Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: बाबू करतात इशारे!

Khari Kujbuj Political Satire: ‘संधी एकदाच दारावर हात मारते’ या अर्थाचे इंग्रजीत एक बोधवाक्य आहे. मात्र संधीचा फायदा घेण्यात घाई केली तर फासे उलटे पडू शकतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

बाबू करतात इशारे!

बाबू आजगावकर यांनी पुन्‍हा एकदा पेडणे मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्‍याचे जवळपास निश्‍चित केले असून त्‍यांनी आपले हे मनसुबे वारंवार बोलूनही दाखविले आहेत. मडगाव पालिकेवर गांधी मार्केटातील व्‍यापाऱ्याबरोबर मडगाव पालिकेत आलेल्‍या बाबूंनी परत एकदा पेडण्‍यात आपण काम सुरु केले आहे, असे सांगून आपण यावेळी मागे फिरणार नाही, हे स्‍पष्‍ट केले. सध्‍या पेडण्‍यात प्रवीण आर्लेकर हे भाजपचे आमदार आहेत आणि बाबूही अजून भाजपमध्‍येच आहेत. बाबूंनी कोणत्या पक्षाच्‍या उमेदवारीवर निवडणूक लढविणार याबाबत पत्ते खुले केलेले नाहीत. मात्र त्‍यांचे इशारे पाहिल्‍यास एकतर भाजपची उमेदवारी द्या, नाही तर मी बंडखोरी करण्‍यास तयार आहे, हेच ते सांगू पहात तर नाहीत ना! ∙∙∙

एकतर्फी विरोध

‘संधी एकदाच दारावर हात मारते’ या अर्थाचे इंग्रजीत एक बोधवाक्य आहे. मात्र संधीचा फायदा घेण्यात घाई केली तर फासे उलटे पडू शकतात. युरी आलेमाव यांच्याविरोधात कुंकळ्‍ळीतील काही राजकारणी एकत्र येऊन जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एका गटाच्या व समुदायाच्या समर्थनात गेल्यामुळे त्या आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांनी नाहक दुसऱ्या गटाचा विरोध ओढवून घेतला आहे. एका धार्मिक संस्थानच्या जमिनीच्या वादात या राजकारण्यांनी मीडियावर आवाज उठविल्यामुळे एक समुदाय त्यांच्याविरोधात गेला आहे. ‘खट्टरवर जलदगतीने खटला दाखल करा’ अशी मागणी करताना हिंदूच्या भावना दुखावलेल्यांवर कारवाई करा हे सांगण्यात हे राजकारणी विसरल्याने स्थानिक बहुसंख्य समुदायाच्या रोषास बळी पडले आहेत. हा तमाशा पाहून ‘आता खायात पातोळयो’ असे युरी समर्थक म्हणायला लागले आहेत.

नेते ‘गायब’

सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबद्दलच्‍या वादग्रस्‍त विधानामुळे राज्‍यात सध्‍या प्रखर धरणे आंदोलने सुरू आहेत. मेणबत्ती फेरी, पोलिसांत तक्रारी असे सर्व काही गोमंतकीय करत आहेत. परंतु, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे नेते मात्र कुठेच दिसत नाहीत. चार दिवसांपूर्वी पणजीत पोलिस अधीक्षकांना भेटून गौतम खट्टरला ताबडतोब अटक न केल्यास गोव्यात कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी गर्जना करून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव कुठे गेले कोणास ठाऊक. त्यांच्या कुंकळ्ळी मतदारसंघात खट्टरविरोधात साधी तक्रारही दाखल झाली नसल्याची चर्चा आहे. त्यानंतर मडगावात मेणबत्ती फेरी झाली. रविवारी ओल्ड गोवा येथे धरणे आंदोलन झाले. परंतु युरीबाब वा काँग्रेसचे दोन आमदार काही कुठे दिसले नाहीत. काँग्रेस आमदारांच्या अशा वागण्यावरून बिच्‍चारे कार्यकर्ते ‘या नेत्यांचं चाललंय तरी काय?’ असे बोलत आहेत.

सायबाचा चमचा!

ही कुजबूज आहे सासष्टीतील एका पोलिस ठाण्यातील. तालुक्यातील या महत्त्‍वाच्‍या पोलिस ठाण्यात एक पोलिस सध्या भलताच फॉर्ममध्ये आहे. साहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी असलेल्या या खाकीवर्दीवाल्याचा दरारा जबरदस्त आहे. काही वर्षांपूर्वी त्याची या पोलिस ठाण्यातून बदली झाली होती. मात्र अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी ही बदली रद्द करून, पूर्वीच्याच ठाण्यात पुनरागमन केले. बड्या साहेबाची त्याच्यावर बरीच कृपा असल्याने तो कुणालाही जुमानत नाही. सायबासाठी कलेक्शनचे काम तो इमानेइतबारे करतो. त्यामुळेच त्याचे लाड खपवून घेतले जातात, असे या ठाण्यातील अन्य पोलिस दबक्या आवाजात एकमेकांशी बोलतात.

