- गोव्याचे पर्यावरण, कायदा आणि बंदर कप्तान खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
- रमेश तवडकर देखील विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा देऊन मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
- रमेश तवडकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत देखील गुरुवारी (२१ ऑगस्ट) मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
पणजी: राज्य मंत्रिमंडळ फेरबदल अखेर दृष्टीपथात आला आहे. व्यक्तिगत कारण देत आलेक्स सिक्वेरा यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. रमेश तवडकर व दिगंबर कामत यांची मंत्रिपदी वर्णी नक्की असून, उद्या, गुरुवारी दुपारी १२ वाजता शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे बुधवारी (२० ऑगस्ट) रात्री दिल्लीहून गोव्यात परततील. वर्षभर या-ना त्या कारणाने पुढे ढकलला गेलेला मंत्रिमंडळ फेरबदल करण्यास अखेर मुहूर्त नक्की झाला आहे. विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्यासह मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचा समावेश मंत्रिमंडळात नक्की मानला जात आहे. अन्य दावेदार मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर व कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश पुन्हा लांबणीवर पडेल.
लोबो यांना अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीला बोलावून घेतले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या समक्ष त्यांच्याशी राजकीय चर्चाही केली होती. दिल्लीला जाण्यापूर्वी लोबो व आमोणकर यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी बंद दाराआड केलेल्या चर्चेत काय दडले असेल याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
त्यांना मंत्रिपद देणे यावेळी कसे कठीण आहे याची कल्पना दिली असेल असे सांगण्यात येत असले तरी अधिकृतपणे याविषयी कोणीही बोलण्यास तयार नाही. मुख्यमंत्री वस्तू व सेवा कर परिषदेच्या मंत्रिगट बैठकीच्या निमित्ताने आज दिल्लीत आहेत. त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट ठरली आहे.
भाजपमध्ये पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही. सभापतिपदाचा त्याग करून मी उद्या मंत्रिपदाची शपथ घेत आहे.रमेश तवडकर, सभापती
मंत्रिमंडळातील समावेशासंदर्भात आपल्याला मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत.- दिगंबर कामत, आमदार
१) प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना १८ जून रोजी मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर १२ सदस्यीय मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त आहे. ती आदिवासी समाजातील आमदाराला द्यावी, अशी आदिवासी समाजाच्या नेत्यांची मागणी आहे. त्यामुळे तवडकर यांचे नाव त्यासाठी पुढे आले.
२) सावर्डेचे आमदार गणेश गावकर हे तवडकर यांच्या जागी सभापती होऊ शकतील, अशी चर्चा आहे. कामत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांना राजीनामा देण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला.
१) गोव्याच्या कोणत्या मंत्र्याने अलिकडे राजीनामा दिला?
उत्तर - गोव्याचे पर्यावरण, कायदा खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
२) गोव्यात आत्तापर्यंत किती मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे?
उत्तर - गोव्यात आत्तापर्यंत नीलेश काब्राल, गोविंद गावडे आणि आलेक्स सिक्वेरा यांनी राजीनामा दिला आहे.
३) गोव्यात कोण दोन नेते नव्याने मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत?
उत्तर - गोव्यात रमेश तवडकर आणि दिगंबर कामत नव्याने मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
४) गोव्यात कोणाचे सरकार आहे, मुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर - गोव्यात भाजपचे सरकार असून, डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहेत.
५) गोव्यात काँग्रेसचे किती आमदार आहेत, विरोधी पक्षनेता कोण आहे?
उत्तर - गोव्यात काँग्रेसचे चार आमदार असून, युरी आलेमाव विरोधी पक्षनेते आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदारांची संख्या कमी झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.