Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; टॅक्सीवाले पुन्हा आलेत चर्चेत

Khari Kujbuj Political Satire: भाजपच्या या मेळाव्याला सभागृह खचाखच भरले होते, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष दामू यांचे भाषणही जोशात झाले.

Sameer Panditrao

टॅक्सीवाले पुन्हा आलेत चर्चेत

गोव्यात पूर्वी बसवाल्यांची लॅाबी होती, नंतर त्याची जागा टॅक्सी व तीही पर्यटक टॅक्सींनी घेतली. त्या काळात दाबोळी हा एकमेव विमानतळ होता व त्यामुळे दक्षिण गोव्यातील टॅक्सीवाल्यांचे त्या व्यवसायात इतके वर्चस्व होते, की दक्षिणेतील व विशेषतः सासष्टीतील राजकारणी त्यांची तळी उचलून धरत असल्याने कोणत्याही बाबतीत त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिस व आरटीओवाले धजावत नव्हते. आता मोपा विमानतळ झाल्याने व तेथून अधिक विमाने उड्डाण करू लागल्याने उत्तर गोव्यातील टॅक्सीवाल्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे व त्यांची तळी उत्तरेतील राजकारणी उचलू लागले आहेत. या एकंदर घडामोडीत सर्वसामान्य नागरिक मात्र भरडला जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. टॅक्सीवाले पर्यटकांना कसे छळतात त्याची वर्णने समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत . काहींना म्हणे विमान तिकिटापेक्षा टॅक्सी भाडे अधिक पडल्याची उदाहरणे आहेत. मात्र, त्याची कोणतीच गंभीर दखल संबंधित यंत्रणा घेताना दिसत नाही. ∙∙∙

प्रदेशाध्यक्षांचे शंभर दिवस

दामोदर उर्फ दामू नाईक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्याचे शंभर दिवस झाले. त्यानिमित्ताने ताळगावात त्यांचा पुष्पहार घालून आणि वस्तू भेट देऊन आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत खास सत्कार केला. भाजपच्या या मेळाव्याला सभागृह खचाखच भरले होते, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष दामू यांचे भाषणही जोशात झाले. त्यांनी स्वतःच्या कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्षपदाच्या प्रवासाविषयी माहिती दिली. शंभर दिवस झाल्याने माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी व्हिडिओ क्लिप आणि छायाचित्रे पोस्ट केली आहेत. एका छायाचित्रात दामू नाईक बॅट घेऊन उभे असून, त्यात ‘नॉनस्टॉप १००’ असे शीर्षक दिले आहे. त्याशिवाय १०० दिवस, २४०० तास, ० दिवस सूट्टी, २४X७ केवळ गोव्याच्या हिताचाच विचार आणि शेवटी ‘आमचो दामू नाईक ऑन मिशन २०२७’ असे लिहिले आहे. दामू नाईक यांनी कदाचित ही पोस्ट पाहिल्यानंतर ते नेहमीच्या शैलीत नक्कीच हसले असते आणि त्यामागील गुपितही ओळखून गेले असतील. ∙∙∙

ताळगावचा विकास!

ताळगावात पहिल्यांदाच जेनिफर मोन्सेरात यांनी गतवर्षी कमळ फुलवल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्याशिवाय प्रलंबित कामे दोन वर्षांत मार्गी लागतील, असे आश्वासन त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिले. काही झाले तरी ताळगावचा विकास मोन्सेरात कुटुंबामुळेच झाला आहे हे त्यांचे समर्थक छातीठोकपणे सांगतात. जेनिफर मोन्सेरात यांच्यापूर्वी त्यांचे पती बाबूश मोन्सेरात यांनी ताळगावात केलेल्या रस्त्यांचा उल्लेख २०१९ च्या पोटनिवडणुकीत कोणते राजकारणी करीत होते, हे सांगायला नको. मात्र, सध्या ताळगावात रस्त्याच्या डांबरीकरणाची, भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याची कामे होत आली आहेत. पुढील दोन वर्षांत प्रलंबित कामे होतील, यामध्ये ताळगावच्या पाण्याचा प्रश्न आणि ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार काय, याकडे आमदार जेनिफर समर्थकांचे लक्ष असणार आहे. ∙∙∙

केरळच्या सहलीची चर्चा!

गतवर्षी महानगरपालिकेतील महिला नगरसेवकांची काश्मीरला जाणारी सहल आमदारांच्या इशाऱ्यामुळे होऊ शकली नाही. ही सहल रद्द झाल्याची खंत महिला नगरसेवकांमध्ये असणार याची कल्पना कदाचित आली असणार आहे. त्यामुळे यावर्षी काश्मीरला नाहीतर केरळमध्ये मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुनार, टेकडी, कोची अशा ठिकाणी म्हणे सहल काढण्याचा प्रस्ताव कोणी दिला आहे. त्यासाठी शहरातील एका व्यावसायिकाने या सहलीचा खर्च उचलण्याची तयारीही दर्शविली आहे म्हणे. परंतु ही सहल महानगरपालिकेच्या खर्चातून केली जाणार असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे सहलीच्या दिलेल्या प्रस्तावात इच्छुक असलेल्या नगरसेवकांच्या नावांची यादी तयार करण्यात आली आहे. आता काश्मीरला नाहीतरी केरळला जाता येईल, अशी आशा महिला नगरसेवकांना आहे. या सहलीसाठी आमदार आणि महापौरांकडून फक्त त्यासाठी हिरवा कंदील मिळण्याचे बाकी असल्याचे बोलले जाते.∙∙∙

‘हाऊजी’ बंदी केवळ कागदावर ?

