युतीची चर्चा जोरात; पण काँग्रेसच्या गोटात धुसफूस!
सध्या काँग्रेस आणि आरजीच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा रंगत असतानाच शिवोली मतदारसंघावरून राजकीय पडद्यामागे मोठी खलबते सुरू झाली आहेत. वरच्या पातळीवर जागावाटपाची गणिते जुळवण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांचे डोके भडकल्याचे दिसते. गेल्या निवडणुकीत जिंकलेली ही जागा मित्रपक्षाच्या पदरात पडणार, या शक्यतेने शिवोली ब्लॉक काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ब्लॉक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, ‘गेली पाच वर्षे आम्ही पक्षासाठी घाम गाळला, मग हक्काची जागा दुसऱ्याला का द्यायची?’ असा थेट सवाल उपस्थित केला. युतीची गोळाबेरीज वरिष्ठांना सोयीची वाटत असली, तरी शिवोलीतील हा अंतर्गत विरोध पाहता ही जागा युतीच्या वाटाघाटीत मोठी डोकेदुखी ठरणार. तसेही शिवोलीत काँग्रेसच्या तिकिटासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ∙∙∙
करुणानिधी ‘त्यांचे’ आदर्श
दोन दिवसांपूर्वी मडगावात १४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण नगरविकास मंत्री विश्वजीत राणे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी राणे यांनी दिगंबर कामत यांची स्तुती करताना राजकारणात वय नव्हे, तर अनुभव महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. दिगंबर कामत सलग सातवेळा मडगावातून जिंकून आले. पण अजूनही म्हातारे झाल्याचा ठपका त्यांच्यावर कुणीही ठेवलेला नाही. उलट बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांना त्यांचे वय झाल्याने त्यांनी आता निवडणूक लढवू नये, अशा प्रतिक्रिया बाणावलीतून येऊ लागल्या आहेत. पण, चर्चिलही वय महत्त्वाचे नाही, तर अनुभव हेच सांगतात. आपले म्हणणे पटवून देताना ते म्हणतात, तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी हे वयाच्या ९२ व्या वर्षी निवडणूक लढवितात, तर मी त्यांच्यापेक्षाही वयाने लहान असताना मी निवडणूक लढविण्यास विरोध का.
पणजीतील नगरसेवकांना ‘हेल्मेट’मुक्ती आहे?
पणजी महानगरपालिकेचे काही आजी-माजी नगरसेवक सर्रासपणे हेल्मेटचा वापर करीत नाहीत, असे आढळून आले आहे. वाहतूक पोलिसांसमोरून हे नगरसेवक बिनधास्तपणे फिरतात. शिवाय, यातील काहीजण तर मोबाईल कानाला लावून, मान वाकडी करून दुचाक्या हाकतात. त्यामुळे महानगरपालिकेच्या नगरसेवकांना वाहतूक पोलिस खात्याने ‘हेल्मेट’मुक्ती दिली आहे काय, असा प्रश्न पडतो. विना हेल्मेट दुचाकी चालवताना पकडल्यास हजार रुपये दंड आकारला जातो, मग नगरसेवकांवर कारवाई का नाही, असाही प्रश्न पडतो. त्यांच्यावर एवढी मेहरबानी कशासाठी? त्याचबरोबर काही नगरसेवक वाहतुकीचे निश्चित नियम पाळताना दिसतात. दुसरीकडे, काही महिला नगरसेवकांचे पती विना हेल्मेट दुचाक्या चालवताना दिसतात; पण वाहतूक पोलिसांना ते का नजरेस पडत नाहीत, असा प्रश्न सामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही.
वालंकाची सरशी!
फुटबॉलच्या मैदानावर वालंका आलेमाव यांनी बाजी मारली आणि आलेमाव कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा चर्चेत आले. गोवा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष कायतान यांच्यावर १६ मतांनी विजय मिळविल्यानंतर वालांकांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. विजयाचा आनंद साजरा करताना वालांका भावनिकही झाल्या होत्या. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी केवळ अध्यक्षपदापुरता मर्यादित नव्हता, हेच यातून दिसले. पण खरी उत्सुकता आता पुढेच आहे! नावेलीच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची चर्चा असताना फुटबॉलच्या मैदानावरील हा विजय राजकीय मैदानात कितपत उपयोगी पडतो, हे पाहावे लागेल. वडील चर्चिल आलेमाव यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याच्या दिशेने वालंकाची ही पहिली चाल मानायची का? फुटबॉलमध्ये विजयाचा गोल झाला, आता विधानसभेच्या मैदानात त्यांची कामगिरी कशी राहते, याचीच चर्चा रंगू लागली आहे!
