Goa Tourism
Goa Tourism Gomantak Digital team
गोवा

Goa Rural Tourism : लोकसहभागातून 'ग्रामीण पर्यटन' मॉडेल !

सुशांत कुंकळयेकर

Margao Rural Tourism : सध्या गोव्यात निसर्ग पर्यटन (इको टुरिझम) हा प्रकार बऱ्यापैकी रुजला असतानाच आता त्यात नव्या प्रकाराची भर पडत असून स्थानिक लोकांच्या सहभागातून ‘ग्रामीण पर्यटन’ ही नवीन संकल्पना आता दक्षिण गोव्यातील धारबांदोडा या तालुक्यात रुजू लागली आहे.

तळदे साकोर्डा या गावात हे नवीन पर्यटन मॉडेल बऱ्यापैकी यशस्वी झाल्यानंतर आता किर्लपाल दाबाळ येथे हा प्रयोग सुरू असून स्थानिक शेतकऱ्यांची कुळागरे हा या नव्या मॉडेलचा ''फोकल पॉईंट'' ठरणार आहेत.

निसर्ग पर्यटनातील सध्याचे प्रचलित नाव असलेले पराग रांगणेकर यांच्याबरोबर गोव्यातील शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञ डॉ. सचिन तेंडूलकर हे दोघे हे मॉडेल राबवीत असून त्यांना स्थानिक शेतकऱ्यांचा भक्कम असा पाठिंबा मिळाला आहे.

या नव्या मॉडेलची माहिती देताना डॉ. तेंडूलकर यांनी सांगितले, की या मॉडेलमध्ये पर्यटकांना अस्सल ग्रामीण गोव्याचे दर्शन घडविले जात असून गावातील कुळागरे, नद्या, यांचे दर्शन घडविण्याबरोबर स्थानिक झाडे, पशू, पक्षी, गावांतील वेगवेगळ्या चालीरीती, सांस्कृतिक उत्सव आदींची पर्यटकांना माहिती दिली जात आहे.

तळदे साकोर्डा येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या ब्राह्मी स्वयंसेवा गटाद्वारे हा पर्यटन उपक्रम चालवला जात असून दाबाळ येथील उपक्रम पुढे नेण्यासाठी २१ शेतकऱ्यांनी येऊन दाबाळ फार्मर्स सेल्फ हेल्प ग्रूप अशी संस्था निर्माण केली आहे.

दाबाळ येथील हा उपक्रम सध्या प्राथमिक अवस्थेत असल्याची माहिती डॉ. तेंडूलकर यांनी दिली. या दोन्ही प्रकल्पांना मिनरल फाऊंडेशन या संस्थेचा पाठिंबा लाभला आहे.

या उपक्रमाची माहिती देताना डॉ. तेंडूलकर म्हणाले, ज्या पर्यटकांना गोव्यातील समुद्र किनारे आणि मंदिरांव्यतिरिक्त अन्य काही माहीत नाही, त्यांना अस्सल ग्रामीण गोव्याचे दर्शन घडविणे आणि स्थानिक शेतकऱ्यांनाही या उपक्रमाचा लाभ मिळून त्यांच्या उत्पन्नात भर पडावी, असा आमचा दुहेरी हेतू आहे.

दाबाळ येथे सुरू होणाऱ्या प्रकल्पाबद्दल माहिती देताना डॉ. तेंडुलकर म्हणाले, या भागातील नदीच्या किनारी असलेल्या २१ बागायतदारांना एकत्र करून त्यांच्या कुळागरांचा वापर या पर्यटन वृद्धीसाठी केला जाणार आहे.

या उपक्रमात पर्यटकांना कुळागरातील विविध प्रकारची झाडे दाखविण्याबरोबरच त्यांचा उपयोग, महत्व याची माहिती पर्यटकांना करून देण्यात असून नंतर जवळ असलेल्या नदीतून पर्यटकांना कयाक बोटीतून सैर करून नदीतील मासे, प्राणी, नदीच्या काठावरील पक्षी यांची माहितीही पर्यटकांना करून दिली जाणार आहे. या पर्यटकांना अस्सल गोमंतकीय पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.

या पूर्वी रांगणेकर आणि तेंडूलकर या द्वयीने असाच प्रयोग सध्या गोव्यातील ‘स्ट्रॉबेरी सिटी’ म्हणून लोकप्रियता पावलेल्या नेत्रावळी अभयारण्यात असलेल्या वेर्ले या गावात केला होता.

'आंगण' या संकल्पनेखाली गावातील लोकांच्या घरात पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ हा प्रकार सुरू केला होता. त्या वेळीही त्यांनी ग्रामीण सहभाग हीच संकल्पना डोळ्यांसमोर ठेवली होती. आता हाच प्रयोग त्यांनी धारबांदोडा तालुक्यात सुरू केला आहे.

कुळागर महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामीण पर्यटनाचा भाग म्हणून डॉ. सचिन तेंडुलकर यांच्या गटाने दाबाळ येथे चार महिन्यांपूर्वी कुळागर महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी पर्यटकांसाठी कुळागरातून उत्पादित केलेले जिन्नस, फळे आदींसह अन्य वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.

या कुळागर महोत्सवाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने हे सर्व जिन्नस त्यावेळी हातोहात खपले, अशी माहिती डॉ. तेंडूलकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SC ने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपाताची परवानगी देणारा आदेश घेतला मागे; वाचा नेमकं काय घडलं?

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

SCROLL FOR NEXT