पणजी: गोव्यात पावसाचा जोर मागील आठवड्यापासून मंदावलेला असून हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर राज्यात फक्त तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी मात्र राजधानीसह काही भागांत पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली.
मागील २४ तासांत राज्यात ३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत हंगामात २९४१.३ मि.मी. म्हणजेच सुमारे ११५.७९ इंच पाऊस पडला असून तो सरासरीच्या तुलनेत सुमारे पाच टक्के अधिक आहे. यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यांत पावसाने दणका दिल्यानंतर ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाचा वेग मंदावला आहे.
हवामान विभागाने कळविले आहे की, पुढील काही दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची चिन्हे कमी आहेत. अरब सागरातील दाबाचे पट्टे आणि वातावरणातील बदलामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे.
दरम्यान, काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्याने तापमानात किंचित घट जाणवली. पण एकूणच राज्यात उकाड्याचे वातावरण असून, दिवसा दमट हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. किनारपट्टी भागांत दुपारी उकाडा अधिक जाणवत आहे.
हवामान तज्ञांच्या मते, सप्टेंबर महिन्यात मान्सून साधारणतः मंदावतो. परंतु ऑक्टोबरपर्यंत राज्यात काही प्रमाणात पावसाच्या सरींची शक्यता कायम असते. आगामी काही दिवसांत तुरळक पावसाच्या सरींची नोंद होईल, परंतु मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.