आलेमाव विरुद्ध आलेमाव
चर्चिलचे पुतणे वॉरन आलेमाव यांचा मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. वॉरन आलेमाव यांना बाणावलीतील काही सरपंचांचा पाठिंबा असून काँग्रेसची बाणावलीची उमेदवारी त्यांनाच मिळणार, असे सांगितले जाते. दुसऱ्या बाजूने, मी पुन्हा बाणावलीतून निवडणूक लढविणार, असे खुद्द चर्चिल आलेमाव सांगतात. दोघांचेही दावे जर खरे ठरल्यास यावेळी बाणावलीत आलेमाव विरुद्ध आलेमाव अशी लढत होणार. त्यात आता कुठले आलेमाव बाजी मारणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणारच म्हणा. ∙∙∙
चांगल्याचं कौतुक; पण...
पोलिसांनी चांगली कामगिरी केली की अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती तत्परतेने झळकते. त्यांच्या कामगिरीचे कौतुकही केले जाते. पण चोरी, मारहाण किंवा खुनासारखा गुन्हा घडला की मात्र ग्रुपवर शांतता पसरते. मग पत्रकारांना आपल्या सूत्रांना कामाला लावून माहिती मिळवावी लागते. महिलांशी संबंधित संवेदनशील प्रकरणांत गोपनीयता समजू शकते; पण इतर गुन्ह्यांची माहिती लपविण्याचे कारण काय? चांगल्या कामाचे श्रेय घ्यायला पुढे असावेच; मात्र गुन्हेगारीविषयक जनजागृतीही लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शेवटी, पोलिसांच्या चांगल्या कामाची प्रसिद्धी झटपट आणि गुन्ह्यांची माहिती मात्र गुपचूप, असे कसे चालेल? कौतुकाइतकीच पारदर्शकताही महत्त्वाची. बरोब्बर ना!
गुन्ह्यांची माहितीही ‘गुप्त’!
मांद्रे पोलिसांचा कारभार सध्या काहीसा गुप्तचर यंत्रणेसारखा सुरू आहे की काय, अशी चर्चा रंगत आहे. चोरी आणि मारहाणीचा गुन्हा घडला, एका संशयिताला पकडण्यातही आले; मात्र या सगळ्याची अधिकृत माहिती माध्यमांपर्यंत पोहोचलीच नाही. दुसरा संशयित अटकेच्या भीतीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो आणि तेव्हा कुठे या प्रकरणाची कागदपत्रे समोर येतात. म्हणजे गुन्ह्याची नोंद असते, संशयितांचा शोधही सुरू असतो; पण माध्यमांच्या बाबतीत मात्र जणू ‘मौनव्रत’च पाळले जाते! आता प्रश्न एवढाच की, ही माहिती लपवण्यामागे केवळ प्रशासकीय गुप्तता आहे की आणखी काही? पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यात रस आहे की गुन्ह्यांची माहितीच उघड होऊ नये, यात? गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिस असतात, पण गुन्ह्यांची माहिती शोधण्यासाठी पत्रकारांनाच न्यायालयाच्या कागदपत्रांचा आधार घ्यावा लागत असेल, तर माहिती दडवण्याच्या या ‘गुप्त कारभाराचे’ रहस्य उलगडणार तरी कधी?
आम्हीच का महागडे?
