पाटकारांबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रश्न
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा नेमणूक झाल्यानंतर गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदा घेऊन सरकारवर हल्ले चढवण्यास सुरवात केली आहे. त्याचवेळी माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरही आता काँग्रेस कार्यालयाऐवजी स्वत:च्या कार्यालयात पत्रकार परिषदा घेत भाजप सरकारला उघडे पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे दोन्ही नेते काँग्रेसचे आजी-माजी प्रदेशाध्यक्ष असतानाही पाटकर काँग्रेसचे नेते म्हणून काँग्रेसच्या कार्यालयात बसून पत्रकार परिषदा का घेत नाहीत? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांनाच पडला आहे.
स्वतः दुचाकी चालवायला शिका!
राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर अनेक गोष्टी जमाव्या लागतात, त्यातलीच एक साधी; पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुचाकी चालवणे. म्हापसा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते संदीप फळारी हे आमदार होण्यासाठी सर्व दृष्टीने योग्य नेते आहेत; पण त्यांची एकच अडचण ठरली, त्यांना स्वतःला दुचाकी चालवता येत नाही. नेहमी दुसऱ्याच्या दुचाकीवर मागे बसून फिरण्याच्या या सवयीमुळे ते राजकारणातही थोडे मागेच राहिले, अशी कबुली त्यांच्या ६१व्या वाढदिवसाच्या सत्कार समितीनेच दिली. हा किस्सा सांगत आगामी निवडणुकीत उतरू पाहणाऱ्या इतर नेत्यांनाही एकप्रकारे मजेशीर सल्ला मिळाला आहे की, जनतेत टिकून राहायचे असेल, तर गाडीचे हँडल दुसऱ्याच्या हातात देऊन चालत नाही, स्वतः चालवायला शिकलेच पाहिजे!
मायकल लोबोंची नजर म्हापशावर?
मायकल लोबो हे कळंगुट मतदारसंघाचे आमदार; मात्र त्यांना काळंगुट मतदारसंघात काय चाललेय यापेक्षा इतर मतदारसंघांत ढवळाढवळ करण्यात जास्त रुची वाटत असावी. कळंगुट पंचायत क्षेत्रातील सहा नाईट क्लब सरकारने बंद केले होते. आता सरकारच्याच एका बड्या नेत्याने एक नाईट क्लब खुला केला आहे, त्याबद्दल मायकल तोंड उघडत नाहीत. मात्र, म्हापसा पालिकेच्या राजकारणात त्यांना रुची वाटते. म्हापसा पालिकेवर कसले आणि कसे नगरसेवक असावेत, याची चिंता लोबो यांना जास्त सतावत आहे. मायकलबाब उत्तर गोव्याचे ‘किंग मेकर’ बनण्याची इच्छा आहे की काय? असे आता मायकलविरोधक विचारायला लागले आहेत.
फोंड्यातील राजकारण
सध्या जलसंवर्धन मंत्री तथा शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी ‘जनता दरबार’द्वारा फोंड्यात लक्ष घालायला सुरवात केली आहे. आठवेळा निवडून येणारे सुभाषभाऊ हे फोंडा तालुक्यातील एकमेव आमदार. तसे त्यांनी आतापर्यंत शिरोडा सोडून इतर मतदारसंघांत कधीच ढवळाढवळ न केल्यामुळे फोंड्यातील त्यांचे जनता दरबार चर्चेचा विषय ठरायला लागले आहेत. फोंड्याला सध्या आमदार नसल्यामुळे पालकमंत्री या नात्याने ते लक्ष घालित आहेत, हे जरी कारण देण्यात येत असले तरी ‘ग्यानबाची मेख’ वेगळीच असल्याचे बोलले जात आहे. ‘मगो’ पक्षाने शिरोड्यात लक्ष घालायला सुरवात केल्यामुळे नाराज झालेल्या सुभाषभाऊंनी फोंड्यात आपले वर्चस्व आहे, असे सांगणाऱ्या ‘मगो’ला काटशहा देण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा कितपत संयुक्तिक आहे हे सांगणे कठीण असले तरी राजकारणात बरेच उन्हाळे-पावसाळे पाहिलेले सुभाषभाऊच अशाप्रकारची ‘खेळी’ खेळू शकतात, हेही तेवढेच खरे. नाही का?
