Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: राजकारण्यांचे भक्त...

Khari Kujbuj Political Satire: राजकारण्यांचे असे काही अंध भक्त असतात जे आपल्या नेत्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचेही असे काही अंध भक्त आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

राजकारण्यांचे भक्त...

राजकारण्यांचे असे काही अंध भक्त असतात जे आपल्या नेत्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. कुंकळ्ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचेही असे काही अंध भक्त आहेत, जे आपल्याला नगरपालिकेची उमेदवारी मिळविण्यासाठी युरींना खूष करण्याच्या प्रयत्नात आहेत. युरी आलेमाव यांचा असाच एक भक्त मंजू शिरवंत यांनी युरींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भव्य मोठा कटआऊट उभारला आहे. काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या एका भक्ताने एल्टन यांच्या वाढदिनी असाच कटआऊट उभारला आहे. मंजू शिरवंत यांनी त्यापेक्षाही मोठा कटआऊट उभारून आपली भक्ती दाखवून दिली आहे. ∙∙∙

मिलाग्रीनने मांडली दामूंची बाजू

सध्या आगाळी येथील साकवाच्या दुरुस्तीवरून वादविवाद सुरू झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने या साकवाची दुरुस्ती सुरू करूनही हे काम लगेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या सांगण्यावरून बंद केले असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला. आता या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी स्वतः दामू नव्हे, तर माजी नगरसेविका मिलाग्रीन गोम्स यांनी काही गावकऱ्यांसह दामू नाईक यांची बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार दामू सरांना यातील काहीही माहीत नाही. तसेच त्यांचासुद्धा या साकव दुरुस्तीला विरोध नाही, पण हे काम नाताळ व नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपल्यावर सुरू करावे असे त्यांचे म्हणणे आहे. विजयबाबच्या म्हणण्यानुसार जर हे काम नाताळपूर्वी पूर्ण करण्यात येणार, तर मग त्याला विरोध का? असा प्रश्नसुद्धा काही लोक उपस्थित करीत आहेत. नाताळ व नवे वर्ष साजरे करण्यासाठी नवीन साकव मिळाला नसता का? ∙∙∙

मांद्रेत रस्ते रुंद की पार्किंगचे साम्राज्य?

मांद्रेत (Mandrem) रस्ते रुंद झाले की वाहनांची संख्या वाढली, हेच आता कळेनासे झाले आहे! जुनसवाडा येथील गार्डनजवळ संध्याकाळ झाली की वाहतूक कोंडी ठरलेलीच असते. त्यात अवघ्या १०० मीटरच्या अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गाड्या पार्क केल्या जात असल्याने रस्ता कमी आणि पार्किंगच जास्त दिसते. आता नवीन वर्ष जवळ येत असल्याने पर्यटकांसह वाहनांची गर्दी आणखी वाढणार, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी दोन्ही बाजूंच्या पार्किंगला लगाम घालावा, अशी मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे. नाहीतर रस्त्यावरून गाडी चालवण्यापेक्षा पार्क केलेल्या गाड्यांमधून वाट शोधण्यातच वाहनचालकांचा वेळ जाईल, अशी चर्चा मांद्रेत रंगू लागली आहे! ∙∙∙

चेतन देसाई लागले कामाला!

काणकोण मतदारसंघात भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस पक्षाने येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान आमदार रमेश तवडकर यांच्या विरोधात सक्षम उमेदवार उभा करण्याची योजना आखली आहे. गोवा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व काणकोण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चेतन देसाई यांना काँग्रेस पक्षाने काम सुरू करण्याचे संकेत दिले असल्याचे कळते. चेतन देसाई यांनी काणकोण मतदारसंघात नेटाने काम सुरू केले असून चेतन काँग्रेसला काणकोणात पुन्हा सुगीचे दिवस आणणार असल्याचा विश्वास काँग्रेसजनांना आहे. आता काँग्रेस पक्षाचा विश्वास चेतन यशस्वी करू शकतात आणि मतदार चेतन देसाईंवर विश्वास दाखवतात की नाही हे पाहावे लागेल. ∙∙∙

आरक्षणाचे आश्वासन, पण याचिकेचा पत्ता नाही!

विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण मिळणार की नाही, यावरून आता एसटी समाजात चर्चांना उधाण आले आहे. एका बाजूला आरक्षण मिळणारच, असा विश्वास व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनसह विविध संघटना त्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. सरकारही या प्रयत्नांना सहकार्य करत असल्याचे सांगितले जाते. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे आश्वासन देऊनही केंद्र सरकारकडून अद्याप याचिका दाखल झालेली नाही. आता २५ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने समाजाच्या नजरा सरकारच्या पुढील भूमिकेकडे लागल्या आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या आश्वासनाला निवडणुकीचा मुहूर्त मिळणार की याचिकेलाच अजून मुहूर्त सापडणार नाही, अशी चर्चा एसटी समाजात सुरू आहे! ∙∙∙

कुंकळ्ळीत भाजप विरोधक एकत्र येणार?

एका वर्षापूर्वी आजच्याच दिवशी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या वाढदिनी भाजपविरोधी पक्ष कुंकळ्ळीत एकत्र आले होते. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजी या पक्षांचे सर्व नेते युरींच्या वाढदिवसाला कुंकळ्ळीत युरी आलेमाव यांच्या मंचावर एकत्र आले होते. सगळ्यांनी हातात हात घालून भाजपविरोधी आघाडीचे संकेत दिले होते. मात्र, हातात घातलेले हात प्रत्यक्षात एकत्र आलेच नाही. आता एका वर्षाने पुन्हा एकदा सर्व विरोधी पक्षनेते एकत्र येण्याची शक्यता आहे. आता पाहूया भाजपविरोधी आघाडीचा जन्म कुंकळ्ळीत होतो की नाही ते... ∙∙∙

फोंड्यात राजकीय पक्षांचा आटापिटा

विधानसभा निवडणूक जवळ येत चालली तशा विविध राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. फोंडा मतदारसंघात तर यावेळेला आपलाच लोकप्रतिनिधी असावा यासाठी या राजकीय पक्षांनी प्रचंड आटापिटा चालवला आहे. सध्या फोंड्यातील पाण्याची समस्या तसेच मार्केट संकुलातील गैरव्यवस्था आणि इतर प्रश्नांवर सत्ताधारी सोडून अन्य सर्व राजकीय पक्ष आवाज उठवत आहेत. आवाज उठवणे स्तुत्यच आहे, पण समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी सरकारला जेरीस आणण्याची गरज आहे. केवळ दिखावा नको त्यासाठी मतांचे राजकारण नको जबरदस्त इच्छाशक्तीची खरी गरज आहे. फोंड्यात गेले वर्षभर आमदार नाही, त्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत, समस्या वाढल्या. आपल्या मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी जेव्हा नेते मंडळीकडून प्रयत्न होतील, तेव्हाच फोंडाच नव्हे, तर खऱ्या अर्थाने राज्य समस्यामुक्त होईल अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

एसटी समाज एकसंध होणार?

आदिवासी समाजाचे दिवंगत नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती राज्यभर साजरी होत असतानाच या समाजाची एक प्रमुख संघटना असलेल्या ‘उटा’च्या बैठका आणि मेळावेही आयोजित करण्यात आले. त्यात एसटी राजकीय आरक्षणाचा विषय तापला. सरकार एसटीवाल्यांची हेतुपुरस्सर फसवणूक करीत आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे सरकारच्या आदिवासी विकास खात्याने बिरसा मुंडा कार्यक्रमात तब्बल ८ कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. एकंदर परिस्थिती पाहता एसटीवाले एकमेकांशी भांडणात वेळ दवडणार की राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी एकसंध राहणार याचीच चर्चा होताना दिसत आहे. ∙∙∙

