Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: शिवसेना वाटणार छत्र्या!

Khari Kujbuj Political Satire: गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यावेळी तृणमूल काँग्रेस विधानसभेच्या रिंगणात उतरली होती, त्यावेळी सर्वत्र रस्त्यांच्या कडेला चिन्हे आणि ‘नवी सकाळ’ हे वाक्य दिसत होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

शिवसेना वाटणार छत्र्या!

गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यावेळी तृणमूल काँग्रेस विधानसभेच्या रिंगणात उतरली होती, त्यावेळी सर्वत्र रस्त्यांच्या कडेला चिन्हे आणि ‘नवी सकाळ’ हे वाक्य दिसत होते. परंतु आता शिंदे गटाच्या शिवसेनेने नवी शक्कल लढवली आहे. शिवसेना राज्यातील नागरिकांसाठी येत्या १६ जूनपासून सदस्य नोंदणी कार्यक्रम हाती घेणार आहे. आश्चर्य म्हणजे, या उपक्रमांतर्गत नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या छत्र्या पावसाळ्यात उपयोगी पडतील आणि आपसूकच शिवसेनेचा प्रचारही होईल, असे पक्षाच्या नेत्यांना वाटते. मात्र, नेमक्या किती आणि कोणत्या मतदारसंघांत या छत्र्या वाटल्या जाणार आहेत, हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. बाकी छत्री वाटपाची शक्कल मात्र भारी आहे अन् तिची चर्चाही जोरात सुरू आहे.

‘युवा फॉरवर्ड’ला प्रशिक्षण

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या युवा विभागातील सदस्यांची संख्या वाढत आहे, ही पक्षासाठी सुखद बाब मानली जात आहे. त्यामुळे युवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांना सध्या विविध प्रश्नांवर पत्रकार परिषद घेऊन त्यांना व्यासपीठ तयार करून देण्याचा प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे. त्यासाठी पक्षाचे नेते दुर्गादास कामत सध्या युवकांना मार्गदर्शन करत असून पत्रकार परिषदांना कसे सामोरे जावे, याचे प्रशिक्षण देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी युवा फॉरवर्डने विधी महाविद्यालयांच्या परीक्षा आणि विद्यापीठापर्यंतच्या बससेवेच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेतली. युवकांना प्रोत्साहन देण्याचा हा नक्कीच चांगला प्रयत्न आहे, असे म्हणता येईल. याशिवाय या युवकांनी प्रशिक्षण घेण्याबरोबरच समाजमाध्यमांवर विविध पक्षांतील युवक कशापद्धतीने कार्य करतात, त्यांच्यातील बोलण्याची लकब, आक्रमकता, रस्त्यावर उतरण्याची तयारी आदी बाबींचाही अभ्यास केला पाहिजे. त्याचा त्यांना पुढे नक्कीच फायदा होईल. बरोब्बर ना..!

दिगंबर को गुस्सा क्यूँ आता है?

एकेकाळी दिगंबर कामत यांना शांत डोक्याने विचार करणारे राजकारणी म्हणून ओळखले जायचे. कितीही बिकट प्रसंग आला तरी आपली सहनशक्ती सोडायची नाही, असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे पत्रकारांनी विचारलेल्या तिरकस प्रश्नांनाही ते शांतपणे उत्तर द्यायचे. मात्र, आता वयोमानामुळे असेल, कदाचित कधी कधी ते पत्रकारांवरही भडकतात. मडगावातील पत्रकारांना तोच प्रत्यय आला. मडगावातील जुन्या आणि धोकादायक इमारतींबद्दल सरकार काय भूमिका घेते, असा प्रश्न कामत यांना विचारला असता, ‘‘त्या इमारती माझ्या मालकीच्या आहेत का?’’ असा प्रतिप्रश्न कामत यांनी केला. त्या इमारतींत राहणारे भाडेकरू बाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे इमारतींचे मालकही त्या इमारती पाडण्यासाठी पुढे येत नाहीत. अशा परिस्थितीत त्याला सरकार काय करणार, असा सवाल कामत यांनी केला.

