Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: लवकरच गोव्यात 'रिअल काँग्रेस पार्टी?'

Khari Kujbuj Political Satire: जर राजाच हतबल झाला, तर प्रजेने कोणाकडे पहावे? असा प्रश्न आता गोमंतकीयांना पडला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

लवकरच गोव्यात ‘रिअल काँग्रेस पार्टी?’

राजकीयदृष्ट्या नियमित समाजमाध्यमांवर पोस्ट टाकून खळबळ माजवणारे ॲड. राधाराव ग्रासियस यांनी काल एक नवीन पोस्ट टाकला असून यापूर्वी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले आणि नंतर पराभूत झालेले काही माजी आमदार सध्या एकत्र आले असून लवकरच ते ‘रिअल काँग्रेस पार्टी’ नावाचा नवीन पक्ष स्थापन करणार, असा गौप्यस्पोट त्यांनी केला आहे. शेवटच्या टप्प्यात सध्या भाजपमध्ये असलेले काही आमदारही त्यात सामील होणार आहेत, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. राधाराव यांना अधेमध्ये काही गडबड करणारे पोस्ट टाकण्याचीही सवय आहे, ही गोष्ट जरी खरी असली तरी त्यांच्या या नव्या पोस्टकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. केतन भाटीकर यांना काँग्रेस फोंड्यात उमेदवारी देणार ही, बातमीही राधराव यांनीच सर्वप्रथम फोडली होती. राधाराव आता काँग्रेस पक्षाला बरेच जवळ आले, असे म्हणायचे का ? ∙∙∙

जेव्हा मंत्रीच हतबल होतात!

जर राजाच हतबल झाला, तर प्रजेने कोणाकडे पहावे? असा प्रश्न आता गोमंतकीयांना पडला आहे. सांगे मतदार संघातील अतिदुर्गम अशा एका गावात राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या अधिकाराने स्थापन झालेल्या वन खात्याची दादागिरी चालल्याची तक्रार हतबल जनतेने स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे केली. मात्र, सुभाष फळदेसाई यांचेही आदेश वन खात्याचे अधिकारी मानत नसल्याचे कळते.भाऊसाहेब बांदोडकर यांनी नावावर करून दिलेल्या जमिनीवर वन खाते अधिकार सांगत आहे. मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या कानावर ही बाब घातली असता त्यांनी आपली हतबलता जाहीररित्या दाखवून दिली. वन खाते जर मंत्र्यालाही ऐकत नसेल, तर या डबल इंजिन सरकारचा काय फायदा? असा प्रश्‍न वनात राहणारी जनता विचारायला लागली आहे.

तळावलीकरांच्या स्टेटसला भाटीकर!

फोंड्यातील पोटनिवडणूक सध्या या ना त्या कारणाने गाजत आहे. फोंड्यात भाजप - मगो युतीचे उमेदवार रितेश नाईक निवडणूक रिंगणात आहेत. आता भाजप - मगो युती असल्याने या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने रितेश नाईक यांच्यासाठी काम करणे क्रमप्राप्त आहे, मात्र मगो पक्षाच्या कार्यकर्त्या तसेच फोंड्यातील नगरसेविका गिताली तळावलीकर यांनी आपल्या मोबाईलवर चक्क काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांचा स्टेटस ठेवला आहे त्यामुळे साहजिकच भाजपवाल्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या प्रकारामुळे सुदिन ढवळीकर भाजपवाल्यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे जरा सांभाळून....!

चर्चिल ‘आप’चे कुंकळ्ळीतील उमेदवार?

आपच्या गोवा प्रभारी आतिशी मार्लेना यांनी अरविंद केजरीवाल हे बाणावली येथे आलेले असताना माजी आमदार चर्चिल आलेमाव यांची भेट घेणे आणि या भेटीच्या सुमारे एक महिन्यानंतर चर्चिल आलेमाव यांनी आपण कुंकळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार, अशी घोषणा करणे हा फक्त योगायोग आहे का? सध्या राजकीय वर्तुळात हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. की ‘आप’ पक्षाला चर्चिल आलेमाव यांना कुंकळ्ळी मतदारसंघातून उभे करून ‘चाचा - भतीजा’ हा प्रयोग लावायचा आहे? यापूर्वी आपने माजी आमदार क्लाफास डायस यांच्याकडे घरोबा केला होता. आता आप आपली वाट बदलण्याच्या मूडमध्ये तर नाही ना?

आता ‘मुजरा’ अन् ‘कोठे’ बाकी राहिले!