असा भेदभाव का?

‘एसएससी’चा निकाल ९४.५१ टक्के लागला. नेहमीप्रमाणे मुलींची उत्तीर्ण होण्‍याची टक्केवारी संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. हल्लीच्या वर्षात पास होण्याची टक्केवारी ९५च्या आसपास असते. कारण प्रश्न बहुतेक वस्तुनिष्ठ असतात. गणित पेपर दोन पातळ्यांचा असतो. सोपा आणि काठिण्य असलेला. हा भेदभाव का हेच कळत नाही. इतके विद्यार्थी पास झाले, आता हायर सेकंडरी वा इतर ठिकाणी प्रवेश मिळवायला गर्दी होणार. कुठे तरी प्रवेश मिळवणे हे दिव्य ठरते. रोजगाराभिमुख शिक्षणावर भर द्या, असे नारे चालतात. पण, प्रत्यक्षात त्यावर अंमलबजावणी कमी होते. शेती, पर्यटन व अन्य क्षेत्रांत युवकांना प्रशिक्षित करण्याच्या योजना हव्यात. युवा शक्ती ही महान ऊर्जा. तिचं रूपांतर चांगल्या कार्यासाठी, चांगल्या तऱ्हेने करणं हे फार महत्त्वाचं आहे.

बाबूंची भूमिका ‘ग्रेट’

आपले हे बाबू केपेच नव्हेत तर मडगावचे व तेही गांधी मार्केटवाले आहेत. ऐशी-नव्वदच्या दशकात बाबू म्हटले की ते बाबू नायकच असत. पण आता बाबूंची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणता बाबू? असा प्रश्न अनेकांना पडतो. माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर परवा मडगाव पालिकेवर चाल करून आले व सगळ्यांना पुन्हा एकदा पूर्वीचे गांधी मार्केटचे प्रश्न घेऊन रस्त्यावर येणारे बाबू आठवले. मडगावकरांना आमदार, उपमुख्यमंत्री यापेक्षा त्यांचा हा रोलच म्हणे खरा भावतो. कारण त्यात त्यांची लढवय्यावृत्ती दिसते. आता बाबूंचे वय झाले असले तरी त्यांचा तो लढवय्या बाणा परवा म्हणे पुन्हा दिसून आला व म्हणून त्यांनी आमदार वगैरेच्या फंदात न पडता गांधी मार्केटवाल्यांचे प्रश्न घेऊन सोडविलेले बरे असे मडगावकर म्हणतात. ते मंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे झाले. पण गांधी मार्केटचे प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. म्हणून हा पर्यायच चांगला, असेही ते म्हणतात.

खट्टर मिळाला, आता पुढे काय?

गौतम खट्टरने वास्कोतील एका सभेत सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने गेला आठवडाभर गोव्यात संताप आणि तणावाची स्‍थिती निर्माण झाली. कोणी खट्टरला अटक करा तर कोणी मंत्री माविन गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी करत होता. पोलिसांत तक्रारी दाखल करण्‍यात आल्‍या. आता खट्टरला अटक करून गोव्यात आणले आहे. मात्र पुढे काय, असा प्रश्न उपस्थित झाला तर त्यात गैर ते काय?. माविन गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, ही मागणी आता मागे पडणार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र खट्टरला अटक केल्याने राज्य सरकारवरील दडपण मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाले असेल, हे मात्र नक्की.

मग रवींद्र भवने हवीच कशाला?

गोव्यात आता पूर्वीप्रमाणे बड्या कंपन्यांची नाटके येणे बंद झाली आहेत खरी. एके काळी म्हणे कंपन्‍यांची नाटके तुफान चालत. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी तशा नाटकांचे लोकाग्रहास्तव खास प्रयोग दुपारच्या वेळेतही आयोजित केले जात. त्यांनाही तुफान गर्दी लोटायची. संगीत नाटक असेल तर ते तीन ते चार ताससुद्धा चालायचे. आज वेगळी स्थिती आहे. कोणतेही नाटक असो, ते दोन-अडीच तासांमध्‍ये आटोपते. पण तरीही प्रेक्षकवर्गाची उपस्थिती जेमतेमच. आता त्यामुळे नाटकांचे गोवा दौरेही घटत चालले आहेत खरे. पण मुद्दा तोही नाही. या क्षेत्राला तसा प्रतिसाद मिळत नसेल तर कलेच्या नावाखाली तालुकावार रवींद्र भवनांची मागणी का होतेय, हे कोडे मात्र अनेकांना सुटत नाही.

