Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: निवडणुकीवेळी मतदार 'राजा भोज' नंतर 'गंगू तेली'!

Khari Kujbuj Political Satire: ‘कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली’ असे हिंदीत एक बोधवाक्य आहे. निवडणूक जवळ आली की पाच वर्षे ‘गंगू तेली’ असलेला मतदारराजा ‘भोज’ बनतो.

गोमंतक ऑनलाईन टीम

निवडणुकीवेळी मतदार ‘राजा भोज’ नंतर ‘गंगू तेली’!

‘कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली’ असे हिंदीत एक बोधवाक्य आहे. निवडणूक जवळ आली की पाच वर्षे ‘गंगू तेली’ असलेला मतदारराजा ‘भोज’ बनतो. आता सध्या सगळेच मतदाराला मतदारराजा म्हणून संबोधू लागले आहेत. आमदार बनण्यास इच्छुक असलेल्यांचे तर विचारूच नका. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भावी आमदार काहीही करायला तयार असतात. नाचायला लागले तर नाचायलाही हे भावी आमदार मागे पुढे पाहत नाहीत. कोण महिलांबरोबर फुगडी खेळतो, तर कोण पंचतारांकीत हॉटेलात पक्वान्न खाणारे आपल्या मतदारांबरोबर बसून गाड्यावर ऑम्लेट खातात. सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी आपल्या मतदारराजाला खूष करण्यासाठी धनगरांच्या वेशात धनगर नृत्य केले. आता पाहूया पुढे कोण कोण काय काय करतो...

गिरीशचा मडगाववर डोळा?

काँग्रेसचे प्रदेेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांनी २०२७ ची विधानसभा निवडणूक आपण लढविणार हे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्‍याचे कारण देताना ते म्‍हणतात, जर विधानसभा निवडणुकीच्‍या लढाईत कुठल्‍याही पक्षाचा नेताच उतरत नसेल तर ती नेतृत्वहीन लढाई ठरते. त्‍यामुळे आपण निवडणूक लढविण्‍याचा निर्णय घेतला आहे. गिरीश हे फातोर्डा मतदारसंघात रहाणारे, पण गोव्‍यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्‍यात युती होणार असे गिरीश म्‍हणतात. त्‍यामुळे गिरीश यांना फातोर्ड्यातून उमेदवारी मिळणे कठीण. अशा परिस्‍थितीत गिरीश कोणत्‍या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतील? आता काहीजण असे म्‍हणतात की, गिरीशचा मडगाव मतदारसंघावर डोळा आहे आणि विजयच्या साहाय्‍याने ते ही निवडणूक लढवू पाहतात. असे जर घडले तर चिरागचे काय होणार?

‘आरजी’च्या विलीनीकरणाची दिल्लीत चर्चा...

रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाच्‍या वीरेश बोरकर व मनोज परब यांच्‍यात सुरू असलेल्‍या तुंबळ युद्धाची दखल मंगळवारी दिल्‍लीत झालेल्‍या काँग्रेसच्‍या बैठकीत घेतली नसती तरच नवल! गोव्‍यामध्‍ये सुरू असलेल्‍या घडामोडींची दिल्‍लीतील नेत्‍यांना पुरेपूर जाणीव आहे. त्‍यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्‍ठी ‘आरजी’सोबतच्‍या संभाव्‍य युतीसंदर्भात सावध बनले आहेत. या प्रश्‍‍नावर बोलताना - घटक पक्षांना विलीन करून घेण्‍याचा प्रस्‍ताव सामोरे आला. विशेषत: ‘आरजी’ला विलीन करून घेणे सोईस्कर असल्‍याची चर्चा झाली. समजा ‘आरजी’सोबत काँग्रेसची युती झाली; त्‍यांना सात ते आठ जागा बहाल करण्‍यात आल्‍या आणि निवडणूक आयोगाने जर ‘आरजी’चे चिन्‍ह रद्दबातल ठरवले किंवा पक्षाच्‍या अस्‍तित्‍वालाच आव्‍हान दिले, तर काँग्रेसच्‍या सात - आठ जागा अस्‍तित्‍वहीन होऊ शकतात, याची जाणीव पक्षश्रेष्‍ठींना आहे. या सर्व बाजूंची चर्चा दिल्‍लीत झाल्‍यामुळे निवडणुकीपूर्वी काही तातडीचे निर्णय काँग्रेसने घेण्‍याचे नक्‍की केले आहे.

अधिकाऱ्यांची अरेरावी थांबणार कधी?

म्हापसा पालिकेत महत्त्वाची कागदपत्रे आणि फाईल गहाळ होणे, ही आता नेहमीचीच बाब झाली आहे. विशेष म्हणजे, नंतर सातत्याने पाठपुरावा केल्यावर किंवा दबाव आल्यानंतर याच फाईल चमत्कारिकरीत्या समोर येतात. एका नामांकित प्राथमिक शाळेच्या जागा हस्तांतरणाचा विषय प्रलंबित राहिल्याने पालिकेचा हा कथित कारभार पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संतप्त संबंधित शाळेच्या पालकांनी म्हापसा पालिकेत जाऊन प्रशासनाला जाब विचारला. याच शाळेच्या एका प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पालिकेच्या एका वरिष्ठ अभियंत्याने शाळा व्यवस्थापनाशी अरेरावी करत अप्रत्यक्ष धमकी दिल्याची माहितीही यावेळी शाळा प्रतिनिधींनी माध्यमांना दिली. पालिकेत वारंवार असा बेजबाबदारपणा दिसूनही दोषींवर कारवाई का होत नाही? हा खरा संशोधनाचा विषय आहे. संबंधितांवर वेळीच चाप लावला नाही, तर असे प्रकार सुरू राहतील, यात शंका नाही.

अखेर ‘टोईंग’चा दणका!

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यांनाच खासगी पार्किंग समजणाऱ्या दुचाकीस्वारांना अखेर कळंगुटमध्ये धडा शिकवण्यास सुरुवात झाली आहे. वाहतूक कक्ष आणि पंचायत यांनी संयुक्तपणे बेकायदा पार्किंगविरोधात मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावर गाड्या कुठेही उभ्या करून इतरांची वाट अडवणाऱ्यांना आता उचलून नेण्याचा प्रसाद मिळतोय. विशेष म्हणजे, नियम पाळण्याचे आवाहन करूनही न सुधारणाऱ्यांना आता थेट कृतीतून उत्तर मिळत आहे. ही मोहीम केवळ कळंगुटपुरती न राहता राज्यभर पोहोचली, तर वाहतूक कोंडीला काहीसा तरी उतारा मिळेल!

...म्‍हणून काँग्रेस बोरकर गटासोबत!

आरजी पक्ष हे आपले अपत्‍य असून पक्ष आपल्याकडेच असल्‍याचा दावा मनोज परब करीत आहेत. शिवाय, वीरेश बोरकर यांच्‍या गटाशी युती केल्‍यावरून काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष गिरीश चोडणकर यांच्‍यावरही टीका करीत आहेत, पण त्‍याचवेळी काँग्रेसने गोव्‍याच्‍या भवितव्‍याचा विचार करून उमेदवार दिल्‍यास विरोधकांच्‍या आघाडीत सहभागी होण्‍याचेही संकेत ते देत आहेत. आरजीत घडत असलेल्‍या या घडामोडींमुळे चोडणकर यांच्‍यासह इतर सर्वच वरिष्‍ठांना आघाडीत नेमके कुणाला घ्‍यायचे? असा प्रश्‍‍न निर्माण झालेला आहे, परंतु भाजपनेच आरजीत फूट पाडली हे जनतेला दाखवून देण्‍यासाठी प्रदेश काँग्रेसचे नेते अजूनही बोरकर गटासोबतच असल्‍याचे बोलले जात आहे.

जनगणनेसाठी वेगळी एजन्सी का नाही?

