वाळपई : सत्तरी तालुक्यात रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी, बागायतदार अगदी त्रस्त बनलेले आहेत. नारळ, काजू, अननस अशी उत्पादने घेताना प्रचंड घट होऊन पर्यायाने बागायतदारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते आहे.
काजू, नारळ, सुपारी पिकाबरोबरच केळी हे एक फळ उत्पादनही तेवढेच मोलाचे ठरले आहे; पण मागील काही वर्षांपासून खेती, माकड या प्राण्यांपासून केळी पीक घेण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत. खेतीपासून कसे पीक सुरक्षित ठेवावे या विवंचनेत बागायतदार वर्ग नेहमीच असतो; पण बागायतीत हे वन्यप्राणी वावरतानाचे निरीक्षण केल्यास त्यावर उपाय तयार होईल हे नवलच म्हणावे लागेल.
सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील सातोडे गावातील बागायतदार विनोद बर्वे यांनी मात्र वन्यप्राण्यांच्या हालचालींच्या पाहणी, निरीक्षणातून एक अनोखा उपाय केला व आता तो यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
विनोद बर्वे यांची वडिलोपार्जित बागायती आहे. नारळ, मिरी, केळी, सुपारी अशी बागायती पिके त्यात आहेत. पण ही पिके घेताना खेती या वन्यप्राण्यांच्या प्रचंड त्रासामुळे पिकाला बराच फटका बसत असे. हजारी, वेलची, सालदाटी अशा जातींचे केळी पीक सुपारी, नारळ या मुख्य पिकात आंतरपीक म्हणून अनेक वर्षापासूनच घेत होतेच.
अशावेळी सात-आठ वर्षांपूर्वी बागायतीत फिरत असताना खेती हा वन्यप्राणी हजारी (चवीला आंबट गोड म्हणून ओळख) या केळीच्या घडावर डल्ला मारीत असताना पाहिले. तर हजारी जातीची कच्ची केळी खाताना खेत्याला त्रास होत होता हे पाहणीतून निदर्शनास आले. हजारी जातीची कच्ची केळी ही अधिक घट्ट व जास्त डींक (दीक) असल्याने ती खाताना खेत्यांच्या घशाला अडकत होती व खेती ही केळी टाकून जात होती. मात्र, सालदाटी केळी पूर्ण फस्त करायचे.
त्यावेळी बर्वे यांनी बागायतीत केळीच्या लागवडीत विशिष्ट रचना करण्याचे ठरविले आणि सीमा भागात विशेष करून खेती येण्याच्या मार्गावर चारही बाजूंनी हजारी जातींची चवीला आंबट गोडी असलेल्या केळीची लागवड केली. मधल्या भागात सालदाटी अशी अन्य जातीची लागवड केली.
यामुळे परिणाम असा झाला की खेती सीमा भागातील हजारी केळींना खाण्याचा प्रयत्न करू लागले; पण ही जात खाण्यास योग्य नसल्याचे पाहून निघून जायचे. त्यामुळे मधल्या भागातील केळी पीकही सुरक्षित राहू लागले आहेत. तसेच खेती येण्याचे प्रमाणही आता कमी होऊ लागले आहे. हा बर्वे यांचा प्रयोग आता भविष्यात सर्वांसाठीच खेती प्राण्यांपासून बचावासाठी एक आशादायी ठरणारा आहे.
बाजारपेठेत सालदाटी या गोड जातीच्या केळ्यांना प्रतिकिलो ४५ रुपयांपर्यंत दर मिळतो; पण हजारी जातीच्या आंबट-गोड केळ्यांना अगदी कमी दर मिळतो. खेत्यांना हजारी जातीची केळी खाण्यास त्रासदायक ठरत असल्याचे दिसल्यावर बागायती जागेत सीमारेषेवर ‘हजारी केळ्यांची’ लागवड केली. त्यामुळे मधल्या जागेत खेत्यांचे येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसले, असे विनोद बर्वे यांनी सांगितले.
खेती प्राण्यांचे अधिक करून जुलै ते डिसेंबर या महिन्यांत जास्त आक्रमण असते. उन्हाळ्यात फणस, काजू बोंडू अशा अन्य पिकांवर डल्ला मारल्यानंतर शेवटी रुंबडाची फळे खातात. तर जुलैपासून केळी अशा पिकांवर ती मोर्चा वळवितात.
दर शनिवारी परिपक्व झालेल्या केळी घडांची काढणी केली जाते. केळी घडांची योग्य ती प्रतवारी करून, वजन करून बाजारपेठेत केळीचे घड विक्रीसाठी पाठविले जातात.
कुळागरात मोठमोठी नैसर्गिक झाडे ही खेती, माकडांचे आश्रय स्थान असते. म्हणून बागायतीतील या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे किंवा ती काढून टाकणेही गरजेचे आहे. कारण अशी मोठी झाडे खेती, माकडांना रात्रीचे आश्रयस्थान ठरतात.
पिकलेल्या हजारी जातीच्या केळ्यांना जास्त किंमत मिळत नसल्याने न पिकलेल्या केळ्यांचे चिप्स, वेफर्स करून बाजारपेठेत विक्री केली जाते. ते लाभदायी आहे. पर्यायाने चांगल्या गोड केळ्याना खेत्यांपासून संरक्षण मिळण्यास सहकार्य मिळते. तसेच एक कामगारही केळी पिकांकडे लक्ष ठेवण्यासाठी बागायतीत भटकंतीसाठी ठेवला जातो.
हा प्रयोग चांगला झाला आहे; पण ज्यांना अशाप्रकारे लागवड करायची असेल त्यांच्याकडे मोठे क्षेत्र असलेली बागायती हवी आहे. कारण लहान क्षेत्र असलेल्या जागेत दररोज कामगार ठेवून लोकांना व्यवस्थापन करणे शक्य होणार नाही. ती खर्चिक बाब आहे. मोठ्या जागेत असा प्रयोग जरूर करावा, असे विनोद बर्वे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.