पर्वरी येथे भाजपच्या मेळाव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रोहन खंवटे यांच्या कामाबाबत खूप काैतुक केले. पर्वरी परिसरात ज्या साधनसुविधा उभ्या राहत आहेत त्याचे श्रेय खंवटेंना जाते. या मतदार संघाचा विकास हा सुद्धा झपाट्याने होत आहे. केवळ विकासच नव्हे तर मतदार संघातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते अंत्योदय तत्त्वावर काम करीत आहेत. त्यामुळे रोहन खंवटे यांच्या कामावर माझ्याबरोबरच लोकही खुश असल्याचे त्यांनी सांगितले. हे सांगत बाजूला असलेल्या रोहन खंवटे यांचा उत्साह वाढला. मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि हो .. या उत्साहवर्धक वातावरणामुळे खंवटेंना खरोखरच दहा हत्तीचे ‘बळ’ ही मिळाले असेल.
गोविंद गावडे यांनी ढवळीकरांविषयी केलेली टिप्पणी भाजप पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच ढवळीकर बंधू दिल्लीला गेले तेव्हा त्यांना बी.एल. संतोष यांनी तातडीने मुलाखतीची वेळ दिली. स्वतः संतोष अस्वस्थ झाले व त्यांनी गोव्यातील वृत्तपत्रे मागवून घेतली. काहीजण आपल्या बोलण्यातून नसती आफत ओढवून घेतात. नाटकात संवादफेक करणे वेगळे. कारण ते संवाद लेखकाचे असतात. नट जर स्वतःच्या मर्जीने नाटकातील संवाद माध्यमांसमोर बोलू लागला, तर त्याला अडचणींना तोंड द्यावे लागणारच. सूत्रांच्या मते संतोष यांनी एक अत्यंत कडक अहवाल तयार करून तो गृहमंत्री अमित शहांसमोर ठेवला आहे. कारवाई अटळ आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील बदल अपेक्षेहून लवकर होईल का, याचे उत्तर मात्र मिळत नाही!
मंत्रिमंडळातील बदल कधी होणार याची चर्चा गेले सहा महिने चालली आहे. परंतु तो दिवस आता येऊन ठेपला आहे. सूत्रांच्या मते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या बदलासाठी पक्षाला मुहूर्त सापडेल! पक्षश्रेष्ठीच त्याबाबत निर्णय घेणार असून गोव्यात फारसे कोणाचे मत विचारात घेतले जाणार नाही. किमान तिघाजणांचे एक ‘हीट लिस्ट’ बनविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल बी.एल. संतोष यांच्याकडे तयार आहे. घरी पाठवले जाणार कोण यांची नावे प्रसिद्धी माध्यमांमध्ये आलेलीच आहेत व अलिकडच्या घटनांमुळे त्यात एक नाव ठळकपणे जाणवू लागलेले आहे. शुक्रवारी संसदेचे अधिवेशन संपतेय. त्यानंतर लागलीच भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड होईल व त्यानंतर गोव्यात आवश्यक बदल करण्याचा मार्ग खुला होईल.∙
कचऱ्यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी कारापूर-सर्वण पंचायतीला कसे फैलावर घेतले. ते सर्वश्रुत आहे. याच कारापूर-सर्वण पंचायतीचा आता आणखी एक निष्काळजीपणा समोर आला आहे. मंगळवारी पार पडलेल्या पंचायतघराच्या लोकार्पण सोहळ्यात सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगून कारापूर-सर्वण पंचायतीच्या माजी सरपंचांना या सोहळ्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणाला मान देऊन बहुतेक माजी सरपंच कामधंदा सोडून सोहळ्याला उपस्थित राहिले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सन्मान होणार, अशी या माजी सरपंचांची अपेक्षा होती. पण कुठचे काय? सन्मान सोडाच या माजी सरपंचांचा साधा उल्लेख करण्याचीही पंचायतीने तसदी घेतली नाही. हा सरळसरळ माजी सरपंचांचा अपमान नाही, तर काय? कार्यक्रम संपल्यानंतर तर काही सरपंचांनी या प्रकाराबद्धल नाराजी व्यक्त केली. खरोखरच सन्मान करण्यासाठी या माजी सरपंचांना कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात आले होते की, कार्यक्रमाला गर्दी दाखवण्यासाठी?, अशी चर्चा रंगली आहे.
