मडगाव: ज्येष्ठ वकील ॲड. जयंत प्रभू यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणानंतर गोव्यातील वाढत्या आत्महत्या हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मागच्या साडे आठ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास दर दुसऱ्या दिवशी गोव्यात एका आत्महत्येची नोंद होते, असे लक्षात आले आहे. वाढता ताणतणाव आणि आर्थिक विवंचना हीच या आत्महत्या मागील मुख्य कारणे असल्याचे दिसून आले आहे.
मडगाव पोलिसांकडून छळ केला जात असल्याचा दावा करून ॲड. प्रभू यांनी दोन दिवसांपूर्वी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात मडगावच्या महिला उपनिरीक्षक अनुष्का परब आणि अन्य चार अज्ञात पोलिसांविरोधात ॲड. प्रभू यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहितेच्या १०८ कलमाखाली मायणा-कुडतरी पोलिसात गुन्हा नोंद केला असून या प्रकरणात उपनिरीक्षक प्रशांत भगत हे तपास करीत आहेत.
२०१६ ते यंदा २०२४ च्या जून अखेरीस गोव्यात तब्बल २४३५ लोकांनी आत्महत्या केली असून कोविड काळापासून गोव्यातील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. २०१६ ते २०१९ पर्यंत गोव्यात होणाऱ्या आत्महत्यांची एकूण संख्या ३०० च्या खाली असायची. पण २०२० ते २०२३ या चार वर्षांत हा आकडा ३०० च्या वर पोचला असून मागच्या २०२३ वर्षांत सर्वांत जास्त म्हणजे ३०३ व्यक्तींनी आत्महत्या करून आपला जीव गमाविला आहे.
एकाबाजूने गोव्यातील वाढते अपघाताचे मृत्यू हा चिंतेचा विषय बनलेला असतानाच गोव्यातील आत्महत्यांचे प्रमाण या अपघाती मृत्यूच्या बरोबरच असल्याचे दिसून आले आहे. मानसिक आजार, शारीरिक आजारपण, कौटुंबिक तणाव आणि दारूचे वाढते व्यसन ही राज्यातील आत्महत्यांमागील मुख्य कारणे असल्याचे दिसू्न आले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आणि मडगावातील प्रसिद्ध डॉक्टर व्यंकटेश हेगडे यांना त्याची कारणे विचारली असता, समाजातील ढासळती मूल्ये आणि पूर्ण न करता येणार्या अपेक्षा हीच या मागील मुख्य कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. कित्येकवेळा लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ते नैराश्याच्या गर्तेत येतात आणि आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात असे त्यांनी सांगितले.
ॲड. जयंत प्रभू यांच्या पार्थिवावर आज ३१ ऑगस्ट रोजी मडगावच्या स्मशानभूमीत शोकांकूल परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी दोषी असलेल्या पोलिसांवर जोपर्यंत गुन्हा नोंद केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ॲड. प्रभू यांच्या कुटुंबीयांनी घेतली होती. काल रात्री उपनिरीक्षक अनुष्का परब आणि इतरांवर गुन्हा नोंद केल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन आज अंत्यसंस्कार केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.