तेंडुलकरांचा ‘षटकार’

माजी खासदार विनय तेंडुलकर म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचे व्‍यक्तिमत्त्‍व. राजकारणात असूनही राजकारणी न वाटणारी अशी ही व्यक्ती. ते आता ७ ते ९ मेपर्यंत सावर्डे मतदारसंघात क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करणार आहेत. या स्‍पर्धेतील विजेत्‍या संघांना, खेळाडूंना भव्य बक्षिसे तर मिळणार आहेच, शिवाय प्रेक्षकांनाही खास पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अशा प्रकारची भव्य-दिव्य स्‍पर्धा यापूर्वी सावर्डे मतदारसंघात तरी झालेली नाही असे या मतदारसंघातील लोक बोलताना दिसतात. मात्र यामुळे तेंडुलकर साहेबांची कॉलर ताठ व्‍हायला लागली आहे. आता याचा फायदा त्यांना सावर्डे मतदारसंघाची भाजपची उमेदवारी मिळण्यात होतो की काय हे मात्र बघावे लागेल. ते होईल तेव्हा कळेलच म्हणा, पण तेंडुलकरांनी टुर्नामेंट मात्र योग्य वेळी निवडले आहे एवढे खरे. प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावसकर नाही तरी म्हणून गेला आहेच की...‘‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला’’ नाही का?

पुन्‍हा केतन की राजेश?

फोंडा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे केतन भाटीकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी राजेश वेरेकर यांनी भाटीकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर वेरेकर यांनी २०२७च्या विधानसभा निवडणुकीत आपण काँग्रेसतर्फे इच्छुक असल्याचे सांगून बाँबगोळाच टाकला आहे. आता केतन की राजेश, अशी द्विधा मन:स्थिती काँग्रेस नेत्यांची नक्कीच झालेली असेल. पण पोटनिवडणुकीत केतनला पाठिंबा देऊन माघार घेतलेल्या राजेशप्रमाणे, जर त्‍यांना उमेदवारी मिळाली तर केतन माघार घेणार काय, अशी कुजबूज फोंड्यात सुरू झाली आहे.

प्रतिमा मॅडमचा लढा

सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो अलीकडे बऱ्याच फॉर्मात आहेत. ‘गोंयच्या सायबा’वर गौतम खट्टरने आक्षेपार्ह टिप्पणी केल्‍यानंतर प्रतिमा मॅडमने मडगाव पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. मेणबत्ती फेरीही काढली. खट्टरला अटक करावी अशी मागणी लावून धरली. त्‍यांची मागणी पूर्ण झाली. आता मंत्री माविन गुदिन्हो यांना अटक करा व आयोजकांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करताना आमचा लढा सुरूच राहील असे मॅडम वारंवार सांगतात. मात्र रूपरेषा काही उघड करत नाहीत. प्रतिमा मॅडमचा पिंड पडला राजकारणी. सध्या त्या कुठल्याही पक्षात नसल्या तरी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्‍यांची इच्छा काही लपून राहिलेली नाही. त्यासाठी पॉलिटिकल मायलेज मिळविण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न आहे, असे आम्‍ही नव्‍हे तर त्‍यांचे विरोधक बोलतात. त्यात किती तथ्य आहे हे लवकरच सर्वांना कळले म्हणा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अकरावीसाठी आजपासून प्रवेश, शिक्षण विभाग सज्ज; वाणिज्य, विज्ञान शाखेत चुरस अपेक्षित

लग्नाच्या धामधुमीत चोराची 'धडाकेबाज' एन्ट्री! पाहुण्यांनी केलेला आहेर लांबवला, 8 तोळे सोन्यासह 20 लाखांची 'हात सफाई'

Gautam Khattar: 9 दिवसांनी खट्टर गोव्‍यात; सहा दिवसांची पोलीस कोठडी, क्राईम ब्रँचने हिमाचलमधून केली अटक

Goa Unseasonal Rain: वाळपईला अवकाळी पावसासह चक्रीवादळाचा तडाखा, झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड; घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

Goa Road Accident: दुचाकींच्या धडकेत दोघेजण ठार, बागा येथील दुर्घटनेत अन्य दोघे जखमी; कामावरून घरी परतताना घाला

SCROLL FOR NEXT