मांद्रेकरांचा राजीनामा आणि पार्सेकरांच्या चुकीची पुनरावृत्ती

भाजपचे ज्येष्ठ नेते दयानंद मांद्रेकर यांनी पक्षांतर्गत छळवणुकीला कंटाळून एससी-ओबीसी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शिवोलीत स्वतःचे बॅनर्स हटवले जात असून पक्षाकडून कार्यक्रमांत खोडा घातला जात असल्याची उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली. या घडामोडीत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा विषय निघताच मांद्रेकरांनी नेतृत्वावर निशाणा साधत, ‘पक्षातील नेते काहींना सहज आत घेतात आणि काहींना जाणीवपूर्वक बाहेर ठेवतात,’ असा थेट टोला लगावला. वस्तुतः राजकारण किंवा राजकीय पक्ष कोणामुळेही अडत नसतात. यापूर्वी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही भाजपशी फारकत घेऊन शेवटी अपक्ष निवडणूक लढवली होती; परंतु त्याचा काय निकाल लागला, हे सर्वश्रुत आहे. अखेर पार्सेकरांना पुन्हा स्वगृही परतावेच लागले. त्यामुळे आता मांद्रेकरही पार्सेकरांनी केलेली तीच चूक करण्याच्या उंबरठ्यावर आहेत का, अशी चर्चा त्यांच्याच हितचिंतकांमध्ये खासगीत रंगली आहे. ∙∙∙

भाऊंची शक्कल!

सावर्डेचे आमदार गणेशभाऊ गावकर हे तसे हुशार. कोणता कार्यक्रम कोणत्यावेळी घ्यावा याचे टायमिंग जुळवून आणण्यात त्यांचा कुणीच हात धरू शकत नाहीत. आता हेच बघा ना, भगवान बिरसा मुंडा जयंती खरे तर काल रविवारी होती, पण गणेशभाऊंनी या कार्यक्रमाचे एक दिवस आधीच आयोजन केले आणि तोही दाभाळ येथील पिसाणी सातेरी देवळाच्या आवारात. याचे कारण म्हणजे त्या दिवशी असलेला अमावास्या उत्सव. अमावस्येच्या दिवशी या देवळात मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यामुळे लोकांची गर्दी तिथे असतेच. त्याशिवाय भाऊंनी कार्यक्रम करण्यासाठी घसघशीत मानधन देऊन लोककला पथकेही बोलावली होती. त्यामुळे भाऊंच्या या कार्यक्रमाला निश्चितच गर्दी झाली आणि ही गर्दी पाहून गोव्याच्या भाजप सहप्रभारी भारती पवार याही भारावून गेल्या म्हणे. त्यांना कुठे माहीत भाऊंनी काय शक्कल लढवली ती? ∙∙∙

खरी कुजबुजमनोजच्‍या हाती ‘आयते कोलीत’!

दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटकच्‍या स्‍थापना दिनानिमित्त कर्नाटक राज्योत्‍सव झुआरीनगर येथे उत्‍साहात पार पडला. या उत्‍सवाचे आयोजक असलेल्‍या अखिल गोवा कन्नड महासंघाने या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्‍याने सर्वोच्च न्यायालयाचे वकील संदीप पाटील यांना आमंत्रित केले होते. पाटील यांनी गोव्‍यात स्‍थायिक असलेल्‍या कन्नडिगांना गोव्‍याशी प्रामाणिक राहण्‍याचे आवाहन करीत, गोवा विधानसभेत आपला प्रतिनिधी पाठवण्‍याचा सल्ला दिला. त्‍यातच आता गोव्‍याला परप्रांतीयांच्‍या आक्रमणापासून वाचवण्‍यासाठी आरजीची स्‍थापना करणारे मनोज परब येत्‍या २२ नोव्‍हेंबरला पुन्‍हा पक्षात प्रवेश करणार असून पाटील यांनी असे वक्तव्‍य करून परब यांच्‍या हाती ‘आयते कोलीत’ दिल्‍याचे बोलले जात आहे. ∙∙∙

