LLB Admission Scam कारे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा यांनी आपल्या मुलाच्या फायद्यासाठी जे कृत्य केले, ते शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारे असून त्यांच्या या गैरकारभाराची गंभीर दखल घेत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे, असे स्पष्ट निर्देश गोवा विद्यापीठाने महाविद्यालय व्यवस्थापनाला दिले आहेत.
कारे विधी महाविद्यालय चालविणारी शिक्षण संस्था असलेल्या विद्या विकास मंडळाला विद्यापीठाने आज यासंदर्भातचे पत्र पाठवून त्याची एक प्रत उच्च शिक्षण संचालकांनाही पाठविली आहे.
प्राचार्य दा सिल्वा यांनी फक्त प्रवेश प्रक्रियाच बदलली नाही, तर त्यांनी ही परीक्षा घेताना गंभीर प्रकारचे गैरकृत्य केले असल्याचे विद्यापीठ समितीच्या चौकशीत पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.
यासाठी त्यांनी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आनंद साळवे यांनाही त्यात गुंतविले. या सर्व प्रकरणाची महाविद्यालय व्यवस्थापनाने गंभीर दखल घेत त्वरित कारवाई करावी, असे विद्यापीठाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
यासंदर्भात उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांना विचारले असता, विद्यापीठाने पाठविलेले पत्र आणि चौकशी समितीचा अहवाल आपल्याला मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य दा सिल्वा यांनी आपल्या पुत्राला बारावीत 60 टक्के गुण मिळालेले असतानाही त्याला बीए एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश मिळणे सुकर व्हावे यासाठी विद्यापीठाला अंधारात ठेवून प्रवेश पद्धती बदलताना बारावीच्या परीक्षेत मिळालेले गुण विचारात न घेता फक्त प्रवेश परीक्षेचे गुणच विचारात घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला.
या प्रवेश परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न स्वतः बदलून आपल्याला हवे असलेले प्रश्न त्यात घुसडले. एव्हढेच नव्हे, तर शेवटच्या क्षणी आपल्या पुत्राच्या उत्तर पत्रिकेच्या गुणांतही फेरफार केला, असे विद्यापीठाच्या चौकशीत पुढे आले आहे.
बीए एलएलबी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय गोवा विद्यापीठाने घेतला असून आता या अभ्यासक्रम प्रवेशासाठी ६ ऑगस्ट रोजी पुन्हा नव्याने प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एस. नाडकर्णी यांनी आज हे परिपत्रक जारी केले. नवीन प्रवेश परीक्षेचा निकाल ८ ऑगस्ट रोजी जाहीर होईल. यापूर्वी ज्यांनी ही प्रवेश परीक्षा दिली, त्यांना नव्या परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करण्याची किंवा अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही.
बारावी व प्रवेश परीक्षेतील गुण जमेस धरून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. गोव्याच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.
कारे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य दा सिल्वा यांना निलंबित करण्यासंदर्भातचे पत्र आज आम्ही महाविद्यालय व्यवस्थापनाला पाठविले आहे. दा सिल्वा हे विद्यापीठाचे कर्मचारी नसल्याने विद्यापीठ थेट त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. ते विद्या विकास मंडळाचे कर्मचारी आहेत. त्यामुळे ही कारवाई त्यांना करावी लागेल.
- व्ही. एस. नाडकर्णी, कुलसचिव, गोवा विद्यापीठ
गोवा विद्यापीठाचा अहवाल आज सायंकाळी ५ वाजता आम्हाला मिळाला आहे. जे काय झाले ते आम्हाला मुळीच मान्य नाही. आम्ही विद्यापीठाच्या शिफारशीवर अभ्यास करण्यासाठी लवकरच आमच्या समितीची बैठक घेणार आहे. कायद्याला अनुसरून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.
- नितीन कुंकळ्येकर, अध्यक्ष, विद्या विकास मंडळ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.