व्हायला हवी. सरकारचे प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे ते यावरून दिसून येत आहे. सध्या जो ड्रग्ज सापडला आहे तो हिमनगाचा छोटा भाग आहे. ड्रग्ज, कसिनो व वेश्या व्यवसायामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, असे प्रदेश युथ काँग्रेसचे सरचिटणीस अर्चित नाईक यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.