झेडपींना कानपिचक्या

सध्या निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या अनेक झेडपींना आमदार बनण्याची उमेद आली आहे. काहीजणांनी तर ते उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन कामालाही सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर हल्लीच भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्यांची एक बैठक पणजीत झाली. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या झेडपींना कानपिचक्या देताना, आमदार होण्याची स्वप्ने पाहण्याऐवजी आपल्या मतदारसंघातील भाजपचा उमेदवार कसा जिंकून येईल याकडे लक्ष द्या, असे सांगितले. आता मुख्यमंत्र्यांचा रोख उत्तरेतील सिद्धेशकडे होता की दक्षिणेतील सिद्धार्थकडे हे मात्र कळू शकले नाही बुवा! ∙∙∙

जागा कुणाच्या वाट्याला जाणार?

प्रियोळमध्ये उमेदवारीचा तिढा आत्तापासूनच रंगू लागला आहे. मगोचे दीपक ढवळीकर आणि भाजपचे गोविंद गावडे यांनी प्रत्येकी दोनदा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता मगोचे कार्यकर्ते तथा जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी यांनीही विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे भाजप-मगो युती झाली, तर जागा कुणाच्या वाट्याला येणार? गावडे यांची उमेदवारी कायम राहणार की जल्मींच्या घोषणेने नवे समीकरण तयार होणार? युतीच्या वाटाघाटींपेक्षा प्रियोळमधील उमेदवारीची गणितेच अधिक तापू लागली आहेत. ∙∙∙

प्रियोळात जल्मींनी रणशिंग फुंकले!

प्रियोळच्या राजकीय आखाड्यात जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले अन् राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटले! खांडोळ्यात कार्यालय थाटले, निवडणूक लढविण्याचा निर्धारही जाहीर केला; पण पक्षाचा झेंडा मात्र अजूनही ठरलेला नाही. म्हणजे घोडा मैदानात उतरला, पण लगाम कोणाच्या हाती द्यायचा, हेच अद्याप गुलदस्त्यात! उमेदवारीचा पत्ता नसताना निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने प्रियोळच्या राजकारणात जल्मींची ही खेळी नेमकी कुणाला इशारा आहे, याचीच चर्चा रंगू लागली आहे! ∙∙∙

चर्चेला सुरुवात!

विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आल्याने काँग्रेसने संभाव्य विरोधी पक्षीय आघाडीच्या हालचालींना वेग दिल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर रविवारी आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजी) राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले. बैठकीला काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आजारी असल्याने, तर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव अन्य कामात व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने प्रादेशिक पक्षांशी संवाद सुरू केल्याने विरोधी पक्षीय एकजुटीच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडल्याची चर्चा आहे. आगामी काळात या चर्चेला कोणते वळण मिळते आणि विरोधक एकत्र येण्याच्या दिशेने किती पुढे जातात, याकडे लक्ष लागले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian History: भारताचा इतिहास वसाहतवादी चौकटीतून मुक्त करण्याची गरज; ‘सकाळ लिट फेस्ट’मध्ये प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी यांचे उद्गार

Amit Shah Speech: 'देशाची बदनामी करुन सत्तेत येता येणार नाही', अमित शहा यांचा राहुल गांधींवर घणाघात; PM मोदींच्या विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक

Goa Politics: कन्नडिगांची नजर गोवा विधानसभेवर! राजकीय सक्षमीकरणासाठी संघटित होण्याचे संदीप पाटीलांचे प्रतिपादन

Dayanand Mandrekar Resigns: स्‍वकियांच्या छळामुळेच महामंडळाचा राजीनामा दिला, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Birsa Munda Jayanti 2026: आज बलिदानाची नव्हे, तर परस्पर सहकार्याची गरज; बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सावंतांचे आवाहन

SCROLL FOR NEXT