मग फातोर्ड्यातून कोण?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक आणि फातोर्डा मतदारसंघ असे समीकरण गेली अनेक वर्षे कायम आहे. आता नाईक यांनी आपण फातोर्ड्यातून निवडणूक लढवणार नाही, असे सांगितल्याने तेथून भाजपचा उमेदवार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्ष जो उमेदवार निश्चित करेल, त्यालाच आपला पूर्ण पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले आहे. वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षसंघटना बळकट करणे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि राज्यात भाजपची सत्ता अधिक मजबूत करणे यावर आपला भर असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फातोर्ड्यात भाजपचा नवा चेहरा समोर येईल, असे मानले जात आहे.

कॉंग्रेसचे ‘कॉओर्डीनेशन’

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीची नव्याने रचना करून हायकमांडने माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची कॉओर्डीनेशन समिती म्हणजे समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. तर प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले सुनील कवठणकर यांची या समितीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. आता सार्दिनबाब आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यात विस्तव जात नाही, हे कॉंग्रेसवालेच नव्हे तर गोमंतकीयांना माहीत आहे. यापूर्वी सार्दिनबाबनी केलेली वक्तव्ये सोशल मिडीयावर आता हळुहळू व्हायरल होवू लागली आहेत. आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आल्या असताना फ्रान्सिस सार्दिन झाले गेले विसरून सर्वांबरोबर योग्य समन्वय साधणार की उपाध्यक्ष सुनील कवठणकरांच्या खांद्यावर अधिकतर जबाबदारी टाकणार, हे येणाऱ्या काळात दिसून येईलच.

राजेश वेरेकरांची ‘टोलेबाजी’

निवडणुका जवळ यायला लागल्यामुळे फोंड्यात अनेक इच्छुक सध्या मैदानावर यायला लागले आहेत. काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनीही कंबर कसायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. डेंग्यूचा धोका लक्षात घेऊन फॉगिंग मशीन काय, ॲम्बुलन्स काय, मेडिकल कॅम्प काय, चोहोबाजूंनी ते टोलेबाजी करताना बघायला मिळत आहेत. त्यांना आता तशी स्पर्धा नसल्यामुळे त्यांची काँग्रेसची उमेदवारी जवळजवळ निश्चितच आहे म्हणा. त्याशिवाय गेल्या दोन निवडणुकांचा अनुभव असल्यामुळे त्यांना ‘प्लस काय आणि मायनस काय’ हेही माहीत झालेले आहे. त्यामुळे कोणत्या चेंडूवर टोलेबाजी करायची, याचे ज्ञान त्यांना असल्याचे त्यांच्या या फटकेबाजीवरून दिसून येत आहे. आता बघूया, या टोलेबाजीचा त्यांना प्रत्यक्षात किती राजकीय फायदा होतो तो. घोडा मैदान तसे जवळच आहे म्हणा. नाही का?

रवींद्र भवनचे एक स्वप्न...

बार्देश तालुक्याचे हक्काचे रवींद्र भवन कागदावरच्या जागेवरून हलून प्रत्यक्ष जमिनीवर उतरायला काही तयारच नाही! म्हापशात हे भवन येणार, अशा फक्त हवेतल्या वल्गना ऐकू येत असल्याने विरोधकांच्या तिखट प्रतिक्रिया स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांना निमूटपणे ऐकून घ्याव्या लागत आहेत. मध्यंतरी कुचेली येथे जागेची मोठी पाहणी झाली खरी, पण पुढे एक दगडही सरकलेला नाही. अशातच आमदारसाहेबांनी चेंडू थेट सरकारच्या कोर्टात टोलावून स्वतःचे हात वर केले आहेत! म्हणतात कसे, ‘‘आम्ही जागा दाखवली आहे. आता तिथे भवन उभे करायचे की नाही, हे सरकार ठरवेल.’’ वा! आमदारांचे असे ‘खांदे पाडणे’ पाहिले की, म्हापसेकरांना रवींद्र भवनाची वास्तू बघायला आणखी कितीतरी वर्षे चातकासारखी प्रतीक्षा करावी लागणार, हे स्पष्टच दिसते! थोडक्यात काय, तर म्हापशाचा विकास इतका ऐतिहासिक झालाय की, तो डोळ्यांना दिसण्यापेक्षा फक्त आमदारांच्या बोलण्यातच जास्त अनुभवता येतोय. खरे नसेल तर म्हापसेकरांनाच विचारा?