सध्या गोव्यात जनगणना प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सरकारी कचेऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुष्कळ कमी दिसते. कामासाठी गेलेल्यांना ‘सध्या कर्मचारी सेन्सससाठी गेले आहेत’ असे उत्तर मिळते. आधीच सरकारी कामे म्हणजे हत्तीच्या चालीप्रमाणे असतात. त्यातच आता शनिवारी सुट्टी. त्यामुळे आठवड्यातून केवळ पाच दिवस काम. त्यामुळे सामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबणे साहजिकच आहे. त्यातच जर या कर्मचाऱ्यांना जनगणनासारख्या इतर कामांसाठी पाठवले, तर मग लोकांची कामे पूर्ण होणार कशी? हा प्रश्न सदैव विचारला जात आहे, त्यातच आता शिक्षकांनासुद्धा जनगणनेची जबाबदारी दिली आहे. अशा परिस्थितीत शिक्षकही शाळेत अनुपस्थित असल्याचे आढळू लागले आहे. अशा परिस्थितीत शिक्षक अभ्यासक्रम कसा पूर्ण करणार. यात विद्यार्थ्यांचेच नुकसान नाही का? हा प्रश्न फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. सरकारी कर्मचारी व शिक्षकांना वगळून हे काम वेगळ्या एजन्सीमार्फत पूर्ण करण्याजोगे नाही का? सरकार बारीक सारीक कामे एजन्सीमार्फत करते. मग जनगणनेसाठी वेगळी एजन्सी नियुक्त करणे शक्य नाही का? असा प्रश्न सध्या लोक विचारू लागले आहेत.

नेत्यांच्या पोस्टरांमुळे धोका

लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रसिद्धीसाठी राजकीय नेते काय काय उपद्‍व्याप करतील सांगता यायचे नाही. आता पोस्टरचेच पाहा. चतुर्थी, दिवाळी, नाताळ किंवा स्वतःचा वाढदिवस आला की शहरभर पोस्टर लावले जातात. सर्वच राजकीय नेतेमंडळी हा खटाटोप करतात, पण या पोस्टरमुळे शहराचे किती विद्रुपीकरण होणार किंवा आपण पोस्टर लावतो ते वाहतुकीसाठी किती धोकादायक ठरू शकते, एखाद्या वीज खांबाला पोस्टर टांगल्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर काय होईल याचे कोणतेही सोयरसुतक या लोकांना नसते. फोंड्यात अनेक ठिकाणी अशी पोस्टर लावले जातात, पण ते कोणत्या जागी हे कुणी पाहत नाही. फोंडा बसस्थानकावरील पोस्टर तर वाहतुकीला पूर्णपणे अडथळा निर्माण करीत आहे, दुसऱ्या बाजूने येणारी गाडी दिसतही नाही, त्यामुळे अपघातांचा धोका आहे, पण फोंडा पालिका किंवा पोलिसांना त्याचे काहीच पडलेले नाही, काय म्हणावे याला.

वीरेशकडूनही योजना

रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षात (आरजी) पुन्‍हा प्रवेश केल्‍यापासून मनोज परब यांनी आपले ‘लक्ष्‍य’ केवळ पूर्वीचे साथीदार तथा आमदार वीरेश बोरकर यांना केले आहे. सांतआंद्रेत जाऊन वीरेश बोरकर यांना उघडे पाडण्‍याचा धमकीवजा इशाराही त्‍यांनी दिला आहे. याआधीही मनोज परब, अजय खोलकर यांनी त्‍यांना असाच इशारा दिला होता, परंतु ते अजूनही सांतआंद्रेत पोहोचू शकलेले नाहीत. त्‍यामुळे वीरेश बोरकर निश्‍चिंत आहेत, पण परब सांतआंद्रेत धडकलेच, तर त्‍यांना त्‍यांच्‍याच भाषेत परतवून लावण्‍याची योजनाही ते आखत असल्‍याची चर्चा आरजीच्‍या कार्यकर्त्यांत सुरू आहे.

प्रभव ‘सबसे तेज’?