पोलिस वजन पाहतात?
लोकांनी तक्रार घेऊन पोलिस ठाण्याची पायरी चढली की तक्रार नोंदवायला मात्र पोलिसांकडून वेळ लागतो, अशी चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. त्यातच राजकीय हस्तक्षेपाचा आरोप झाला की, मग ‘तक्रार कोणाची आणि वजन कोणाचे?’ असा प्रश्न लोकांच्या मनात येतोच. आता न्यायालयासमोर पोलिसांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राबाबतही असमाधान व्यक्त होत असल्यास सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर त्यात नवल ते काय? लोक म्हणतात, पोलिस नेमके कोणाच्या बाजूने उभे आहेत- तक्रारदाराच्या, की तक्रारीला वजन देणाऱ्याच्या? अशी चर्चा सध्या सुरू आहे!
एल्टनना आला राग!
माणसाला राग येण्याची अनेक कारणे असू शकतात. काहींच्या कुंडलीत राग दोष असतो, त्याला कोण काय करणार? केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा बाबू कवळेकर सोडल्यास इतरांवर सहजासहजी रागवत नाहीत. मात्र, आम आदमी पक्षाने केपे मतदारसंघात मतदारांना एक छत्री, एक टॉर्च व एक चहाचा कप भेट दिल्याबद्दल एल्टनबाब बरेच संतप्त झाले. आम आदमी पक्षाने भेट दिली म्हणून ते रागावले नाहीत तर आपल्या मतदारांना हलक्या दर्जाची भेट दिली म्हणून एल्टनना राग आला. आपले मतदार शंभर रुपयांची भेट घेण्यासाठी भिकारी आहेत काय? असा संतप्त प्रश्न एल्टन यांनी ‘आप’ला विचारला आहे. ज्या मतदारसंघाचे आमदार एल्टन व माजी आमदार बाबू कवळेकर आहेत, त्या मतदारांना हलक्या दर्जाची भेट देण्याचे धाडस ‘आप’ने केलेच कसे?
युतीची बोलणी की शिळोप्याच्या गप्पा?
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सध्या सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी आमची बोलणी सुरू आहे, हे पालूपद लावून ठेवलेले आहे. मात्र, विरोधी पक्षांना विचारल्यास काँग्रेसने आमच्याकडे गांभीर्याने कधी बोलणी सुरू केलीच नाही, असे ते सांगतात. ‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष जार्सन गोम्स यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना काल हीच भावना व्यक्त केली. गाेम्स म्हणाले, युतीची बोलणी करायची असतील तर ती एका टेबलावर समोरासमोर येऊन करायची असतात; पण काँग्रेसचे नेते यासाठी कधीच प्रयत्न करत नाहीत. केवळ फोनवर त्यांची बाेलणी सुरू असते. गाेम्स म्हणतात, आधी गावातील महिला विहिरीवर पाणी भरताना गप्पा करायच्या. मात्र विहिरीवरच्या गप्पा आता होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या फाेनवर गप्पा सुरू असतात. काँग्रेसची युतीची बोलणी याच पठडीत मोडणारी आहे का? असा सवाल गोम्स यांनी केला. एकूणच ही युतीची बोलणी की शिळोप्याच्या गप्पा? असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे, एवढे नक्की.
साखळीतील जनता दरबार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पूर्वी साखळीत शनिवारी जनता दरबार भरवत असत. आता त्यांनी रविवार निवडला आहे. त्यांना येथे भेटण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक येत असून चांगला प्रतिसाद लाभत आहे. या जनतेच्या दरबारात कोणी दुःखे, आपल्या समस्या घेऊन येतो, कोणी शिक्षणासंबंधी, कोणी सरकार दरबारी अडकलेली कामे सोडविण्यासाठी, कोणी मदत मागण्यासाठी. ज्याचे काम तत्काळ करणे शक्य आहे त्यांची कामे करून दिली जातात. इतर कामांत मुख्यमंंत्री अधिकाऱ्यांनी निर्देश देतात. यावेळी आलेले लोक आपल्या कुटुंबातील प्रमुखाकडे ज्याप्रकारे एखादी मागणी करतात तशाच प्रकारे मुख्यमंत्र्यांकडे भावना व्यक्त करतात. आणि जनतेलाही माहीत आहे की, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले म्हणजे... भिवपाची गरज ना!
