पणजी: गोव्यातील वन्यजीव अभयारण्यांमध्ये वाघ अस्तित्वात आहेत, हे सिद्ध झाले आहे. परंतु यावर्षी वाघ गणनेच्या गोवा वनविभागाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या खात्याने अलीकडेच केलेल्या वाघ गणनेचे निष्कर्ष अद्याप जाहीर केलेले नाहीत. हे निष्कर्ष जाहीर करावेत, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केली आहे.
केरकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांनी आपापल्या वाघ गणनेचे निष्कर्ष माध्यमांसमोर मांडले आहेत आणि ते पत्रकारांनीही दिले आहेत; परंतु गोव्यात राज्य सरकार वाघ गणनेचा अहवाल का लपवत आहे, तेच कळत नाही. २०२६ च्या वाघ गणनेचा तपशील का लपवून ठेवला आहे. त्याबाबत पत्रकारांना माहिती देण्यास का नकार दिला जात आहे, असा प्रश्न केरकर यांनी केला. त्यांनी असा दावा केला आहे की, नवीन छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये गोव्यात एक नर वाघ गाईची शिकार करताना दिसत आहे.
व्याघ्र प्रकल्प जाहीर केल्यास बरेच प्रश्न सुटणार
सुर्ला-चरावणे परिसरातील या व्हिडिओमुळे गोव्यात वाघ असल्याचे सिद्ध होत असल्याने त्याची वन खात्याने गंभीरतेने दखल घ्यावी. खरे तर म्हादई अभयारण्याचा परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर केल्यास बरेच प्रश्न सुटणार आहेत. म्हादईचे पाणी वळविण्याचा प्रश्नही सुटणार आहे आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. एका बाजूला पंतप्रधान वाघ संरक्षणासाठी उपक्रम राबवतात, तर दुसरीकडे राज्य सरकार राज्यात वाघाचे अस्तित्व नाकारत आहे, असेही केरकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.