Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

Khari Kujbuj Political Satire: राज्यातील वीज दरवाढीवर ‘गोवा फॉरवर्ड’चे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी वीज मंत्री सुदिन ढवळीकरांवर टीका केली.

गोमन्तक डिजिटल टीम

भाऊ, किती खड्डे बुजविले?

राज्य सरकारने परवा रस्त्यावर पडलेले खड्डे पंधरा दिवसात बुजविले जातील, असे जाहीर केले होते. पण अजून कुठे ते काम काही सुरू झालेले दिसत नाही. त्यापूर्वी ‘साबांखा’ मंत्री दिगंबर कामत यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो पाठवा, तो खड्डा चोवीस तासांत बुजवला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर किती खड्डे बुजविले, अशी विचारणा होत आहे. प्रत्यक्षांत राज्यात कुठेच असे काम सुरू असल्याचे दिसत नाही, त्यामुळे कामत बाबांकडे कोणी फोटो पाठविलेले नाहीत, की लोकांचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असा प्रश्न पडतो. काही जण तर कामत यांनी अन्य भागांत नको पण मडगाव, फातोर्डा व नावेली या त्यांच्या शेजारच्या मतदारसंघातून फिरून रस्त्यांची अवस्था पहावी म्हणजे वेगळ्या फोटोंची गरज भासणार नाही, असे म्हणत आहेत. एरवी गणेश चतुर्थीपूर्वी रस्ते दुरुस्त केले जात होते. पण यंदा चतुर्थी नव्हे तर दसराही उलटला व आता दिवाळी दारांत आहे, असे असताना रस्ते दुरुस्तीची कोणतीच चिन्हे नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ∙∙∙

वीज दर अन् टीकाटिप्पणी

राज्यातील वीज दरवाढीवर ‘गोवा फॉरवर्ड’चे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी वीज मंत्री सुदिन ढवळीकरांवर टीका केली. राज्यातील एक ज्येष्ठ मंत्री म्हणून सुदिन यांच्याकडे पाहिले जाते. सुदिन यांना झालेली टीका पचनी पडली नाही, त्यांनी कामत यांच्यावर पलटवार केला. ते ज्या कर्नाटकातून आले आहेत, त्या कर्नाटकातील वीज दर सांगावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. असो सुदिन मुरब्बी राजकारणी, कोणाला कोठे आणि काय टोमणे मारायचे ते बरोबर ते मारतात. कामत यांना त्यांनी अजूनही बरेच काही टोमणे मारलेत. असो कामतही हजरजबाबी म्हणून ओळखले जातात, आता ते ढवळीकरांना काय आणि कधी उत्तर द्यायचे याचा नक्कीच अभ्यास करत असतील नाही का? ∙∙∙

जेनिटोच्या जामिनाला हरकती?

जेनिटो कार्दोजच्या जामीन अर्जाभोवती सध्या राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात सुरु असलेली चर्चा खूपच लक्षवेधी आहे. जामीन मिळेल की नाही, यापेक्षाही त्यावर दाखल होणाऱ्या हरकतींमुळे या प्रकरणाला अधिक महत्त्व आले आहे. सुरुवातीला, रामा यांनी जेनिटो यांच्या जामीन अर्जावर हरकत दाखल करून एका प्रकारे या प्रकरणाला तोंड फोडले. आता चर्चा अशी आहे की, या पाठोपाठ अजून दोन हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. या हरकती खरंच दाखल होणार की, ही केवळ अफवा आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ∙∙∙

पोलिसांवरील वाढता दबाव

राजधानी पणजीत घडलेल्या दोन धक्कादायक घटनांमुळे सध्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी, म्हापसा दरोडा प्रकरणात वापरलेली संशयास्पद कार अटल सेतू पुलाखाली सापडली. हा प्रकार ताजा असतानाच, दुसऱ्याच दिवशी याच पुलाच्या शेजारील मुंबई लाईन बसस्थानकावर एक महिला मृतावस्थेत आढळली. एकाच परिसरात २४ तासांच्या आत अशा दोन गंभीर घटना घडणे हा केवळ योगायोग आहे की, वाढत्या गुन्हेगारीची ही धोक्याची घंटा आहे, याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनांमुळे एक गंभीर निष्कर्ष लोकांकडून काढला जात आहे. ‘राज्यात काहीही होवो, पण पोलिस काम करत नाहीत!’ हा आरोप अत्यंत संवेदनशील आहे. नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली की, त्याचा थेट परिणाम पोलिस प्रशासनाच्या प्रतिमेवर होतो. जनतेचा हा असंतोष आणि अविश्वास दूर करणे, हे आता पोलिसांपुढचे मोठे आव्हान आहे. ∙∙∙

विजय काय करणार?

