पणजी: राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याचे आवाहन पर्यटन खात्याने नागरिक, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) तसेच प्राणी कल्याण संस्थांना केले असून, १५ ऑक्टोबरपर्यंत ज्या कुत्र्यांना दत्तक घेतले जाणार नाही, त्यांना विद्यमान कायदे, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि प्राणी कल्याण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शक्य असेल तिथे अधिकृत प्राणी निवारा केंद्रांमध्ये हलविले जाणार असल्याचे खात्याने जारी केलेल्या जाहीर सूचनेत म्हटले आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजत आहे. समुद्र किनाऱ्यांवर अशा कुत्र्यांची संख्या वाढत असून, येथे जाणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांवरही अशी कुत्री टोळ्यांनी हल्ले करीत आहेत. याशिवाय स्थानिकांनाही त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटन खात्याने नागरिक, एनजीओ तसेच प्राणी कल्याण संस्थांनी त्यांना दत्तक घ्यावे. जे यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत पर्यटन खात्याकडे अर्ज करावा. अर्जदारांनी त्यांचे नाव, पत्ता, आधार कार्डचा पुरावा आणि दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या कुत्र्यांची संख्या नमूद करावी.
भटके श्वान समुद्र किनाऱ्याजवळील मतदारसंघांच्या आमदारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अशी कुत्री दिवसाढवळ्या स्थानिक नागरिक तसेच मुलांवर हल्ले करीत आहेत. त्यांच्या हल्ल्यांत काहीजण गंभीर जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा मतदारसंघांमधील अनेक पंचायत क्षेत्रातील लोक वारंवार स्थानिक आमदारांकडे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मांडत आहेत. त्यातूनच कळंगुटचे आमदार मायकल लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक यांच्यासह अनेकांनी विधानसभा सभागृहातही हा विषय ऐरणीवर आणला होता.