पणजी: गोवा जमीन महसूल संहिता, १९६८ नुसार महसूल खात्याने सचिवालयाबाहेरील उत्तर, दक्षिण आणि कुशावती या तिन्ही जिल्ह्यांची जिल्हाधिकारी कार्यालये तसेच बंदोबस्त व भूमी अभिलेख खात्याच्या ‘क’ गटातील कर्मचाऱ्यांसाठी कॉमन केडर गठीत केले आहे. त्यामुळे ‘क’ गटात मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होईल.
खात्याचे अवर सचिव आग्नेल डिसोझा यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. ‘क’ गटासाठी गठीत केलेल्या कॉमन केडरमध्ये अव्वल कारकून, तलाठी, लिपिक, पर्यवेक्षक, सर्वेक्षक, ड्राफ्ट्समन, वाहनचालक, शिपाई आदींचा समावेश असणार आहे. यापूर्वी महसूल खात्यातील काही पदे किंवा कर्मचाऱ्यांची सेवा केवळ ठराविक कार्यालय किंवा जिल्ह्यापुरतीच मर्यादित असायची.
परंतु, कॉमन केडर लागू केल्यामुळे ‘क’ गटात मोडणारे सर्व कर्मचारी एकाच छत्राखाली आले असून, ते संपूर्ण विभागातील किंवा राज्यातील कोणत्याही महसूल कार्यालयात बदली किंवा नियुक्तीसाठी पात्र ठरणार आहेत.
प्रशासनात येणार पारदर्शकता
महसूल खात्यातील कॉमन केडरमुळे संपूर्ण विभागातील किंवा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची एकच सामायिक ज्येष्ठता यादी तयार होणार आहे. पदोन्नती देताना कोणावरही अन्याय होणार नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना सामायिक नियमावली पाळली जाणार असल्याने प्रशासनात पारदर्शकता येण्यास तसेच एखाद्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यास कॉमन केडरमधील कर्मचाऱ्यांची तिथे सहज बदली करून प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यास मदत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.