Panaji : गोव्यात मोबाईल चोरणाऱ्या शिमोगा येथील आंतरराज्य टोळीचा पणजी पोलिसांनी पर्दाफाश करत तिघांना झुआरीनगर येथून शिताफीने अटक केली. या तिघांकडून 23 स्मार्ट फोन्स जप्त केले असून त्यांची किंमत सुमारे 7.50 लाख रुपये आहे. पणजीतील एका कामगाराच्या खोलीतून मोबाईल चोरीला गेल्यानंतर या प्रकरणाच्या तपासावेळी यात राज्याबाहेरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर तसेच पोलिस पथके स्थापन करून या प्रकरणाचा छडा लावला, अशी माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.
डी. के. लक्ष्मणा (26), संदीप सिद्दानमट्टी (30 ) आणि संतोष मुरुगेश भोवी (25) अशी संशयितांची नावे असून त्यातील दोघांविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल केले आहेत. हे तिघेही शिमोगा येथील असून गेल्या काही महिन्यांपासून झुआरीनगर येथे भाड्याच्या खोलीत राहात होते. कामगारांच्या खोल्यांमधील मोबाईल हे त्यांचे लक्ष्य होते. लक्ष्मणा याला २०२० मध्ये पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केली होती. त्याला न्यायालयाने शिक्षाही ठोठावली होती. शिक्षा पूर्ण करून तो पुन्हा चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय झाला होता. संतोष हा उडपी येथील जबरी चोरी प्रकरणात असून त्याचा शोध पोलिस घेत होते.
दोन दिवसांपूर्वी या तिघांनी पणजीतील कामगारांच्या खोलीतून महागड्या मोबाईलची चोरी केली होती. याप्रकरणी सूरज सिंग याने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानुसार पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक आणि निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके स्थापन केली व संशयितांचा ठावठिकाणी शोधला. झुआरीनगर येथे खोलीत तिघेजण सापडले. या टोळीमध्ये आणखी काहीजण असण्याची शक्यता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. खोलीची झडती घेतली असता, त्यांनी चोरलेले मोबाईल सापडले, असे वाल्सन यांनी सांगितले.
तीन राज्यांत हैदोस : शिमोगा येथील ही टोळी गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या तीन राज्यांतील चोरी प्रकरणांमध्ये गुंतली आहे. त्यांचे लक्ष्य हॉटेल्स, लॉजिंग खोल्या तसेच गर्दीची ठिकाणे असतात. मोबाईल चोरण्याबरोबरच बॅगा लंपास करण्यामध्येही त्यांचा हातखंडा आहे, असे वाल्सन म्हणाले.
मुके-बहिरे असल्याचे भासवायचे
संशयितांनी डॉक्टरांच्या बनावट सहीचे प्रमाणपत्र तयार करून घेतले होते. त्यामध्ये ते मुके व बहिरे असल्याचे नमूद केले होते. मोठी आस्थापने किंवा हॉटेलमध्ये कामगारांना एकत्रित ठेवण्यात येते. हे कामगार झोपल्याचा फायदा घेत संशयित त्यांचे मोबाईल तसेच किमती वस्तू चोरत. जर सापडल्यास ते त्यांच्याकडील डॉक्टरांनी दिलेले प्रमाणपत्र दाखवायचे व त्यांना बोलता किंवा ऐकता येत नसल्याचे नाटक करायचे. त्यामुळे ते सहीसलामत सुटायचे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.