काँग्रेस उमेदवारीसाठी जे कुणी इच्‍छुक आहेत, त्‍यांनी काँग्रेस कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज घेऊन जावेत असे आवाहन काँग्रेस पक्षाने करून दोन दिवस उलटले तरी हे फाॅर्म घेण्‍यासाठी कुणीच पुढे आले नव्‍हते. मात्र, काल मडगावचाे आवाजचे युवा नेते प्रभव नायक यांनी काँग्रेसच्‍या मडगाव जिल्‍हा कार्यालयात जाऊन हा फॉर्म स्‍वीकारून एका अर्थाने अर्ज स्‍वीकारण्‍याची बोहनी केली. वास्‍तविक मडगावात काँग्रेस उमेदवार म्‍हणून चिराग नायक यांचे नाव घेतले जाते आणि दुसऱ्या बाजूने सावियो कुतिन्‍हो हेही या उमेदवारीवर दावा करतात. असे असतानाही त्‍या दोघांनीही अजून हे फॉर्म घेतले नाहीत. अशा परिस्‍थितीत प्रभव नायक हेच ‘सबसे तेज’ असे म्‍हणायचे का?

बिनपैशाचा तमाशा!

मराठीत ‘बिन पैशाचा तमाशा’ अशी म्हण आहे. असे तमाशे खरेतर केवळ काही वेळेपुरते मनोरंजन करणारे असतात. केवळ मनोरंजन हाच त्यामागील उद्देश असावा. तसाच प्रकार सध्या राज्यात ‘रिव्होल्युशनरी’ म्हणणाऱ्यांमध्ये सुरू आहे. खरे तर एकमेकांना पाण्यात पाहण्याचा जो प्रकार दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये सुरू आहे, त्याकडे जनता कशा पद्धतीने पाहत आहे, हे त्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे. केवळ शिवराळ भाषा वापरली किंवा जीरवण्याची, संपवण्याची भाषा केली तर त्याचा शेवट राजकारणात तरी काय असतो, हे या नेत्यांनी जाणून घ्यायला हवे. अजून किती दिवस हा तमाशा सुरू राहणार आहे, हे माहीत नाही. गोव्यातील एखाद्या तियात्रिस्टाने त्यावर तियात्र निर्मितीही केली, तर नवल वाटायला नको.

एकत्रित स्वागत...

दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक चोपडे चौकात लागले होते. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार व भाजपचे राज्य सचिव दयानंद सोपटे, आमदार जीत आरोलकर, काँग्रेसचे नेते बाबी बागकर, गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर यांचे स्वतंत्र फलक होते. आता कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने फलकांत बदल झाला. सोपटे व पार्सेकर यांचा मिळून एकच फलक लागला तोही भाजपच्या कमळ चिन्हासह आणि तो चर्चेचा विषय ठरला आहे. या संकल्पनेमागे कोण आहे याचा अंदाजही चर्चा करणारे लावू लागले आहेत.

क्रूझ सिल्वांपुढे आव्हाने...

वेळ्ळीचे आपचे आमदार क्रूझ सिल्वा हे सध्या ‘डेंजर झोन’मध्ये आहेत. पेशाने अभियंते असलेले सिल्वा सर शांत स्वभावाचे. आपण बरे आणि आपले काम बरे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व. आजच्या या राजकारणात पब्लिसिटीला महत्त्व आहे. तेथे ते कमी पडतात. वेळ्ळी मतदारसंघात मागच्या खेपेला त्यांनी कॉँग्रेसचे उमेदवार सावियो डिसिल्वा यांचा पराभव केला होता. पुढच्या विधानसभा निवडणुकीत डिसिल्वा यांच्यासह माजी आमदार फिलिप नेरी व बेंजामिन सिल्वा हेही रेसमध्ये आहेत. वन टू वन मुकाबला झाला, तर काय घडेल हे तूर्त सांगता येत नाही. सध्या तरी क्रूझ यांच्यासमोर आव्हाने आहेत, हे मात्र तेवढेच खरे.

