सोलापूर: गोव्याच्या निसर्गरम्य किनारपट्टीवर पर्यटनाचा आनंद लुटून परतणाऱ्या मित्रांच्या गटावर काळाने भीषण घाला घातला आहे. तेलंगणा राज्यातील मेदक जिल्ह्यातील नरसापूर येथील १५ मित्रांचा हा गट गोव्याला गेला होता. मात्र, परतीच्या प्रवासात सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या एका कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नरसापूर येथील १५ मित्रांनी मिळून गोव्याला जाण्याचा बेत आखला होता. यासाठी त्यांनी तीन वेगवेगळ्या कार भाड्याने घेतल्या होत्या.
गोव्यातील पर्यटन संपवून हे सर्वजण उत्साहात आपापल्या घराकडे निघाले होते. मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून प्रवास करत असताना, या तीन कारपैकी एका कारला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
या अपघातात 'रेहान' आणि 'पवन कुमार' या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या मित्रांसोबत हसत-खेळत प्रवास करणाऱ्या या दोघांचा प्रवास असा अर्ध्यावरच संपेल, याची कल्पना कोणालाही नव्हती. याच कारमध्ये असलेले 'कमरुद्दीन' आणि 'अफसान' हे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या बातमीने पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत पावलेले तरुण आपल्या कुटुंबाचे आधार होते. सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू केला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला की अन्य कोणत्या वाहनाने धडक दिली, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.