पणजीतील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, अशी हमी यापूर्वीच नोडल अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे ही कामे वेळेत व्हावी यासाठी संबंधित अधिकारी प्रयत्नरत आहेत. ‘डेडलाईन’मध्ये ही कामे पूर्ण झाली नसल्याने काही विरोधकांनी त्यावर तोंडसुख घेतले तसेच स्थानिक आमदारांनी या कामावर जिल्हाधिकारी तसेच नोडल अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, आपला त्याच्याशी काही संंबंध नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या कामात लक्ष घातल्यानंतर मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी या कामातील लक्ष कमी केले होते. पणजी महापौरांनी या कामाकडे कधीही लक्ष दिले नाही. त्यामुळेच तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाचे तीन तेरा वाजलेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कामातील गोंधळामुळे लोकांना होणारी समस्या उच्च न्यायालयात पोहचली. हे काम केंद्र सरकार अंतर्गत सुरू असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व महापौरांनाही त्याचे सोयर सुतक नाही. मात्र स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामांचे श्रेय मात्र पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीवेळी घेण्यास पुढे असतील यात वाद नाही. ∙∙∙
परवा कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी मगो पक्षावर टीका करत असताना पक्षाचे दुसरे आमदार आणि बहुजन समाजाचे नेते जीत आरोलकर यांच्याकडे अध्यक्षपद द्यावे, असे आवाहन केले. आणि जीत यांनीही संधी दिल्यास आपण अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगून या आवाहनाला बळ दिले. पण यामुळे फोंड्यात एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. जीतच कशाला गेली सात आठ वर्षे मगो पक्षाकरता कार्य करणारे डॉ.केतन भाटीकर यांना अध्यक्षपद का नको, असा सवाल भाटीकरांचे फोंड्यातील कार्यकर्ते विचारू लागलेत. भाटीकर उच्चवर्णीय असले तरी ते बहुजन समाजाकरता अहोरात्र कार्य करत असतात, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय फोंड्यासारख्या मध्यवर्ती शहरात राहत असल्यामुळे राज्यभर पक्षाचा प्रसार योग्यरीत्या करू शकतील, असाही त्यांचा दावा आहे. गेल्या खेपेला थोडक्यात हुकलेला विजय ते यावेळी आणू शकतील, असे सांगायलाही त्यांनी सुरुवात केली आहे. थोडक्यात म्हणजे भाटीकर हेच पक्षाच्या अध्यक्षपदाकरता योग्य उमेदवार, असे त्यांचे म्हणणे. आता बघूया त्यांच्या या युक्तिवादाला किती पंख फुटतात ते आणि त्याचा परिणाम काय होतो ?
मगो आणि भाजपचा शाब्दिक वाद सध्या सुरू असल्याने हे दोन पक्ष तर या आठवड्यापासून चर्चेत आहेत पण काँग्रेस पक्ष काही चर्चेत असल्याचे कुठेच दिसत नाही. भाजप निदान आपल्या कार्यक्रमांतून तरी गावागावात चर्चेत असतो. पण काँग्रेस नेते आपली निराळीच रणनीती खेळतात. आता ही रणनीती त्यांना कितपत फायद्याची ठरते, हे लोकांनी वारंवार दाखवून दिले आहे. निदान दोघांच्या भांडणात आपला लाभ शोधून काँग्रेस कार्यकर्ते तसेच नेते जोमाने सक्रिय होतील, अशी अपेक्षा होती. पण ते न झाल्याने काँग्रेसला राजकारण शिकायची गरज असल्याचे लोक बोलू लागलेत.∙∙
