Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; एल्टनच्या कार्यक्रमास चक्क मुख्यमंत्री!

Khari Kujbuj Political Satire: काहींच्या मते हा नेता शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून विद्यापीठावर दबाव आणण्यासाठी त्याने आपले वजन वापरले आहे असेही बोलले जाते.

Sameer Panditrao

एल्टनच्या कार्यक्रमास चक्क मुख्यमंत्री!

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा हे केपे मतदारसंघातील विकासकामांसाठी धडपडत असतात. मात्र, त्यांच्या कामात माजी आमदार मोडता घालतात असा सर्रास आरोप होतो. त्यांनी आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असू नये यासाठीही प्रयत्न होतात. मात्र, काल रविवारी बेतूल येथे नवीन पंचायतघराच्या उद्‍घाटनाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुद्दामहून उपस्थिती लावली. मडगाव येथे शिमग्याच्या मिरवणुकीला उपस्थिती लावायची असतानाही मुख्यमंत्री बेतूल येथे आले. एव्हढेच नव्हे, तर माजी मंत्री प्रकाश वेळीप हेही उपस्थित होते. असे सांगितले जाते की, मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये यासाठी म्हणे कालही प्रयत्न झाला होता. मात्र, मुख्यमंत्री त्याला बधले नाहीत. एल्टन यांनी कालच्या कार्यक्रमात ते बोलूनही दाखवले. ∙∙∙

तो राजकारणी कोण?

गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात नुकतेच प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण उघड झाले. साहाय्यक प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका आपल्या प्रेयसीला देऊन परीक्षा निकालात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, हा प्राध्यापक विवाहित असूनही त्याच्या या गंभीर कृत्यावर विद्यापीठ प्रशासनाने फक्त तंबी देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले आहेत. मात्र, या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे, या प्राध्यापकाला वाचवण्यासाठी एका राजकारण्याने कंबर कसली आहे, असा आरोप समाज कार्यकर्त्यांनी केला आहे. आता हा राजकीय नेता कोण? आणि त्याचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे याची चर्चा राज्यभर रंगली आहे. काहींच्या मते हा नेता शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून विद्यापीठावर दबाव आणण्यासाठी त्याने आपले वजन वापरले आहे असेही बोलले जाते. ∙∙∙

रस्ते दुरुस्त कधी होणार?

गोव्याची एक खासियत म्हणजे येथे वर्षातील बाराही महिने खराब रस्त्यांच्या तक्रारी ऐकायला मिळतात. पावसाळ्यात रस्ते उखडतात हे आता ठरलेलेच आहे, पण त्याशिवाय सरकारी यंत्रणाही वर्षभर या ना त्या कारणास्तव रस्ते खोदतात, पण नंतर ते दुरुस्त करण्याचे नाव घेत नाहीत. घोगळ गृहनिर्माण मंडळ वसाहत व परिसरातील लोकांचा म्हणे गेली अनेक वर्षे हाच अनुभव आहे. तेथील रस्ते प्रथम भूमिगत वीज केबल घालण्यासाठी खोदले ते दुरुस्त केले गेलेच नाहीत. त्यानंतर मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदले. यंदा गेल्या महिन्यातच ते पुन्हा भूमिगत गॅसवाहिनीसाठी खोदले. त्या चरांत भर न घातल्याने ते चर रुंद होत चाललेले आहेत. ज्यांनी ते खोदले त्यांनी ते त्वरित दुरुस्त करावेत अशी सक्ती करण्याची तरतूद संबंधित नियमात का केली जात नाही अशी विचारणा तेथील रहिवासी करत आहेत.

सायबाचा शिमगा ग्रेट

मूळ काणकोण येथील एका पोलिस उपनिरीक्षकाने शिमग्यानिमित्त पार्टी ठेवली होती. आता शिमगोत्सव असल्याने कुणीही पार्टी ठेवली, तर आक्षेप घेता येत नाही. मात्र, या सायबाने चक्क सासष्टीतील एका पोलिस ठाण्याचे पोलिस कोर्ट्स जे अडगळीत पडले आहे तेथे ही शिमग्याची मेजवानी ठेवली. यात दोन पीआयही आले होते. मित्र परिवारही होता. मात्र, ज्या ठिकाणी पार्टी झाली, तेथील पोलिसांना काही आमंत्रण नव्हते. आम्हाला राबराब राबविले आणि सायबाने शेवटी आम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असे हे पोलिस सांगतात. सायबा, तुम्ही खरेच ग्रेट असेही हे पोलिस दबक्या आवाजात बोलून दाखवितात. ∙∙∙

कोकणी नाट्य स्पर्धेचं शेपूट

मथळे इंग्रजीत दिले तर काही हरकत नाही, पण ते प्रचलित भाषेत समजतील असे असावेत. नाट्य स्पर्धेत काही नाटकांना असे क्लिष्ट कठीण मथळे दिले गेले आहेत की ते समजणं कठीणच. कारण इंग्रजीत अमुक शब्द हा नाम व विशेषणही असतो, कधीकधी क्रियापदही असतो व त्याला अनेक अर्थछटा असतात. आता प्रेक्षकांना गोंधळवून टाकण्याची ही क्लृप्ती म्हणजे गिमिक असेल तर ठीक. स्पर्धा पार विसरूनच जावी असा अवकाश घेऊन आज चार नाटकांचा शेवटचा भाग सुरू होत आहे. गुरुवारी ही स्पर्धा संपणार. ∙∙∙

मंत्रिमंडळ बदलाचे गुऱ्हाळ

गोव्यात विधानसभा निवडणूक झाल्यास आता अडीच वर्षे उलटली आहेत. सरकार स्थापनेनंतर एकच बदल आत्तापर्यंत झाला आहे तो म्हणजे नीलेश काब्राल यांच्या जागी आलेक्स सिक्वेरा यांचा केलेला समावेश. तो सोडला, तर मंत्रिमंडळ बदलाच्या केवळ वार्ता तेवढ्या भरपूर प्रसृत झाल्या. आता तर या महिनाअखेरीस बदल होतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवलेले आहेत. काहींनी आपले मंत्रिपद जाऊ नये म्हणून तर काहींनी आपणाला ते पद मिळावे म्हणून अशा वदंता सत्ताधारी गोटातूनच बाहेर पडत आहेत. नेमके होणार काय ते मुख्यमंत्री व भाजप श्रेष्ठींनाच माहीत. या बदलाची माहिती दिली तीही मुख्यमंत्र्यांनी नव्हे, तर सभापती असलेल्या रमेशरावांनी. मुख्यमंत्री त्यासंदर्भात केवळ स्मितहास्य करतात. त्यामुळे नेमके होणार काय? याबाबत वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. खरेच मंत्रिमंडळात बदल होणार की ही स्थिती २०२७ पर्यंत तशीच राहील तेच आता पाहुया असे अनेकजण म्हणतात. ∙∙∙

कशासाठी प्रेमासाठी!

गोवा विद्यापीठ काही ना काही कारणांनी चर्चेत राहिले आहे. विद्यापीठाचे मानांकन सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होताना दिसत नाही. मात्र, येथील प्राध्यापकांचे प्रेम अधूनमधून उफाळून येते. यापूर्वी विद्यापीठात मुलींच्या विनयभंगांची प्रकरणे झाली आहेत. विशेष बाब म्हणजे विभाग प्रमुखांच्याही रासलीला उघड झाल्या होत्या. आता विद्यापीठातील आणखी एक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. विवाहित असलेल्या प्राध्यापकाचा जीव विद्यार्थिनीवर जडला आणि तिच्या प्रेमासाठी काहीही करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला असावा असे दिसते. सरकारी खात्यातील कोणतेच खाते अशा प्रकरणापासून दूर असेल असे म्हणताच येणार नाही. मागील वर्षी नदी परिवहन खात्याच्या लेखा शाखेतील अधिकाऱ्याच्या कारनाम्यांची चर्चा अजूनही या कार्यालयात चर्चिली जाते. त्याशिवाय यापूर्वी शिक्षण खात्यात घडलेली विनयभंगांची प्रकरणे पाहिली तर ती खरोखरच चिंताजनक आहेत. त्यामुळे विद्यापीठ असो की शाळा, शिक्षण खात्यातील रासलीलांच्या घटनांमुळे बदनामी नक्की कोणाची होतेय याचा विचार ज्ञानदान करणारे करणार आहेत का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT