राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या शिफारशींची राज्यात (Goa) अंमलबजावणी जून 2024 पासून इयत्ता 9 वी साठी आणि मागील वर्षांमध्ये पूर्व-प्राथमिक स्तरावर केल्यानंतर राज्य सरकार आता तिसरी, सहावी आणि नव्या शैक्षणिक वर्षात (2025-26) त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणीची अधिकृत घोषणा या महिन्यात होऊ शकते, जेणेकरुन शाळांना देखील त्या दृष्टिकोनातून तयारी सुरु करता येईल.
दरम्यान, चालू शैक्षणिक वर्ष जूनऐवजी एप्रिलपासून सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, जेणेकरुन व्यावसायिक शिक्षण आणि कला शिक्षण यासारख्या नवीन विषयांच्या अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ मिळू शकेल.
धोरणानुसार, इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी नऊ विषयांचे अध्ययन करतील. तसेच, नववी आणि दहावीचे विद्यार्थी आता दहा विषयांचे अध्ययन करतील. गोव्याने याआधीच धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरु केली आहे, जी वयाच्या तिसऱ्या वर्षी म्हणजेच नर्सरी स्तरापासून सुरु होते.
धोरणानुसार, राज्याने माध्यमिक टप्प्यावर NEP लागू केले, जे इयत्ता 9 वी पासून सुरु होते. 2025 पासून NEP प्रथमच पूर्वतयारीच्या टप्प्यावर लागू केले जाईल, जे इयत्ता 3 री किंवा वयाच्या 8 व्या वर्षी सुरु होईल. ते प्रथमच इयत्ता 6 वी साठी शैक्षणिक वर्षाच्या मध्यातून देखील लागू केले जाईल, जे मुलांच्या वयाच्या 11 व्या वर्षापासून सुरु होईल.
“सध्या सर्व शालेय परीक्षा 31 मार्च रोजी संपणार आहेत. गोवा बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षाही पुढे रेटल्याने त्या मार्चअखेर संपतील. त्यामुळे एप्रिलपासून शाळा सुरु होऊ शकतात. अशी प्रणाली ICSE आणि CBSE बोर्डांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त गोव्यातच (Goa) आम्ही विद्यार्थ्यांना दोन महिने उन्हाळ्याच्या सुट्ट्या देतो, त्या आता एक महिन्यापर्यंत कमी केल्या जाऊ शकतात,'' असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
गोवा शालेय शिक्षण कायदा असं सांगतो की, शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरु होते. त्यामुळे काही बदल करायचे असतील तर राज्य सरकारला या संदर्भात अधिसूचना जारी करावी लागेल. नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक टप्प्यावर, शैक्षणिक वर्ष दोन सेमिस्टरमध्ये विभागले जावे, अशी शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आलेली आहे. मात्र धोरण लागू झाल्याच्या पहिल्या वर्षापासून दहावीला सेमिस्टरमध्ये विभागले जावे की, नाही यावर राज्य सरकार विचार करत आहे. जून 2024 पासून इयत्ता दहावीमध्ये सेमिस्टर प्रणाली लागू करण्यात आली. तथापि, दहावीचा वर्ग यासाठी वेगळा ठरतो कारण विद्यार्थ्यांना (Students) वर्षाच्या शेवटी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जावे लागते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.