गोव्यात भाजी महाग, मासे महाग, टॅक्सी म्हणजे विमानाचेच तिकीट. ओडिशातील गंजम जिल्ह्यातील रायझोला आणि इतर काही भागांत तसेच बिहारमध्ये, ग्रामस्थ पंचायत कार्यालयांना वर्षाकाठी केवळ २ ते १० रुपये इतका घरकर भरतात. याउलट, गोव्यातील रहिवाशांना हजारो रुपयांचा घरकर भरण्यास भाग पाडले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील ग्रामपंचायत रचना वेगळी आहे का? आमच्या ग्रामपंचायती रहिवाशांकडून कचरा व्यवस्थापन करदेखील वसूल करतात. ग्रामपंचायत कार्यालय रहिवाशांकडून विविध कर वसूल करत असेल, ठीक. परंतु कोणतीही ठोस विकासकामे करत नसेल किंवा नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत नसेल, तर अशा ग्रामपंचायतीचे काम काय? हा जनतेचा प्रश्न आहे. नागरिक श्वासासाठी जी हवा घेतात, त्या हवेवर जर कर असता, तर हाहाकार झाला असता, असे लोक विचारू लागले आहेत.
सगळे जाग्यावर येतील
म्हापशात भाजपचा उमेदवार कोण हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी दिवाळीनंतर आणखी काही इच्छुक समोर येतील, असे मिश्कीलपणे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्वांनाच भाजपची उमेदवारी हवी यावरून म्हापशाची उमेदवारी किती महत्त्वाची आहे हे सर्वांनाच कळून चुकले. उमेदवारी ठरवण्याची भाजपची पद्धत आहे. उमेदवारी ठरली की इतर सर्वच जाग्यावर येतील आणि उमेदवाराला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल. आता कोण कोणाला नंतर पाठिंबा देईल, याची चर्चा या वक्तव्यानंतर रंगू लागली आहे.
कोंबडीची फिटनेस चाचणी
गोमंतकीय हा चिकनपेक्षा माशावर अधिक मनसोक्तपणे ताव मारणारा असला, तरीदेखील सध्याच्या फास्टफूडच्या जमान्यात चिकन चिली, चिकन सुक्क्याची चलतीदेखील अधिक आहे. त्यामुळे चिकनला मागणी अधिक आहे. अशावेळी मोठ्या प्रमाणात परराज्यांतून आयात होणाऱ्या बॉयलर कोंबड्यांच्या फिटनेसची चाचणी होणे गरजेचेच आहे. जर अशक्त, रोगराई असलेली कोंबडी खाल्ली, तर त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होणार असल्यामुळे नागरिक जे चिकन सेवन करतात, त्या कोंबड्या फिट असणे गरजेचे आहे. सरकारच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. हल्ली प्रोटीनसाठीदेखील चिकन सेवन वाढल्याने हा निर्णय गोमंतकीयांचे आरोग्य फिट ठेवण्यासाठी गरजेचा आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आता पशुपालन खाते कशा प्रकारे कारवाई करते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
युरी-एल्टन, कार्लुस दिसलेच नाहीत!
बाणावलीतील सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे चुलत बंधू वॉरेन आलेमाव यांचा काँग्रेस पक्षात मंगळवारी जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेस भवनात हा पक्षप्रवेश दुपारी पार पडला. या प्रवेशाला त्यांचे बंधू युरी आलेमाव, केपेचे आमदार तथा पक्षाचे कार्याध्यक्ष एल्टन डिकॉस्ता, ॲड. कार्लुस फेरेरा, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस ही मंडळी दिसलीच नाहीत. ही सर्व मंडळी का उपस्थित राहिली नाहीत, हे त्यांनाच आणि पक्षातील वरिष्ठांनाच माहीत असेल. त्यांची अनुपस्थिती मात्र काहींना खटकली. असो, वॉरेन हे बाणावली मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा ठोकू शकतात, हे आता नाकारता येणार नाही.
राजेश जोमात!