ज्या प्रांतात व राज्यांत संस्कृतीचा ऱ्हास होताना व उद्योगाच्या आणि अर्थकारणाच्या नावाने व्यभिचारी वृत्तीला चालना मिळते, त्या राज्याचा व प्रांताचा विनाश अटळ असतो. आपला गोवा त्याच मार्गाने चाललाय, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. कॅसिनो, डान्सबार, क्लब संस्कृती, नाईट लाईफ आपल्या गोव्याला कदाचित आर्थिक दृष्टीने सक्षम बनवत असेल. मात्र, सांस्कृतिक दृष्टीने गोवा कंगाल बनायला लागला आहे. गोव्यात सगळे काही खुल्लमखुल्ला चालते. आमदार मायकल लोबो क्लब पॉलिसी आणण्याची मागणी करतात. आता गोव्यात ‘कोठे’ व ‘मुजरा’ व्हायचे बाकी राहिले आहे.

उमेदवारांच्या आत्मविश्वासाचा ‘ओव्हरडोस’

फोंडा पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या इतक्या जोशात सुरू आहे, की जणू न्यायालयाचा निकाल लागूनच गेलाय! पण दुसऱ्या बाजूला न्यायालयात निकाल ‘राखून ठेवलेला’ असल्याने खरी उत्कंठा तिकडेच आहे. गंमत म्हणजे उमेदवार मात्र इतक्या आत्मविश्वासात फिरताना दिसतात, की जणू न्यायालयाने आधीच त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर निकाल पाठवला आहे! प्रचाराच्या सभा, भाषणं, गाठीभेटी सगळं रंगात आलंय... पण न्यायालयाचा निकाल सोमवारी येणार अशी अपेक्षा. ही बाब मात्र कुणाच्या चेहऱ्यावर फारशी दिसत नाही. काही जाणकार म्हणतात, ‘हा आत्मविश्वास नाही, तर आत्मविश्वासाचा ‘ओव्हरडोस’ आहे!’ कारण न्यायालयाने निर्णय राखून ठेवला म्हणजे खेळ अजून संपलेला नाही… उलट शेवटचा ट्विस्ट बाकी आहे. आणि जर न्यायालयाने काही वेगळाच निर्णय दिला तर सध्या हवेत उडणारे हे सगळे आत्मविश्वासाचे फुगे एकदम ‘फुस्स’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत काय, मैदानात प्रचाराची धूम आहे, पण खरी मॅच अजून कोर्टात सुरू आहे… आणि त्या मॅचचा निकाल लागला की अनेकांच्या चेहऱ्यावरचा ‘कॉन्फिडन्स’ हा ‘कन्फ्युजन’मध्ये परावर्तित व्हायला वेळ लागणार नाही, अशीच चर्चा रंगली आहे!

लक्ष्मीकांत पार्सेकर उवाच

मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मोठ्या मत फरकाने केलेला पराभव अद्याप विस्मृतीत गेलेला नाही. त्यामुळे गुरुवारी सोपटे यांच्या वाढदिवस कार्यक्रमाला पार्सेकर याना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पार्सेकर यांनी राजकीय संबंध आणि व्यक्तीगत संबंध यांची आपण गल्लत करत नाही, असे सांगत उपस्थितीचे कारणही उलगडले. तरीही त्यांनी चार शब्दांचे मनोगत व्यक्त करताना वाढदिवस साजरा करताना सोपटे यांनी रक्तदानाचा चांगला पायंडा पाडल्याबद्दल कौतुकाचे दोन शब्द बोलताना कोणाला टोला लगावला याची चर्चा आता मांद्रेत सुरू झाली आहे. कोण असा आहे, तो वाढदिवसाला उधळपट्टी करतो आहे, याचा शोध त्याचमुळे तो जो आपापल्या परीने घेत आहे.

बाबूशचे ‘तीस नगरसेवक’!

महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी महानगरपालिकेत ३० पैकी ३० उमेदवार निवडून आणणार असल्याची भीमगर्जना केली होती. ही गर्जना २७च्या आकड्यापर्यंत पोहोचली. पण अखेर त्यांनी ३० नगरसेवकांचा आकडा गाठलाच. तीन माजी नगरसेवकांना केवळ चार दिवसांच्या अंतराने स्वीकृत नगरेसवक म्हणून मान्यता दिली गेली. त्यामुळे ‘टुगेदर फॉर प्रोग्रेसीव्ह पणजी’चे ३० नगरसेवक झाले, असे म्हणायला काहीच हरकत नाही. नगरसेवकांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे. जे तिघे स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले आहेत, त्यात शेखर डेगवेकर, एडवर्ज जॉर्ज उर्फ ॲडी, रेजिना आल्मेदा यांचा समावेश आहे. या तिघांची निवड झाल्याने काही माजी नगरसेवकांना नक्कीच धक्का बसला आहे. काहींना आपली वर्णी स्वीकृत नगरसेवक म्हणून लागेल,अशी ते आशा बाळगून होते, पण त्यांची पुरती निराशा झालेली आहे.

