डिचोलीतील वेगवेगळ्या भागात बिबट्यांचा संचार वाढला असतानाच, शहरातील गोठण-बोर्डे परिसरात पट्टेरी वाघ असल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्तामुळे बोर्डे तसेच या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या जनतेमध्ये घबराट पसरली आहे.
दोन दिवसांपूर्वी नाईकनगर येथील एका युवकाला या पट्टेरी वाघाचे दर्शन घडल्याची माहिती मिळाली आहे. बोर्डे भागात पट्टेरी वाघाचा संचार असल्याच्या खाणाखुणा मिळालेल्या नाहीत, असे प्राणिमित्र अमृतसिंग यांनी सांगून वाघ असण्याची शक्यता नाकारलेली नाही. काही वर्षांपूर्वी गोठण-बोर्डे परिसरात पट्टेरी वाघाचा संचार होता.
गोठण भागात पट्टेरी वाघाचा संचार असल्याच्या वृतानंतर मी परिसरात मागोवा घेतला. परंतु आतापर्यंत वाघाच्या पावलांच्या वा अन्य कोणत्याच खाणाखुणा आढळून आलेल्या नाहीत. डोंगरमाथे बोडके होऊ लागल्याने गेल्या काही वर्षांपासून जंगली श्वापदांचा लोकवस्तीत संचार वाढला आहे.
खाणाखुणा आढळून आल्या नसल्या, तरी गोठण-बोर्डे परिसरात पट्टेरी वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन खात्याने गोठण भागात कॅमेरे बसवून पट्टेरी वाघाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करावा.
-अमृत सिंग, प्राणीमित्र.
सापळा लावण्याची मागणी
बोर्डे लोकवस्तीजवळील गोठण भागात पट्टेरी वाघ संचार करताना काहींच्या निदर्शनास आले आहे. गुरुवारी भर दुपारी गोठण येथे भर रस्त्यावर हा पट्टेरी वाघ उभा होता. अशी माहिती काही स्थानिकांनी दिली.
पट्टेरी वाघाचा संचार असल्याच्या माहितीमुळे रात्रीच्यावेळी गोठण रस्त्यावरून जाण्याचे कोणी धाडस करीत नाही. वन खात्याने या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी. पट्टेरी वाघ असल्यास त्याला पकडण्यासाठी सापळा लावावा. अशी मागणी लोकांनी केली आहे. पंधरा दिवसांपूर्वीही पट्टेरी वाघ दिसून आला होता. अशी माहिती समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.