फोंड्याच्या राजकारणाला सध्या चांगलाच रंग चढू लागला आहे. ‘पात्राव’नंतर फोंड्याला अद्याप वारसदार मिळालेला नसला, तरी आमदारकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी भाजप, मगो, काँग्रेस, आप आणि आरजीने आपापल्या परीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. भाजपमध्ये दोन दावेदार, मगोचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात; मात्र काँग्रेसने राजेश वेरेकर यांच्याबाबत जवळपास निश्चिती केल्याची चर्चा आहे. सध्या राजेश हे चांगलेच जोमात आहेत. फोंड्यातील समस्यांवरून पालिका मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांनी पालिकेला धारेवर धरले आहे. त्यामुळे राजेशबाबांची चर्चा रंगू लागली आहे. आता पालिकेतील प्रश्नांवरून सुरू झालेली ही आक्रमकता निवडणुकीच्या मैदानात किती उपयोगी पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पक्ष काय ते ठरवेल
पेडणे मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण, हाही चर्चेचा विषय आहे. आमदार प्रवीण आर्लेकरही जोरकसपणे ‘मीच उमेदवार असेन’, असे सांगत नाहीत. पेडण्यात कोण लढेल, असे विचारल्यावर ‘पाहूया, पक्ष काय ते ठरवेल’, असे उत्तर देत त्यांनी उत्कंठा वाढवली आहे. एकीकडे जोरदार आरोप करत माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आर्लेकर यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. दुसरीकडे, मगोचे राजन कोरगावकर यांनी लोकसंग्रह वाढवणे सुरू केले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीआधी मगोमधून भाजपमध्ये आलेल्या आर्लेकरांचे काय, हा प्रश्न निश्चितपणे निर्माण झाला आहे.
‘त्या’ शाळेची मुले उतरणार प्रचारात?
राजकारण हे राजकारणासारखेच करायला हवे. इतर क्षेत्रांत राजकारण आणले तर मात्र ते गैर ठरते. कायद्याने लहान मुलांचा, विशेष करून शालेय मुलांचा, राजकारणात वापर करणे हे गैरच नव्हे, तर गुन्हा ठरते. मात्र, आपले राजकारणी लहान मुलांनाही आपल्या स्वार्थासाठी राजकारणात ओढतात आणि त्यांच्या कोवळ्या मनावर अन्याय करतात. काँग्रेस पक्षाने काढलेल्या ‘गोंय राखण यात्रे’त एका लहान शालेय मुलीला गोवा राखण्याचा संदेश देणारे भाषण राजकीय सभेत द्यायला लावणे उचित होते का? युरी आलेमाव यांनी लहान मुलांकडून ‘एक दो एक दो, भाजपा को फेक दो’ अशा घोषणा द्यायला लावणे योग्य होते का? केवळ कायदा म्हणून नव्हे, तर एक तत्त्व म्हणून राजकीय पक्षांनी अशा प्रकारांपासून लांब राहायला नको का? असा सवाल काही सुज्ञ लोक विचारत आहेत.
कोणी प्रसाद घेतला
आपल्या विरोधात उमेदवारी मिळवण्यासाठी काहींनी प्रयत्न केला. त्यांना देवाचा प्रसाद मिळाला नाही. देवाचा प्रसाद नाही म्हणजे उमेदवारी नाही. त्यामुळे आपणास ४५०० मतांनी हरवण्याचा प्रश्नच येत नाही, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले. त्यांनी मतदारसंघात काहीही न करता आमदार होण्याची स्वप्ने काही जणांना पडू लागली आहेत, असा टोलाही कोणाचेही नाव न घेता लगावला. उपस्थितांना तो टोला हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर यांना उद्देशून होता, हे समजल्याशिवाय राहिले नाही. त्यामुळे रेडकर आता त्याला प्रत्युत्तर कसे देतात, याकडे लक्ष असेल.
वकिली अनुभवाचा फसवणुकीसाठी प्रताप?
काडीचाही संबंध नसतो शिक्षण आणि सुवर्तन यांचा. भौतिक वखवखीमुळे उच्चविद्याविभूषित व्यावसायिकही पैशांच्या लोभापोटी दुर्वर्तने करतात, हे पाहून लोकांनाच धक्का बसत आहे. ईडीच्या पणजी विभागाने मुंबईच्या एका वकिलाला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली. मुंबई विमानतळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपानुसार, मध्यस्थांमार्फत रोख लाच देण्याची व्यवस्था करून सुमारे १०० बँक खात्यांतील गोठवलेली रक्कम काढण्यास वकिलाने मदत केली. या प्रकरणात सुमारे २८ हजार कोटींच्या व्यवहारांचा समावेश आहे. हे जाळं मोठं आहे. साखळी लांब आहे. ३०० हून अधिक पीडितांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. या प्रकरणातील ही सातवी अटक आहे. गोव्यात सरासरी दर दिवशी एक सायबर फसवणूक होत आहे. सागरालाच लागली आग, या न्यायाने वकीलच सराईत गुन्हेगार निघाल्याने लोक तोंडात बोटे घालत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.