म्हापसा: आमदार लोबो दाम्पत्याने आमच्या पाठीशी उभे राहावे व ॲप कॅब ॲग्रिगेटरचा त्यांनीही विरोध करावा, अशी मागणी आज पारंपरिक टॅक्सीचालकांनी केली. पर्रा येथे झालेल्या चर्चेवेळी टॅक्सीचालक व आमदारांमध्ये खटकेही उडाले.
काही टॅक्सीचालकांनी आमदारांसमक्ष प्रस्तावित कॅब ॲग्रिगेटर धोरणाच्या राजपत्राची प्रत फाडून रोष व्यक्त केला. प्रसंगी आमदारांच्या दारावर बसून भीक मागणार, असा इशाराही टॅक्सीचालकांनी दिला. राज्य सरकारच्या प्रस्तावित 'कॅब ॲग्रिगेटर धोरणा'च्या विरोधात सध्या स्थानिक पारंपरिक टॅक्सीचालकांनी दंड थोपटले आहेत. या अनुषंगाने संबंधित टॅक्सीचालकांनी आरपारच्या लढाईसाठी एकजुटीची वज्रमूठ केली असून सदर धोरण रद्दच करावे, या मागणीवर ते ठाम आहेत.
या विरोधाचा भाग म्हणून, मंगळवारी (०३ मे) कळंगुट व शिवोली दोन्ही मतदारसंघातील टॅक्सीचालकांनी आमदार मायकल व दिलायला लोबो यांची त्यांच्या पर्रा येथील निवासस्थानी भेट घेतली.
यासंदर्भात बोलताना टॅक्सीचालक नेते योगेश गोवेकर म्हणाले, कॅब ॲग्रिगेटरला आमचा कडाडून विरोध आहे. मुळात ॲग्रिगेटर धोरण हे पारंपरिक टॅक्सीचालकांची उपजीविका संपविण्यासारखी आहे. कॅब ॲग्रिगेटर धोरण चालीस लागल्यास आमचे अस्तित्व संपेल.
राजकारण करू नये
लोकप्रतिनिधींनी आम्हाला अपेक्षित साथ दिली नाही किंवा आमच्या तोंडाला पाने पुसल्यास, आगामी विधानसभेत राजकारण काय असते, ते दाखवू, कारण कोणीही टॅक्सीचालकांच्या उपजीविकेशी राजकारण करू नये, असा सज्जड इशारा संतप्त टॅक्सीचालकांनी यावेळी दिला.
त्याचप्रमाणे, आमदारांनी तोडगा काढण्यासाठी आमची साथ न दिल्यास, आम्ही भविष्यात आमची रणनीती स्पष्ट करू आणि आमदारांच्या दारावर बसून भीक मागणार, असा इशारा जमलेल्या टॅक्सीचालकांनी दिला.
टॅक्सी भाडेदरात पारदर्शकता हवी
- टॅक्सी व्यवसायाच्या व्यवहारात पारदर्शकता महत्त्वाची आहे. कारण पर्यटक परत जातेवेळी, ते चांगल्या आठवणींने माघारी जावे, अशी सरकारची भावना आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकांची मालिका सुरू करणार आहोत, कारण चर्चेतून तोडगा येईल.
- आम्ही पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहोत, त्यामुळे ग्राहक या नात्याने पर्यटक काय बोलतात याची आम्हाला कल्पना आहे. यासाठी पारदर्शकता हवी. राज्यात दर्जेदार व चांगले पर्यटन हवे असल्यास काही गोष्टी नियमानुसार हव्यात, अशी प्रतिक्रिया टॅक्सीचालकांनी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार मायकल लोबोंनी यावेळी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.