Goa Politics: खरी कुजबुज, कुडतरीत भाजपवाल्यांचे काय होईल?

Khari Kujbuj Political Satire: दक्षिण गोव्यात गत लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची ‘आप’ बरोबर असलेली युती हे सर्वश्रुत आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

कुडतरीत भाजपवाल्यांचे काय होईल?

कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपण पुढील निवडणूक अपक्षच म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ते सध्या भाजप सरकारला पाठिंबा देत आहेत. म्हणूनच आयडीसी चेअरमनपदी आहेत. शिवाय मतदारसंघातील सर्व विकास कामे ते सरकारच्या मदतीने करीत आहेत. त्यामुळे या परिस्थितीत ते कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार नाहीतच. तसेच भाजपच्या उमेदवारीवर ते हमखास पराभूत होतील हे नक्की. रेजिनाल्डबाब अपक्ष लढविणार म्हटल्यावर छुपा तरी भाजपला त्याला पाठिंबा दिल्याशिवाय गत्यंतर नसेल. मात्र, या परिस्थितीत कुडतरीहून आमदारपदाची स्वप्ने पाहणारे भाजपचे ॲंथनीबाब, डॉ. स्नेहाबाय तसेच इतर काही इच्छुकांचे काय होईल? भाजप केवळ औपचारिकता म्हणून आपला उमेदवार ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुडतरी मतदारसंघाची सध्याची स्थिती पाहता भाजपचेही चार ते पाच हजार मतदार आहेतच की. अशा परिस्थितीत दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होणार तर नाही ना!, कुडतरीत हीच चर्चा सध्या रंगलेली दिसत आहे.

मुख्यमंत्री बैठकांत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या अर्थसंकल्पपूर्व बैठका घेत आहेत. मंत्रालयातच दिवसभर या बैठका सुरु असतात. विविध संस्था, संघटना त्यांना निवेदने देत आहेत. सर्वांना एकाच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून खूश करण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे. जाहीर कार्यक्रमांना ते उपस्थित राहतात आणि या बैठकांनाही उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांच्या जबरदस्त स्टॅमिन्याची चर्चा मात्र आहे.

कळवळा भाऊसाहेबांचा की इंग्रजीचा?

आपले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा भलताच कळवळा आलेला दिसतो. भाऊसाहेबांनी गावोगावी सुरू केलेल्या मराठी शाळा बंद पडतात, याबद्दलही त्यांनी दुःखही व्यक्त केले आहे. पण तेवढ्यावर ते थांबलेले नाहीत, तर त्या बंद पडू नयेत, म्हणून प्राथमिक शाळांचे माध्यम इंग्रजी करा, असा उपायही सुचवला. माणूस म्हणे झोपेत असला की खरे बोलतो. असे म्हणतात, की मायकल बाबांच्या मनांत खरे काय आहे ते यातून बाहेर आलेय. त्यांचा हा उपाय म्हणजे रोगापेक्षा औषध जालीम आहे, असे देशी भाषाप्रेमी म्हणताहेत. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हा जागतिक सिध्दांत आहे, त्यालाही हा उपाय काळोखी फासणारा आहे. बरे इतके करूनही उद्या लोक मुलांना सरकारी शाळांत पाठवणार याची खात्री कुठे आहे. स्वतःला कोकणी प्रेमी म्हणविणाऱ्यांनीच ऐशींच्या दशकात इंग्रजी माध्यमाची कास धरली होती, हा इतिहास आहे हे मायकलबाबांनी लक्षात ठेवण्याची गरज असून त्यामुळे त्यांना कळवळा भाऊसाहेबांचा वाटतो, की इंग्रजीचा अशी विचारणा होतेय.

‘आप’चे धोरण, भाजपला लाभ?

दक्षिण गोव्यात गत लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आला याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची ‘आप’ बरोबर असलेली युती हे सर्वश्रुत आहे. सासष्टीत असे काही मतदारसंघ आहेत, जे कॉंग्रेसचे बालेकिल्ले आहेत. ते काबीज करण्याचा ‘आप’चा प्रयत्न आहे. यावरूनच दोन्ही पक्ष एकमेकापासून दुरावत चालल्याचे दिसत आहे, बाणावली, वार्का इथे कॉंग्रेसचे वर्चस्व असले तरी अंतर्गत वादामुळे ‘आप’च्या उमेदवारांना तिथे निवडून येण्याची संधी मिळाली. हेही तेवढेच खरे. पूर्वी कॉंग्रेस व ‘मगो’च्या युती मुळे भाजपला सत्ता काबीज करणे शक्य होत नसे. आता ‘मगो’ व भाजप एकत्र आल्याने हे दोन्ही पक्ष सत्तास्थानी आहेत. कॉंग्रेस व ‘आप’ची युती संपली तर हे दोन्ही पक्ष पराभूत होतील व भाजपला सत्ता राखण्याची आयतीच संधी मिळेल, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. ∙∙∙

मंत्र्याच्या हस्तकाचा ‘तो’ व्हिडिओ!

माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आपल्या कामासाठी २० लाख रुपये राज्य सरकारातील एका मंत्र्याला दिल्याचा आरोप करून भाजपमधील नेत्यांची झोप उडवली. मडकईकरांनी सरकारद्वारे थेट लूट चालली आहे, असे सांगत सरकारला आणखी अडचणीत आणले. मडकईकरांच्या आरोपानंतर सरकारातील कोण तो मंत्री, असा प्रश्न निर्माण झाला! त्यानंतर काहींनी थेट एका नेत्याचे नावही सांगितले. तर काही मंत्र्यांनी पुरावे सादर करावेत, केवळ आरोप करू नयेत, असे सांगत सारवासारव केली. अजूनही हे प्रकरण चर्चिले जात आहे, त्यातच आता एका मंत्र्याच्या ‘कलेक्टर’चा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत संबंधित व्यक्ती चालकाच्या सीटवर बसली आहे आणि बाजूच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीकडून पिशवीतून आणलेल्या रकमेचे बंडल स्वीकारत असल्याचे दिसत आहे. आता काहीजणांच्या मते मडकईकरांनी केलेल्या आरोपातीलच हा व्हिडिओ आहे. त्यामुळेच कदाचित मडकईकरांनी मंत्र्याने घेतलेल्या पैशांविषयी थेट आरोप केले, ते याच पुराव्यावर असावेत, असे प्रथमदर्शनी तर दिसून येते.

राजकीय वारी

नेवरा येथे रेल्वे स्टेशन बांधले जाईल, अशी घोषणा झाल्यानंतर सांतआंद्रेत कमालीचे अस्वस्थता पसरल्याचा अनुभव येतो. लोकांना पुढे काय करायचे, हेच सध्या कळेनासे झाले. हळूहळू हा राजकीय मुद्दा होत चालल्याने आमदार विरेश बोरकर यांनी ग्रामसभेत हजेरी लावून आपण लोकांसोबत असल्याचे जाहीर केले. त्यात जिल्हा पंचायत निवडणूक जवळ पोहोचल्याने निष्क्रिय असलेल्या काँग्रेसचे काही पदाधिकारी नेवरा सरपंच मनिषा नाईक आणि पंचसदस्यांना घेऊन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांना निवेदन सादर करून आले. नंतर दक्षिण गोवा खासदार विरियातो फर्नांडिस यांना आणून नेवरा पंचायतघरात सभा घेतली. हे सगळे पाहून गप्प असलेले भाजपचे पदाधिकारी ‘ॲक्शन मोड’मध्ये येऊन सरपंच मनिषा नाईक आणि माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना घेऊन थेट मुख्यमंत्र्यांना भेटले. आता या ‘राजकीय वारी’चा फायदा होणार का, केवळ फोटोसेशन करून मोठमोठी आश्वासने देऊन स्टेशन नेवरावासीयांवर लादले जाणार, हे येणारा काळच ठरवेल!.

आरोग्यमंत्र्यांची धडक मोहीम!

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी जनतेला आरोग्य केंद्रासह इस्पितळामध्ये मिळणाऱ्या आरोग्याच्या सुविधांबाबत लक्ष देण्यासाठी अचानक भेटी देऊन तेथील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडवून दिली आहे. इस्पितळाचे डॉक्टर्स तसेच कर्मचारीही सतर्क झाले आहेत. राणे यांनी घोषणाच केली आहे, मी अचानक कोणत्याही वेळी भेट देईन व त्यावेळी कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा होत असल्याचे आढळल्यास संबंधिताविरुद्ध ‘ऑन द स्पॉट’ कारवाई करेन, असा इशाराही दिला आहे. मग कोणी आपल्यावर दबाव आणला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जनतेकडूनही एखाद्या डॉक्टर्सकडून होणाऱ्या उपचारामधील वेळकाढूपणा निदर्शनास आणून दिल्यास त्या डॉक्टरांची गय नाही, असे आज अचानक गोमेकॉ इस्पितळातील ‘पेडियाट्रिक’ विभागाला भेट देताना स्पष्ट केले. त्यांच्या अचानक येण्यामुळे इस्पितळातील त्याचबरोबर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर दडपण आले आहे. या विभागात काही विशिष्ट भागात आवश्‍यक असलेले वातानुकूलन नसल्याचे कळताच सीएसआर योजनेतून उपलब्ध करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, इस्पितळ प्रशासन अधिकारी मात्र सुस्त बनले असताना त्यांच्यावर कारवाई त्यांनी का केली नाही, हे मात्र कोडेच राहिले.

मडकईकर काय करतील?

मंत्र्याला छोट्या कामासाठी १५-२० लाख रुपये दिल्याचा आरोप करून चर्चेत आलेले माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्यापासून भाजपने अंतर राखणे सुरू केले आहे. मडकईकर यांचे आरोप खोटे असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगून मडकईकर यांनाच उघडे पाडले आहे. त्याही पुढे जात त्यांनी राज्य सरकारला इमानदारीचे प्रमाणपत्र दिले आहे. यासाठी जनता वारंवार सरकार निवडते, याचा अर्थ ते इमानदार सरकार, असे सांगून जे काही घडते आहे त्याला जनताच जबाबदार,असेही सुचवले आहे. आता या परिस्थितीत मडकईकर काय करतील हा मोठा प्रश्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com