म्हणे, एल्टनची समाजसेवा!
केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी वेळ्ळी मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे, असे सांगितल्यामुळे आम आदमी पक्षातून त्याला तीव्र आक्षेप घेतला जात आहे. जर एल्टन वेळ्ळीत उभे राहू पाहतात तर काँग्रेस आमच्याशी युतीची बोलणी कसे करू शकते? असा सवाल ‘आप’चे पदाधिकारी आता करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर एल्टन डिकॉस्टा यांची प्रतिक्रिया विचारली तर ते म्हणतात, चिंचोणे हे माझे आजोळ आणि या परिसराशी मी लहानपणापासून जोडलेलो आहे. तिथे माझे कित्येक चाहते आहेत आणि त्यांना फक्त सामाजिक भावनेतून मी मदत करतो. त्यात कुठलेही राजकारण नाही. एल्टन डिकाॅस्टा यांनी वेळ्ळीत सुरू केलेले काम फक्त समाजसेवाच म्हणायची का?
विश्वास - अविश्वास
राज्यात ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्या मंडळात अविश्वास ठराव येतच असतात. गटबाजी व अन्य कारणांमुळे नवीन अध्यक्ष होईस्तोवर विकासाला खीळ बसते, ही वास्तवता. एका कार्यकाळात कितीतरी अध्यक्ष होतात. खुर्ची वाटून घेणे ही गोष्ट अलाहिदा. प्रगती, उन्नती यांना बाधा येते. विश्वास पानीपतच्या लढाईत मेला, आता सगळाच अविश्वास अशी नकारात्मक, उपहासात्मक बोलायची काहींना सवय असते. होय. पानीपतच्या तिसऱ्या लढाईत विश्वासराव, पेशवा बाजीराव बाळाजींचा ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी मारला गेला, हे इतिहास सांगतो. त्या विश्वासाचे विनोदाचेही ठीक आहे. एका फार मोठ्या विचारवंताने म्हटले आहे - विश्वास ही अशी चीज आहे, जिथे वाटाघाटी चालत नाहीत. विश्वास हा एक तर असतो वा नसतो!
केपेतील कामांची चर्चा
जीभेवर साखर ठेवण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा हात कोणीही धरू शकत नाहीत, असे जाहीर वक्तव्य केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी हल्लीच केले होते. मुख्यमंत्री केवळ तोंड गोड करतात. मात्र, ती साखर पोटात जात नसल्याची खंत एल्टन यांनी व्यक्त केली होती. कदाचित एल्टन यांचे ते वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेले असणार. लगेच मुख्यमंत्र्यांनी एल्टन यांच्या मतदारसंघात रखडलेल्या पोलिस स्थानक इमारतीच्या कामासाठी निधी मंजूर केला. त्याशिवाय केपे मतदारसंघात अनेक विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केला आहे. आता केपे मतदारसंघ राखीव होणार असल्यामुळे आणि एल्टन व बाबू कवळेकर दोघेही अपात्र ठरल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केपे मतदारसंघात विकास गंगा आणली काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
९ व्यक्तींमागे एक कुत्रा!
राज्यात जवळपास दीड लाख भटके कुत्रे असून लोकसंख्या सुमारे १६ लाख आहे. म्हणजे साधारण प्रत्येकी नऊ व्यक्तींमागे एक कुत्रा, असे समीकरण बनते. अनेकवेळा हे कुत्रे नागरिकांना चावा घेण्याचे आणि रात्रीच्या वेळी मागे लागण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने आता सुरक्षेची भन्नाट व्यवस्था केल्याची चर्चा आहे. विरोधक म्हणतात, सरकार नागरिकांना इतर मार्गाने संरक्षण देण्यात अपयशी ठरले; पण सरकार मात्र वेगळ्याच पद्धतीने जनतेच्या सुरक्षेसाठी पुढे सरसावले आहे. रात्री रस्त्यावर फिरताना कुत्र्यांपासून वाचण्यासाठी लोकांना पोलिसांच्या सुरक्षेची गरज नाही, फक्त खिशात बिस्कीट ठेवा आणि या चार पायांच्या सुरक्षा रक्षकांना (कुत्र्यांना) खुश ठेवा, अशी ‘आयडिया’ दिली जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
मोफत बससेवा कधीपासून?
कर्नाटकात महिलांना ‘एसटी’ प्रवास मोफत करण्यात आला आहे. तशाच प्रकारची योजना गोव्यातही राबविण्याचा सरकारचा मानस आहे. खरे तर गेल्यावर्षी नवरात्रोत्सवापासून ही योजना अमलात आणणार, अशी चर्चा होती; परंतु अजूनही तिचा कोठे थांगपत्ता नाही. आता ही योजना पुढील काही महिन्यांत आली नाही तर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांना जाहीरनाम्यात महिलांना मोफत प्रवासाची हमी देण्याची संधी मिळेल; परंतु त्याचा लाभ मतदानात होईल की नाही माहीत नाही. मात्र, जर निवडणूकीपूर्वी योजना अमलात आणली तर त्याचा लाभ सत्ताधारी पक्षांना नक्कीच होईल, एवढे नक्की.
कैद्याचाही दणका
कोठडीत कैद्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या यंत्रणेलाच आता ‘जेल कॅन्टीन’च्या हिशोबाची परीक्षा द्यावी लागणार आहे. कोलवाळ कारागृहातील एका कच्च्या कैद्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेत कॅन्टीनमध्ये अवाजवी दर, तंबाखू व अमलीपदार्थांची कथित विक्री, तसेच काही कर्मचारी व कैद्यांच्या कथित संगनमताचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे, तर ‘सीसीटीव्ही’ फुटेज, फोन रेकॉर्ड आणि डिजिटल व्यवहार तपासण्याची मागणीही केली आहे. म्हणजे बाहेरच्या हॉटेलमध्ये बिल पाहून ग्राहक दचकतो, तर इथल्या कॅन्टीनमध्ये बिल न पाहताच कैदी म्हणतात, ‘साहेब, आधी दरपत्रक दाखवा!’ मात्र, हे सर्व आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून, त्यांची स्वतंत्र चौकशी होणे बाकी आहे.!
नावात काय आहे?
‘नावात काय आहे’, हे शेक्सपियरच्या नाटकातील हे वाक्य लोकांना माहीत आहे. खरेच नावात काहीही नसते? की नावात बरेच काही असते? यावर वेगवेगळे विचार असू शकतात. मात्र, गोव्यातील काँग्रेस पक्ष नावाला बरेच महत्त्व देत असल्याचे उघड झाले आहे. ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ हे काँग्रेस पक्षाचे खरे नाव. हा पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्याने गोव्यात ‘गोवा काँग्रेस’ असे नामांकन होऊ शकत नाही. आपल्या पक्षाच्या नावाचा इतरांना फायदा होणार व आपले राजकीय नुकसान होणार, अशी भीती प्रदेश काँग्रेस समितीच्या मनात घर करायला लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. गोव्यात गोवा काँग्रेस नावाचा एक नवा पक्ष उदयाला येणार असून जनतेत भ्रम निर्माण करण्यासाठी गोवा काँग्रेस पक्षाची स्थापना केल्याची तक्रार आता काँग्रेसने केली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
ज्येष्ठ नागरिकांचीही आठवण
भाजप समाजातील सर्व घटकांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्येष्ठ नागरिकही भाजपपासून दुरावू नयेत यासाठीही प्रयत्न सुरू असतात. ज्येष्ठ नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप माध्यमाची भूमिका पार पाडताना दिसत आहे. भाजपच्या ज्येष्ठ नागरिक समितीची बैठक गुरुवारी प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी नाईक यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याण, सन्मान आणि हितासाठी पक्ष सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सुविधा, सुरक्षितता आणि सन्मानाचे जीवन मिळावे, यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. सगळीकडे ‘जेन झी’चा उदोउदो सुरू असताना भाजपने कृतीतून आपले वेगळेपण दाखवून दिल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे.!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.