जनाभाई ‘इन ॲक्शन’, पण...

काणकोणचे जनार्दन भंडारी हे एक चळवळी व्यक्तिमत्त्व. काँग्रेस पक्षाचे ते खंदे समर्थक तसेच गिरीश चोडणकर यांचे पट्टशिष्य. आता हे सर्व पुराण येथे सांगायचे कारण म्हणजे जनाभाई पुन्हा एकदा काणकोणात सक्रिय झाले आहेत. राजबाग तारीर येथील स्थानिकांचा प्रश्न त्यांनी सध्या हाती घेतला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर काणकोण मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यांना ५,३५१ मते मिळाली होती. आता पक्के राजकारणी असल्याने त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीत उभे राहण्याची तीव्र इच्छा आहे हे सांगण्यासाठी कुणा राजकीय भविष्यकर्त्याची गरज नाही. मात्र, या खेपेला कॉँग्रेसच्या उमेदवारीसाठी चेतन देसाई यांनी जबरदस्त लॉबिंग केले आहे. तसेच माजी आमदार इजिदोर फर्नांडिस व विजय पै खोत हेही शर्यतीत आहेत. त्यांच्यासमोर जनाची डाळ शिजणार का?बघूया पुढे काय घडते ते.

प्रियोळवर मगोचा दावा

प्रियोळ मतदारसंघात एसटी आरक्षण झाले नाही आणि मगो - भाजप युतीचे फाटले तर मगोचे दीपक ढवळीकर हे पुन्हा एकदा आपले नशिब आजमावतील, असा अंदाज आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे आमदार गोविंद गावडे आहेत. प्रियोळ मतदारसंघात या यदाकदाचितवरच जास्त भर आहे. एसटी आरक्षण झाले तर विद्यमान आमदार असल्याने भाजप आपल्या आमदाराचा आधी विचार करतील, असाही अंदाज व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे मगोतर्फे जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी की सेवा संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र शिरोडकर यांना प्राधान्य देतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीपण मगोने आपला दावा प्रियोळवर केला आहे हे मात्र खरे.

जुने शिलेदार गेले कुठे?

म्हापसा शहरात सध्या विविध विकासकामांना चालना मिळाली असून विद्यमान आमदारांच्या उपस्थितीत अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे. मात्र, या सगळ्या धामधुमीत शहराच्या राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच विषयावर चर्चा रंगली आहे. एकेकाळी आमदारांबरोबर अगदी सावलीसारखे वावरणारे काही नगरसेवक आता अचानक गायब झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी आमदारांसोबत काही नवे चेहरे झळकत आहेत, तर काही पडद्यामागील जुने कार्यकर्ते आता थेट आघाडीवर आलेले दिसत आहेत. त्यामुळे ‘कालचे खास आज दूर आणि कालचे पडद्यामागचे आज पुढे’ असे नवे समीकरण म्हापशात तयार होत असल्याची चर्चा पालिका गोटात सुरू आहे. कायम सोबत फिरणारे माजी नगरसेवक स्वतःहून दूर झाले की त्यांना रणनीतीचा भाग म्हणून बाजूला केले गेले, यावर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झडत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हापशाच्या राजकारणात नक्की काय शिजतंय, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Daily Horoscope: शिव-सिद्ध योगाचा शुभ संयोग! 'या' राशींवर रोहिणी नक्षत्रातील चंद्रभ्रमणाचा प्रभाव; मिळणार मोठी संधी

Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

Traffic Licence Suspension: गोव्यात अपघात, मृत्यू आणि जखमींची संख्या वाढली; चालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई 91 टक्क्यांनी घटली!

Goa Accident: वडापाव खाऊन घरी परतताना काळाचा घाला; साकोर्ड्यात दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

Goa Land Issue: कोमुनिदाद जमिनीवर दोड्डामणींचे नाव; सांत आंद्रेत संताप, वीरेश बोरकर लक्ष्यावर!

SCROLL FOR NEXT