गत विधानसभा निवडणुकीपासून आपल्‍या ‘गोवा फॉरवर्ड’ ची काँग्रेसशी युती आहे आणि पुढच्‍या निवडणुकीपर्यंत ती कायम राहील, असे म्‍हणत ‘गोवा फॉरवर्ड’चे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई आगामी जिल्‍हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आपल्‍याशी युती करेल, या आशेवर आहेत. पण, काँग्रेस युतीसंदर्भात इतर पक्षांना शेवटच्‍या क्षणापर्यंत तिष्ठत ठेवते आणि अखेरच्‍या क्षणी युतीचा निर्णय घेऊन आपल्‍या पदरात जास्‍तीत जास्‍त जागा पाडून घेते, त्‍यामुळेच काँग्रेससोबत न जाण्‍याचा निर्णय आम आदमी पक्षाने (आप) घेतल्‍याचे दिल्लीच्‍या माजी मुख्‍यमंत्री तथा आपच्‍या गोवा प्रभारी आतिषी यांनी आधीच स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यामुळे विजय आतिषींचे ऐकून वेगळ्या मार्गावरून जाणार? की काँग्रेसवरील विश्‍‍वास कायम ठेवणार? याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.∙∙∙

आणि अचानक प्रसाद गावकर प्रकटले!

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे.सांगे पालिकेचे नगरसेवक मेश्यू व सांगेचे आमदार सुभाष फळ देसाई यांच्यातील विळ्या भोपळ्याचे सख्य सगळ्यांना माहीत आहे. आता सुभाष फळ देसाई यांचा रामा काणकोणकर यांच्याशी कोणताही संबंध नसताना सुभाष फळ देसाई यांच्याशी वैर असलेल्या काही बोटावर मोजण्या इतक्या हितशत्रूंनी सांगे येथे मेणबत्ती फेरी आयोजित करून काणकोणकर यांच्यावर झालेल्या अन्यायावर आवाज उठविण्याचे सोडून सुभाष फळ देसाईंवर फोग काढला. या मेणबत्ती सभेला नावेलीच्या मॅडम प्रतिमाही उपस्थित होत्या. आता मेश्यू व मॅडम प्रतिमा यांचे समजू शकतो.त्या दोघांनी या पूर्वी उशी व चादर घेऊन आंदोलन केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून गायब झालेले प्रसाद गावकर हे अचानक या मेणबत्ती सभेत प्रकटलेले पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक. माजी आमदार असलेले प्रसाद गावकर निवडणूक हरल्यानंतर अज्ञातवासात गेले होते. मेश्यूचे मित्र असलेले प्रसाद यांनी यावेळी भाषणही ठोकले. आज लोक कमी आहेत म्हणून हरकत नाही. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत दहा चे दहा हजार होणार, असा भाबडा विश्वास प्रसाद यांनी आपले मित्र मेश्यूला दिला. प्रसादबाब ‘मोडलेल्या खुर्साक कोण चेपे काडीना’ ही म्हण आपण ऐकली नाही का? ∙∙∙

कला मंदिरबाबत ‘पात्रांव’ चूप कसे?

फोंड्याचे राजीव गांधी कला मंदिर हे पात्रांव रवी नाईक यांचे लाडके अपत्य. २००२ साली ते उपमुख्यमंत्री असताना त्यांनी हे कला मंदिर विपरीत परिस्थितीत अस्तित्वात आणले होते. पण आता गेली सव्वातीन वर्षे या कला मंदिराला कार्यकारिणी समितीच नाही. गोविंद गावडे यांच्यानंतर आता रमेश तवडकर यांच्या हाती कला संस्कृती खात्याचे सुकाणू आले आहे. पण या कला मंदिराच्या नशिबी काही नवी समिती येताना दिसत नाही. यामुळे सध्या या मंदिराला अवकाळा प्राप्त झाली असून कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती दिसू लागली आहे. हे कला मंदिर फोंडा मतदारसंघात येत असल्यामुळे समिती स्थापनेबाबत या मतदारसंघाचे आमदार तथा कला मंदिराचे प्रणेते म्हणून रवी पात्रांवाचा पहिला अधिकार ठरतो. यामुळे सगळे जाऊ द्या, पण ‘पात्रांव याबाबतीत चूप कसे?’असे फोंड्यातील लोक विचारू लागलेत. पात्रांवानी मनावर घेऊन कला मंदिराचे गाडे एकदाचे मार्गावर लावावे असेही लोक बोलू लागलेत. आता बघू ‘पात्रांव’कधी मनावर घेतात ते!∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

Goa Temples: ‘कोकणाख्याना’त गोव्याचे निर्माण परशुरामाने बाण मारून केल्याचा उल्लेख होतो; धर्मस्थानांच्या दंतकथा

Goa Live News: पुढील 15 दिवसांत 'खड्डा' हा शब्द ऐकू येणार नाही: बांधकाम मंत्री दिगंबर कामत

IFFI 2025: 'कोमात असताना स्वप्नात खोल समुद्र, घनदाट जंगल दिसायचे', पेस्कॅडोर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितली निर्मितीमागची रंजक कथा

Goa Revenue: स्‍टँप ड्युटीतून मिळणाऱ्या महसुलात घट! अहवालातील आकडेवारीतून उघड; GST वरील करांत मात्र वर्षभरात वाढ

SCROLL FOR NEXT