गोवा बनतोय ‘कोटा फॅक्टरी’!

दर्जेदार शिक्षण हा देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला तो गरीब असो वा श्रीमंत अथवा गर्भश्रीमंत असो सगळ्यांना समान दर्जाचे शिक्षण मिळायला हवे. सगळ्या शाळांत समान व योग्य चांगल्या साधनासुविधा हव्यात. दुर्दैवाने हे आपल्या देशात व राज्यात होत नाही. आपल्या देशांत शिक्षणाचे व्यापारीकरण झालेले असून ज्याच्याकडे जास्त पैसा त्याच्या मुलांना उच्च कोटीचे शिक्षण.जो गरीब त्याला सरकारी शाळा. आपला गोवा आता शिक्षण क्षेत्रात व्यापारीकरणासाठी अग्रेसर होताना दिसतोय.आपल्या राज्यात मोठ मोठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची खासगी विद्यापीठे व शाळा उभ्या राहायला लागल्या आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक माहाविद्यायात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आता गोव्यात राजस्थान येथील ‘कोटा फॅक्टरी’ सारखी ‘सन अँड सॅंड’ शिक्षण केंद्रे गोव्यात उभी राहू लागली आहेत. आकाश, स्टेलार, एलोन, आर्यन व इतर खासगी शिकवणी केंद्रांबरोबरच आता राज्यात फिजिक्स वाका विद्यापीठ या खासगी शिकवणी केंद्राने आपले दुकान उघडले आहे. ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी, एम्स व इतर मोठ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांतून पुढचे शिक्षण घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाने अकरावी , बारावी व प्रवेश परीक्षेची तयारी लाखोंचे शुल्क भरून करतात. आता गोवात खऱ्या अर्थाने एज्युकेशन टूरिझम संकल्पना मूर्त रूपात आली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

काका-पुतण्या यांच्यात होणार लढत?

चर्चिल आलेमाव हो गोव्यातील राजकारणात मुरब्बी राजकारणी. १९८९ पासून म्हणजे जवळ जवळ ३७ वर्षे ते राजकारणात आहेत. ते आमदार, खासदार, मुख्यमंत्री बनले. पण अजून ७७ वर्षीय चर्चिलबाबांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. बाणावली, नावेली झाले, आता त्यांचे लक्ष कुंकळ्ळी मतदारसंघावर गेले आहे. बाणावलीत आपल्याला तेवढा पाठिंबा नाही, याची त्यांना जाणीव आहे. नावेलीत ते आपल्या मुलीला संधी देऊ पहात आहेत. राहिला कुंकळ्ळी मतदारसंघ, कुंकळ्ळीतील लोकांना आपण तिथे उमेदवारी दाखल करावी अशी इच्छा आहे, असे स्वतः चर्चिलबाब सांगतात. पण तिथे त्यांच्याच भावांचे पूत्र म्हणजे युरीबाब आमदार आहेत ना, मग ते कसे शक्य असेल. २०२७ मध्ये युरीबाबही पुन्हा आपले नशीब कुंकळ्ळीतूनच आजमावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कुंकळ्ळीत काका व पुतण्या यांच्यात तर लढत होणार नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Khelo India Tribal Games: गोवा एकूण चार पदकांसह अठराव्या क्रमांकावर; 'खेलो इंडिया आदिवासी' स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व दोन ब्राँझपदके

FC Goa vs Bengaluru: एफसी गोवा संघाला आवश्यकता एकाग्रतेची, बंगळूर एफसीविरुद्ध शनिवारी फातोर्ड्यात लढत

Gawandali Flyover: गवंडाळी उड्डाणपुलाचे काम ठप्पच, बंदी आदेशाची पायमल्ली; वाहतूक सुरूच, पोलिसांचे दुर्लक्ष

Nashik Car Accident: नाशिक हादरलं! आनंदाचा प्रवास ठरला मृत्यूचा सापळा, कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 6 चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीसाठी भरपगारी सुटी जाहीर; रोजंदारी, कंत्राटी कामगारांसाठीही सुटी अनिवार्य

SCROLL FOR NEXT