पणजी: (Goa Politics) महाराष्ट्रवादी गोमंतक (MGP) पक्षाने अखेर भाजप (BJP) बरोबरच्या युतीचा प्रस्ताव अधिकृतरीत्या ठोकरला आहे. नवी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि संघटनमंत्री सतीश धोंड यांच्या झालेल्या बैठकीत हा प्रश्न चर्चेला आला व भाजपने ‘एकला चलो’ चा मंत्र जपण्याचे निश्चित केले.
मगोप नेत्याने ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार हा पक्ष स्वतंत्रपणेच निवडणूक लढवेल, परंतु काँग्रेस पक्षाबरोबर काही ठिकाणी समझोता मात्र करणार आहे. जेणे करून दोन्ही पक्षांची मते फुटणार नाहीत. मगोपचा संघर्षाचा पवित्रा व तृणमूल काँग्रेसची धडाकेबाज मोहीम या पार्श्वभूमीवर गोव्यातील नेत्यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला बोलवून घेतले होते. दिल्लीच्या बैठकीत निवडणुकीच्या व्यूहरचनेवर विस्ताराने चर्चा झाली. स्वतः गृहमंत्री अमित शहा दिवाळीनंतर पुन्हा गोव्याला भेट देणार आहेत.
ढवळीकर बंधू-कामत यांच्यात गुप्त बैठक
माहितीनुसार, ढवळीकर बंधूंची हल्लीच काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते दिगंबर कामत यांच्याबरोबर एक गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये युतीपेक्षा काही जागांवर समझोता करण्याचे निश्चित झाले आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा झाली, ती भाजपविरोधात डावपेच आखण्याची. त्यात बार्देश तालुक्यावरही चर्चा झाली. कळंगुटचे आमदार आणि मंत्री मायकल लोबो तसेच अपक्ष आमदार रोहन खंवटे हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याने बार्देश तालुक्यात भाजपविरोधात जोरदार मुसंडी मारणे शक्य असल्याचीही चर्चा बैठकीत करण्यात आली. मगोपला १२ जागांवर उमेदवार उभे करायचे असले, तरी काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यास मगोप व काँग्रेसने काही जागांवर पाणी सोडण्याची तयारी ठेवायला हवी याबाबतीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे ढोबळमानाने एकमत झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.