तसे राज्यात बेकायदेशीर जुगारावर बंदी आहे. मटक्यावर बंदी आहे, पत्त्यांच्या खेळावर बंदी आहे, मात्र या सगळ्यांवर जी बंदी आहे, ती केवळ कागदावरच राहिली आहे. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी मॅडमने दक्षिण गोव्यात हाऊजी खेळावर बंदीचा आदेश काढला. मुख्यमंत्र्यांनीही हाऊजी कदापी खपवून घेणार नाही, असा निर्धार जाहीर केला. मात्र, हे सगळे दावे केवळ कागदावरच उरलेत असे दिसते. परवा मुरगाव तालुक्यात १५ लाखांची हाऊजी झाली. सुमार ऐंशी लाखांची उलाढाल झाल्याचे कळते. फातोर्डा भागातही अशीच जंगी हाऊजी झाली, मात्र पोलिसांनी हे बेकायदेशीर उद्योग बंद केले नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पोलिस जुमानत नाहीत, असा झाला नाही का? की ही बंदी मोजक्याच लोकांना व मोजक्याच मतदारसंघात लागू आहे? मॅडम जिल्हाधिकारी यावर प्रकाश टाकतील का? ∙∙∙

रेतीचा रात्रीसच खेळ चाले!

फोंडा आणि डिचोली तालुक्यात अनेक ठिकाणी चोरटी रेती काढली जाते आणि रात्रीच्या वेळेला ही रेती बिनधास्तपणे वाहतूकही केली जाते. मागच्या काळात खांडेपार भागात भरारी पथकाने छापा टाकून रेती जप्त केली होती, पण आता पुन्हा एकदा रेतीचे उत्खनन ही जागा सोडून दुसरीकडे सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भरारी पथकाने दिवसा नव्हे तर रात्रीच्या वेळेला छापा टाकावा आणि रेती मफियांना पकडावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कारण दिवसा कुणी अशा भानगडीत पडत नाहीत, रात्रीच्या वेळेसच हा खेळ चालतो. ∙∙∙

‘अच्छे दिन’ कधी अन् कुणाचे?

सध्या गोव्यात भाजप निवडणूक मूडमध्ये आहे. पक्ष श्रेष्ठीच्या आदेशानुसार राज्यात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले जातात व त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आवर्जुन हजेरी लावतात. जिथे जिथे जातात तिथे ते ‘अच्छे दिन’ची भाषा बोलतात. मडगावात, काणकोणात, कुडचडे. नावेली, कळंगुट या प्रत्येक ठिकाणी त्यांची हीच भाषा ऐकू येते. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या वाढदिनीही ‘अच्छे दिन’चीच भाषा ते बोलले. आता हे ‘अच्छे दिन’ कधी अन् कुणासाठी? म्हणजे स्थानिक आमदारांसाठी की लोकांसाठी यावर सध्या चर्चा रंगली आहे. स्थानिक आमदारांचा विचार केला तर मंत्रिमंडळातील बदल या ना त्या कारणावरून लांबणीवर पडत आहे. आता तर पहलगाम हल्ल्यानंतर पक्षश्रेष्ठी मंत्रिमंडळाच्या मनस्थितीत नाहीत, असे बोलले जाते. सध्याची देशातील स्थिती पूर्वपदावर येण्यास बराच अवधी लागणार आहे. डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत त्यानंतर नगरपालिका निवडणुका व नंतर लगेच विधानसभा निवडणुका. त्यामुळे मंत्री होण्यास इच्छुक असलेल्या आमदारांना तोपर्यंत गॅसवर ठेवले जाणार का? यावरही सध्या चर्चा रंगात आली आहे. ∙∙∙

दिलायला लोबोंचे भगवान परशुरामप्रेम

मतदारसंघातील लोकांच्या भावना लक्षात घेत आमदार सध्या त्यांना खूश करण्यासाठी प्रयत्नात असतात. मतदारसंघात विकासकामे राबवून त्याद्वारे मतदारांना खूश करणे हे तर लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असते. मग आमदार दिलायला लोबो तरी कशा मागे राहतील. याचाच प्रत्यय शिवोलीवासीयांना आज आला. पणजीत भला मोठा भगवान परशुरामांचा पुतळा उभा आहे. असे असतानाही शिवोलीवासीयांच्या प्रेमाखातर आमदार दिलायला लोबो आता गोव्यातील दुसऱ्या पुतळ्याच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार आहेत. मॅडम िदलायला यांनी आपण थेट मुख्यमंत्र्यांसोबतही या संदर्भात बोलणार असल्याचे सांगितले. लोबो दाम्पत्य हे हिंदूंच्या बऱ्याच उत्सवात सहभागी होत असते. मायकल लोबो तर भजन गातानाही दिसतात. त्यामुळे दिलायला यांचे भगवान परशुरामांबद्दलचे प्रेम चर्चेचा विषय बनले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT