Goa Revolution Day
Goa Revolution Day Dainik Gomantak
गोवा

Goa Revolution Day 2024: क्रांती दिवस व मुक्ती चळवळीचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Revolution Day 2024

आज १८ जून. गोवा क्रांती दिवस. गोवा मुक्ती संग्रामाची ठिणगी राम मनोहर लोहिया या शूर तेजोनिधी योद्धयाने पेटवली. मडगांवला झालेल्या सभेत त्यांनी घणाघाती भाषण करून पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरूध्द बंड ठोकले.

गोवेकरांना मुक्तीसाठी चळवळ सुरू करण्याचे आवाहन केले. गोवा मुक्ती चळवळीला दिशा मिळाली ती १८ जून १९४६ या दिवशीच्या सभेने. नंतर घडला तो इतिहास.

१८ जूनला चळवळीला दिशा मिळाली. स्वातंत्र्यसैनिकांनी रान पेटविले. त्याग, बलिदान, संघर्ष, आंदोलने झाली. कालांतरानं १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाला.

काही वर्षापूर्वी या ऐतिहासिक लोहिया मैदानावर मुलांना क्रांती दिवसाची माहिती कळावी या हेतूने स्वातंत्र्यसैनिकांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. विविध स्पर्धा होत्या. त्यात एक प्रश्नमंच स्पर्धा होती. मी त्या काळी विविध विषयांवर क्वीज घेत होतो. गोवा विषय व गोवा मुक्ती चळवळ या विषयावर जास्त. या स्वातंत्र्यसैनिकांनी मुकेशबाब, तुम्ही या, क्वीज घ्या, असा आग्रह धरला. प्रचंड पाऊस पडत होता. मी गेलो.

लोहिया मैदानावर सुंदर नियोजन करून तयारी केली होती. पाहुणचार पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मधुबाब मोर्डेकर, वसंतबाब मळयो, गुरूनाथबाब केळेकार व इतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी मला आत त्यांच्या कक्षात नेऊन बसवले. व्यक्तिगतरित्या आग्रह करून चहा दिला. गरमागरम बटाटवडे घे मुकेशबाब, असं प्रत्येक जण सांगत होता. मला सगळंच ऑकवर्ड भासलं. त्यांचा उत्साह व प्रेम ओसंडून वाहत होतं. माझे मित्र विनायक मोर्डेकर हे सुध्दा आयोजनात मदत करत होते.

वेळेवर त्यांनी कार्यक्रम सुरू केला. क्वीज कार्यक्रम रंगला. प्रेक्षकांना अनुत्तरीत प्रश्न विचारून मी रंगत भरली. प्रत्येक उत्तरासोबत माहिती दिली. गोवा मुक्ती चळवळीची एक झलक, एक आलेख यांचं चैतन्य तिथं उभं झालं. पालक तर आत्यंतिक खुष झाले. क्वीज कार्यक्रम मी खूप घेतले. पण हा, मनात कोरला गेला. स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रेमामुळे.

त्या पिढीचा जो त्याग आहे, कष्ट आहेत, जिद्द, चिकाटी यांचं आपण मूल्य ठरवू शकत नाही. त्यांचं मनुष्यत्व जे आहे तेही शब्दांच्या पलीकडलेच. गोव्याचं गोंयकारपण शाबूत राखलं पाहिजे असं काही स्वातंत्र्यसैनिकांनी बोलून दाखवलं व खटकणाऱ्या गोष्टींचाही उल्लेख केला.

आज आपण १८ जून क्रांती दिवस व मुक्ती चळवळीचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. त्यासाठी अत्याधुनिक माध्यमं आली आहेत.

मुक्ती चळवळीचे टप्पे सांगणारे वा सादर करणारे छोटे विडियो युट्युब वर गेले पाहिजे. मुलांच्या सोप्या भाषेत ते जायला हवेत. आज मुलं स्मार्टफोन हाताळतात. त्यांना या माध्यमातून अऩेक गोष्टी शिकवता येतात.

युट्युब आणि युट्युबर आज लोकप्रिय होत आहेत. यूट्यूब वर व्हिडिओ पाहायला तर सर्वांना आवडते. कारण हा विषय फक्त पाहण्याचाच आहे. याच यूट्यूब च्या माध्यमातून अनेक लोकांनी आपल करिअर सुद्धा बनवलं आहे. यूट्यूब पूर्ण जगामध्ये गूगल नंतर सर्वात जास्त वापरला जाणारं सर्च इंजिन आहे.

१४ फेब्रुवारी २००५ या दिवशी युट्यूबची स्थापना युएस मध्ये झाली होती. एक काळ होता जेव्हा लोक कोणताही कार्यक्रम पाहण्यासाठी टीव्ही ची वाट बघत होते. परंतु यूट्यूब मुळे हे अगदी सोपे झाले आहे. आता पूर्ण जगामध्ये 2 अब्ज लोक यूट्यूबचा वापर करतात. प्रत्येक मिनिटाला यूट्यूब वर जवळजवळ ४00 तासांचे व्हिडिओ अपलोड केले जातात.

दररोज यूट्यूब वर ५ अब्ज पेक्षा जास्त व्हिडिओज पाहिले जातात. ज्याप्रमाणे यूट्यूब ची प्रसिध्दी वाढत आहे ते पाहिलं तर तज्ञांचं भाकीत आहे की पुढील वर्षाच्या अखेर पर्यंत ३२ वर्षाच्या खालील कोणीही टीव्ही चॅनल पॅक खरेदी करणार नाही. जगातील चीन, इराण आणि उत्तर कोरिया हे असे देश आहेत जेथे यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी बंदी आहे. युट्युब वर पाहिले जाणारे 70 टक्के व्हिडिओ हे मोबाईलच्या माध्यमातून पाहिले जातात.

लोक युट्युबवर एक अब्ज पेक्षा जास्त तास दररोज व्हिडिओ पाहतात. जे की फेसबुक आणि नेटफ्लिक्स यांच्या व्हिडिओ पेक्षा जास्त आहे. युट्यूबवर दररोज सरासरी एक अब्ज मोबाईल व्हिडिओ व्ह्यूज येतात. या वरून त्याची लोकप्रियता दिसून येते.

ही लोकप्रियता लक्षात घेऊन, गोव्यातील युट्युबरानी मुलांसाठी प्रश्नमंच म्हणजे क्वीज स्वरूपात गोवा क्रांती दिवस, राणेंचं बंड, पिंटोंचं बंड व इतर टप्पे दाखवणारे प्रभावी विडीयो बनवून ते युट्युबवर टाकले तर सर्वांना ही मुक्ती चऴवळ ज्ञात होईल.

स्वातंत्र्यसैनिकांची चरीत्रं देऊ शकतात. काही ऐतिहासिक स्थळांची माहिती त्यात देऊ शकतो. या विडियोत योग्य पार्श्वसंगीत घेऊन व निष्णात निवेदकाच्या सहाय्याने हे करता येणं शक्य आहे. कारण शेवटी आपणाला ही माहिती पोहोचवायची आहे. पाहणं हे वाचण्यापेक्षा सोपं ज्यामुळे युट्युब विडीयो इतके फोफावले आहेत.

पत्रादेवी पेडणेचं महत्व, ऑपरेशन विजय व इतर अनेक विषयांवर छोटे छोटे विडियो करायला वाव आहे.

आमच्याकडे गुणी कलाकार आहेत. संहिता लेखक आहेत. उदंड उत्साह आहे. हे सर्व व्हावं असं मला वाटतं. काही वर्षाअगोदर आम्ही एका टीव्ही चॅनलसाठी अशा लहान टेलीफिल्म्स केल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. आज तंत्रज्ञानात क्रांती होत आहे. त्याचा वापर करून ज्ञान क्षेत्रात कांती चमकावी म्हणून हे प्रयत्न व्हावेत असं वाटतं.

भावा तुका याद आसा अठरा जून, हे मनोहराय सरदेसाय यांचं गीत सब टायटल्स देऊन विडीयो रूपात संगीतबध्द केलं पाहिजे. १८ जून १९४६ हा मंगळवार होता आणि बाकीबाबांची त्रिवार मंगळवार ही कविता या मुक्ती चळवळीत गाजली. ती सुध्दा गीत रूपात विडियो रूपात मुलां पर्यंत पोचली पाहिजे. गोव्यात अऩेक क्षेत्रात क्रांती झाली आहे, होऊ घातली आहे. गुणवत्तापूर्ण तेजोमय कांती झळाळली पाहिजे.

- मुकेश थळी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT