मडगाव : सासष्टी तालुक्यातील आठ मतदारसंघांपैकी नुवे, बाणावली, कुडतरी व वेळ्ळी हे चारही मतदारसंघ ख्रिस्तीबहुल असून, आजपर्यंत या मतदारसंघांत भाजपला कधीही प्रवेश करता आला नाही. मात्र, २०२२च्या निवडणुकीत एक नुवे मतदारसंघ वगळता अन्य तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला होता. या पार्श्वभूमीवर २०२७च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा हे मतदारसंघ आपल्या ताब्यात आणू शकेल का? यावरच संपूर्ण गोव्याचे राजकीय भविष्य ठरणार आहे.
२०२२च्या निवडणुकीत बाणावली, वेळ्ळी या मतदारसंघांत आम आदमी पार्टीने बाजी मारली होती, तर कुडतरीत अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे निवडून आले होते. फक्त नुवे मतदारसंघात काँग्रेसचे आलेक्स सिक्वेरा जिंकून आले. मात्र, त्यांनीही नंतर भाजपमध्ये उडी मारल्याने सध्या हे चारही मतदारसंघ काँग्रेसच्या हातात नाहीत.
असे जरी असले तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना पडलेली भरघोस अशी मते आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत या चारही मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांना मिळालेले घवघवीत यश पाहता २०२७ मध्ये काँग्रेस आपल्या हातातून गेलेला हा गड पुन्हा आपल्याकडे खेचून आणू शकेल का, हे पाहावे लागणार आहे. या चारही मतदारसंघात यावेळी निवडणूक लढविण्यासाठी बरेच उमेदवार इच्छुक असल्याने मागच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही येथे बहुरंगी लढती होणार, असे सध्याचा रागरंग पाहता दिसून येत आहे.
नुवे मतदारसंघाने फक्त एक अपवाद वगळता प्रत्येकवेळी काँग्रेस उमेदवारालाच साथ दिली आहे. मात्र, २०१७ मध्ये काँग्रेस उमेदवारीवर जिंकून आलेले बाबाशान डिसा आणि नंतर २०२२ मध्ये काँग्रेस तिकिटावर जिंकून आलेले आलेक्स सिक्वेरा या दोघांनीही काँग्रेसमधून भाजपात उडी घेतली. त्यामुळे या मतदारसंघातील मतदार काँग्रेसवर काही प्रमाणात नाराज आहेत. असे जरी असले तरी लोकसभा निवडणुकीत आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या पारड्यात लोकांनी भरभरून मतांचे दान टाकले. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट झाले आहे.
मात्र, काँग्रेसची उमेदवारी मिळणार कुणाला, हाच मोठा प्रश्न आहे. लिंडन मोन्तेरो, पाऊसिलीप डिसोझा, एव्हरसन वालीस हे तिघेजण काँग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न करतात. माजी आमदार बाबाशान डिसा यांनीही नुवे मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची तयारी ठेवली असून सध्या ते आम आदमी पक्षाला जवळ आहेत; पण काँग्रेसने त्यांना उमेदवारी देण्याचे मान्य केल्यास एक प्रबळ उमेदवार म्हणून ते रिंगणात उभे राहू शकतात.
वेळ्ळीचेही चित्र अस्पष्ट; तिरंगी शक्य भाजपात गेलेले आलेक्स सिक्वेरा यांनी आपण पुन्हा एकदा निवडणूक लढविणार, असे जाहीर केले असले तरी त्यांची प्रकृती त्यांना किती साथ देईल यावर सगळे अवलंबून आहे. नुवेतून भाजप उमेदवारीवर निवडणूक लढविणे म्हणजे एकप्रकारे राजकीय आत्महत्या करणे, असे समीकरण असल्याने ते भाजप उमेदवारीवर निवडणूक लढविणार का, हाही एक प्रश्न आहे. नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांनीही आपण निवडणूक लढविणार, असे सांगितले असले तरी ते नुवेतून निवडणूक लढविणार की बाणावलीतून हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.
वेळ्ळी मतदारसंघाचे सध्याचे आम आदमी पक्षाचे आमदार क्रूझ सिल्वा हे असून त्यांनाही मागच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाची वेळ्ळीत अजूनही ताकद आहे की मागच्यावेळी मतविभागणी झाल्यामुळे चुकून हा मतदारसंघ ‘आप’च्या ताब्यात गेला होता, हे यंदाची विधानसभा निवडणूक स्पष्ट करणार आहे.
वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा हेही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशातऱ्हेची शक्यता व्यक्त केली जात असल्याने वेळ्ळीचेही चित्र निवडणुकीला शेवटचे काही दिवस बाकी असतानाच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यमान आमदार क्रूझ सिल्वा यांच्यासह माजी आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष सावियो डिसिल्वा हे रेसमध्ये असलेले उमेदवार आहेत. हा मतदारसंघही परंपरेने काँग्रेससोबत राहिला आहे. मात्र, यापूर्वी चारवेळा या मतदारसंघातून बिगर काँग्रेस उमेदवार जिंकून आलेले आहेत.
बाणावली मतदारसंघ सध्या आम आदमी पक्षाकडे असून व्हेन्झी व्हिएगस हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. बाणावली मतदारसंघात आम आदमी पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांची फळी बऱ्यापैकी उभारलेली आहे, असे चित्र एकेकाळी रंगविले जात होते. मात्र, जिल्हा पंचायत निवडणुकीत बाणावलीतून आम आदमी पक्षाचा उमेदवार जिंकून येऊ शकला नाही आणि कार्यकर्त्यांची फळी असल्याचा ‘आप’ने जो फुगा तयार केला होता तो फुटला.
या पार्श्वभूमीवर २०२७च्या निवडणुकीत बाणावली आम आदमी पक्षाकडे राहणार की पुन्हा काँग्रेसकडे जाणार यासंदर्भात चर्चा सुरू आहे. सध्या राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे, त्याप्रमाणे निवडणूक तोंडावर आल्यानंतर कदाचित व्हेन्झी व्हिएगस हेच काँग्रेस पक्षात सामील होऊ शकतील. त्यामुळे बाणावलीत नेमके काय होणार हे शेवटच्या क्षणीच स्पष्ट होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता ‘आप’चे व्हिएगस यांच्यासह माजी मंत्री चर्चिल आलेमाव, माजी मंत्री मिकी पाशेको, केळशीचे सरपंच डिक्सन वाझ, चर्चिलचे पुतणे वॉरन आलेमाव आणि काँग्रेसचे पॉल लोबो यांची संभाव्य उमेदवार म्हणून नावे घेतली जात आहेत.
कुडतरी मतदारसंघाबद्दलचेही चित्र सध्या अस्पष्ट आहे. आतापर्यंत या मतदारसंघातून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तीनवेळा जिंकून आले आहेत. तिन्हीवेळा ते वेगवेगळ्या पक्षाकडून जिंकून आले होते. यावेळी पुन्हा एकदा ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मात्र, यावेळीही ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार की कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील ते पाहावे लागेल. हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसधार्जिणा मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीतही काँग्रेसने या मतदारसंघातून बाजी मारली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा उमेदवार कोण, याबद्दल चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नेते फ्रान्सिस सार्दिन यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे. मॉरेन रिबेलो यांचेही नाव संभाव्य काँग्रेस उमेदवार म्हणून घेतले जाते. ‘आप’चे रॉक मास्कारेन्हस आणि भाजपच्या डॉ. स्नेहा भागवत यांचेही उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.