विदेश शिरोडकरांचे गुणगान

कोलवा पोलिस ठाण्यात आता विदेश शिरोडकर हे नवीन साहेब आले आहेत. हल्लीच त्यांनी या ठाण्यात ‘पीआय’ पदाचा ताबा घेतला. ‘आपले काम बरे अन् आपण बरे’ असा त्यांचा स्वभाव. प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने ते आपल्या कामाचा गाजावाजा करत नाहीत. मात्र, कर्तव्यनिष्ठ असल्याने ते आपल्या स्टाफमध्ये लवकरच प्रिय झाले आहेत. शिरोडकर सरांनी कोलवा पोलिस ठाण्याचा ताबा घेतल्यानंतर त्यांना हे पोलिस ठाणे पेलवणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, मोबोर येथील खूनप्रकरणाचा त्यांनी अवघ्या काही वेळात छडा लावला. तसेच, ते या ठाण्यात आल्यापासून दरोडेही झालेले नाहीत, हे विशेष. आता या ठाण्यात प्रामाणिकपणे काम करणारे पोलिस त्यांचे गुणगान गाताना आणि त्यांची तोंडभरून स्तुती करताना आढळतात, बरे का

आता कारवाई कधी होणार?

न्यायालयात एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या साक्षीबाबतचा वाद आणि त्यावरील वृत्तांकन चांगलेच गाजले. या बातमीवर चर्चा रंगली आणि संबंधितांच्या कानावरही ती पोहोचली. पण त्यानंतर काय? हा प्रश्न अजूनही हवेतच लटकलेला दिसतो. गंमत म्हणजे हीच चर्चा काही पोलिस कर्मचारीही आपापसात करू लागल्याचे ऐकायला मिळत आहे. ‘बातमीचे काम म्हणजे लक्ष वेधणे; पण त्यानंतर कारवाईचे काय?’ असा प्रश्न ते मिश्कीलपणे विचारत आहेत. काहीजण तर म्हणतात की, बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित फाईलने बहुधा ‘ध्यानधारणा’ सुरू केली असावी, कारण तिची पुढची हालचाल कुणालाच दिसत नाही! मुख्यालयापासून पोलिस स्थानकांपर्यंत हा विषय चर्चेत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता प्रश्न जनतेपुरता मर्यादित राहिलेला नाही. ‘खरंच काही होणार का?’ हा प्रश्न काही पोलिसांनाच पडू लागल्याची चर्चा आहे. आता या चर्चेचा शेवट कारवाईत होणार की आणखी एका चर्चेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chicken Price Hike: भर उन्हाळ्यात ब्रॉयलर चिकनचे दर 'भडकले', किलोमागे 30 रुपयांनी वाढ; तरीही मागणी

Goa Murder Case: बोटमालकाच्या खूनप्रकरणी दोन मजुरांना अटक, आगशी पोलिसांकडून चौकशी सुरू; खुनामागील कारण अजूनही अस्पष्ट

खुशखबर! राज्याच्या नद्यांतील प्रदूषण घटले, केवळ दोनच प्रदूषित नदीपट्टे; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सादरीकरण

Monsoon Update: मान्सून रविवारपर्यंत गोव्यात! केरळमध्‍ये झाले आगमन; पुढील चार दिवस 'यलो अलर्ट' जारी

Maza Flat Scheme: फ्लॅटधारकांनाही आता मिळणार मालकी हक्क, मुख्‍यमंत्र्यांकडून 'माझा फ्लॅट' योजनेची घोषणा

SCROLL FOR NEXT