Vishwajit Rane वडिलांनी सत्तरी मतदारसंघ असताना ग्रामीण भागाचा रस्त्यांच्या माध्यमातून विकास केला होता. वाळपई, पर्ये मतदारसंघानंतर साहेबांनी पर्येत लक्ष केंद्रित केले. त्यानंतर वाळपई भागात विकास रखडला, पण आपण वाळपईतून निवडून आल्यापासून २२ कोटींचे रस्ते केले.
शैक्षणिकदृष्ट्या वाळपईच्या विकासासाठी पावले उचलली. करमळी गावात आपण स्वत: खर्च करून अंगणवाडी बांधली. रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून सत्तरीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
उस्ते - सत्तरी गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरगावच्या सरपंच संध्या खाडिलकर, उपसरपंच रामू खरवत, पंच मामू खरवत, राजेंद्र अभ्यंकर, देवयानी गावकर, नगरगाव जि.पं. सदस्य राजश्री काळे, वाळपई रस्ता विभागाचे साहाय्यक अभियंता शैलेंद्र वेलिंगकर, अभियंते अरविंद सावईकर, विनोद शिंदे आदी उपस्थित होते.
उस्ते गावातील विविध वाड्यांवरील घरांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागात सरकारने रस्ता कामाच्या माध्यमातून अनेक गावे जोडली आहेत. अंगणवाडी, प्राथमिक शाळा सुधारण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतलेला आहे.
आरोग्य सेवेत सुविधा तयार केलेल्या आहेत. कॅन्सरवर मात करण्यासाठी लोकांना सेवा मिळावी म्हणून मुंबईतील टाटा इस्पितळाशी करार केला आहे. जेणेकरून लोकांना मोफत आणि चांगली सेवा मिळेल, असे राणे म्हणाले.
लहान शस्त्रक्रियेसाठी खासगी इस्पितळाशी करार
वाळपई सरकारी आरोग्य केंद्रात लहान शस्त्रक्रिया होण्यासाठी खासगी इस्पितळाशी करार करून मोफत सेवा सुरू केली जाणार आहे. वाळपईत बुधवारी, शुक्रवारी गोमेकॉची ओपीडी सेवा सुरू आहे.
तेथे दरवेळी सहाशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. कॉल सेंटरच्या माध्यमातून घरोघरी सेवा पोचविण्यासाठी वाळपईत केंद्र सुरू करणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले आहे.
आयव्हीएफ पद्धतीने मोफत उपचार:
अनेक वर्षे लग्न होऊन मूल होत नसल्याने शेवटी पती पत्नी खासगी इस्पितळात उपचार घेतात व तेथे लाखो रुपये खर्च येतो. त्यावर आता आयव्हीएफ पद्धतीने मोफत उपचार केले जाणार असून त्याची नोंदणी १ सप्टेंबरपासून होणार आहे, असे राणे म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.