कर वाढीवरून मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आज भलतेच कडाडले. पूर्वीच्या कौन्सिलने काय दिवे लावले, हे आम्ही पाहिले आहे. लोकच बेकायदेशीर धंदे करतात. आम्ही त्यांना बेकायदेशीर धंदे करा, असे सांगितले आहे का? गोवेकर माणुसकीने जगतात, माणुसकी जपतात. म्हणून आम्ही इतके दिवस गप्प आहोत. उठसूठ नगरपालिकेवर आरोप आपण खपवून घेणार नाही, असे अप्रत्यक्षरित्या त्यांनी विरोधकांना सुनावले. बेकायदेशीर कामे कायदेशीर करा किंवा त्यांच्यावर कारवाई करू नका, असे फोन आम्हाला येतात. फोन करणाऱ्यांची नावे जाहीर करू का?, अशीही विचारणा त्यांनी केली. याचा अर्थ विरोधकही असे फोन करतात का?, नगराध्यक्षांनी हेही स्पष्ट करावे, अशी मागणी होतेय. ∙
आगामी विधानसभा निवडणुकीला दोन वर्षांचा कालावधी आहे, तरी पण गोव्यातील सत्ताधारी भाजप व ‘मगो’ मधील युतीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांनी एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढून झाल्यावर ते चहाच्या पेल्यांतील वादळ ठरल्यासारखे झाले आहे. भाजपने प्रथम मांद्रे व नंतर प्रियोळ येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यांतून या व्दंव्दाला सुरवात झाली पण त्याची अखेर झाली, ती समझोत्यांत. आता उभय पक्षांतील नेते आपण त्या गावचेच नाही, असे वागताना दिसतात. पण या प्रकरणात प्रियोळचे गोविंद गावडे यांनी जी भाषा वापरली ती भाजपवाल्यांना व खुद्द प्रियोळमधील अनेकांना आवडलेली नाही. पूर्वी ते ‘उटा’च्या काळांत कॉंग्रेस सत्तेवर असताना अशीच भाषा ते भाजपविरुध्द वापरत होते. पण आता ते भाजपात व मंत्रिपदी असताना कोणतीही भाषा वापरताना जरा सबुरीने घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. कारण ती भाषा उद्या युतीच्या मुळावर आली तर काय करावे, हा प्रश्न आहे
आता काही दिवसांपूर्वीच मगोचे आमदार जीत आरोलकर हे आपण ‘मगो’चे अध्यक्ष होण्यास इच्छुक आहेत, असे सांगून आपली इच्छा दर्शवितात आणि आता चक्क पलटी मारून आपण असे स्वतःहून इच्छा व्यक्त केलीच नाही, असे म्हणतात. आता ही कसली रणनीती ते जीत आणि ढवळीकर बंधूच जाणे! ढवळीकर बंधू दिल्लीतून आल्यावर जीत यांची वाणीच बदलली. आता हा अचानक बदल झाल्याने बहुतेक जीत यांना ढवळीकरांनी चांगलीच तंबी दिली असावी, अशी चर्चा राज्यात सुरू आहे. आपण काही दिवसांपूर्वीच इच्छा व्यक्त केली होती, हे बहुतेक जीत विसरल्याने आता ते विसरभोळे झाले असावेत, असे लोक तर बोलणारच पण चक्क ‘मगो’चे कार्यकर्तेही आता बोलू लागलेत.
स्थानिक टॅक्सी चालक व गोवा माईल्सचा वाद दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. त्यातच आणखीन एक व्हिडिओ समोर आला असून, यात एक स्थानिक टॅक्सी चालक अॅप आधारित टॅक्सी चालकासोबत हुज्जत घालतोय तसेच शिवीगाळ करताना दिसतोय. हा व्हिडिओ बुधवारी वाऱ्यासारखा व्हायरल झाला. विशेष म्हणजे, टॅक्सी चालकाकडून कशाप्रकारे आपल्या कुटुंबीयाला त्रास दिला जात आहे, असे या व्हिडिओत पीडित पर्यटक सांगतोय. सध्या स्थानिक टॅक्सी चालक व गोवा माईल्समधील वादाचा फटका बिचाऱ्या पर्यटकांना भोगावा लागत आहे. आणि पर्यटकांना वाईट व कटू अनुभवाचा सामनाही करावा लागतोय. या व्हिडिओत पीडित पर्यटक असेच चालत राहिल्यास ‘कौन टुरिस्ट गोवा आएगा’ अशीही शेवटी विचारणा करतो. या टॅक्सी चालकांमधील चढाओढीमुळे आपल्या पर्यटन गोव्याची प्रतिमा मात्र मलीन होत चाललीय, त्याची कुणी दखल घेईल का?...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.