

फोंडा: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, गोवा प्रभारी आतिषी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बहुजन समाजातील सामाजिक कार्यकर्ते आणि नेते गीतेश नाईक यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
१५ वर्षांहून अधिक काळ सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गीतेश नाईक यांनी अनेक समर्थकांसह पक्षात प्रवेश केला, ज्यामुळे फोंडा मतदारसंघात ‘आप’ ची तळागाळातील ताकद अधिक मजबूत झाली आहे. गीतेश नाईक यांच्या पक्षप्रवेशा वेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आप हा एकमेव असा पक्ष आहे जो लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करतो, तर दुसरीकडे इतर पक्ष लोकांचे पैसे लुटण्यात गुंतलेले आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘आप’ सरकारने मोफत वीज, पाणी, शिक्षण आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा दिली आहे. हाच विकासाचा मॉडेल फोंडा व संपूर्ण गोव्यात आणण्याचा पक्षाचा निर्धार आहे. तसेच येणाऱ्या पोटनिवडणुकीत फोंड्यातून आपचा तिसरा आमदार निवडून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले, ‘आप’ कामाच्या राजकारणावर विश्वास ठेवतो. फोंड्यातील रुग्णालयांची स्थिती, रस्ते, प्रशासन आणि सांडपाणी व्यवस्थेचे प्रश्न सोडवले जातील. आम आदमी पार्टी गोवा युनिटने पुन्हा एकदा फोंडा तसेच संपूर्ण राज्यातील लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्याची आणि स्वच्छ, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्याची आपली बांधिलकी व्यक्त केली.
पक्षात प्रवेश केल्यानंतर गीतेश नाईक यांनी सांगितले, फोंड्याच्या विकासासाठी ते अधिक जोमाने काम करण्यास उत्सुक आहेत आणि आम आदमी पार्टीचा भाग असल्याचा त्यांना आनंद आहे. त्यांनी पुढे सांगितले, आपचा पाठिंबा, अरविंद केजरीवाल यांचे मार्गदर्शन त्यांच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि लोकसेवेसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यास मदत करेल. आप गोवा प्रभारी आतिशी यांनी गीतेश नाईक यांच्या बहुजन समाजातील नेतृत्वाचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले.
मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थानाला आज बुधवारी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गोवा प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आम आदमी पक्षात प्रवेश घेतलेले फोंड्यातील गितेश नाईक व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत मंगेशीला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. केजरीवाल म्हणाले, आपण गोमंतकीयांच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी श्री मंगेशाकडे मागणे मागितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.