पणजी: राज्य विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे आमदार वीरेश बोरकर आणि मनोज परब गटातील वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. परब गटाचे अजय खोलकर यांनी बोरकर यांच्यावर हल्लाबोल चढवताना, ‘‘बोरकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडून तीन कोटी रुपये घेतले आहेत’’, असा आरोप केला. तर, त्यास प्रत्युत्तर देताना ‘‘आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन’’, असे आव्हान दिले आहे.
आरजी’चा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आपण अजय खोलकर यांना पक्षातून निलंबित केले आहे. तरीही ते पक्षाचे नाव आणि चिन्हाचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे, असे आमदार बोरकर यांनी स्पष्ट केले होते. त्यावर खोलकर यांनी सोशल मीडियाचा (Social Media) आधार घेत, ‘‘माझ्याविरोधात कारवाई करा. मी कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्यास तयार आहे. तुम्ही आता गिरीश यांच्याकडून तीन कोटी रुपये घेतले आहेत. त्यामुळे अकाऊंटंट आणि कायदा सल्लागारांचा सल्ला घेणे तुम्हाला सोपे होईल’’, असा आरोप केला.
खोलकर यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना बोरकर यांनी सांगितले की, ‘‘खोलकर यांनी केलेले आरोप खोटे, बिनबुडाचे आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. मी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. तरीही खोलकर माझ्यावर विनाकारण दिशाहीन आरोप करत आहेत. मी गिरीश यांच्याकडून तीन कोटी रुपये घेतल्याचे खोलकर यांनी सिद्ध करून दाखवले तर आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे’’.
अजय खोलकर यांना आपण पक्षातून निलंबित केले असल्याने ते आता ‘आरजी’चे सदस्य नाहीत. खजिनदारपदी असताना खोलकर यांनी पक्षाच्या निधीचा गैरवापर केला. ‘आरजी’चे एकच अधिकृत बँक खाते असून, त्यात सध्या २३,६९९ रुपये इतकी रक्कम आहे, असेही आमदार वीरेश बोरकर यांनी नमूद केले.
अजय खोलकर यांनी केलेले आरोप खोटे, बिनबुडाचे आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. मी कुणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन.
गिरीश चोडणकर यांच्याकडून तुम्ही तीन कोटी रुपये घेतले आहेत. त्यामुळे माझ्यावर कायदेशीर कारवाई करताना तुम्हाला अकाऊंटंट आणि कायदा सल्लागारांचा सल्ला घेणे सोपे होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.