युरी भावी मुख्यमंत्री?
नशिबात असेल तर काहीही होऊ शकते! श्रमाच्या जोडीला नशिबाची साथ लाभली, तर स्वप्ने सत्यात उतरू शकतात, हे आपण अनेकदा अनुभवले आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव सध्या खुश असण्याचे कारणही तसेच आहे. ‘युरी भावी मुख्यमंत्री’ अशी पोस्ट आता समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागली आहे. एक काळ असा होता, जेव्हा काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी दक्षिण गोव्याचा आणि खास करून सासष्टीचा सत्तेवर मोठा दबदबा होता. मात्र, भाजप सत्तेवर आला आणि दक्षिणेचा सत्तेतील दबदबा संपुष्टात आला. आता पुन्हा एकदा काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आणि काँग्रेसचे युवा नेते व विद्यमान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून पुढे येत असल्याने युरी समर्थक चांगलेच खुश आहेत. युरी आलेमाव कुंकळळीचे आमदार असल्याने कुंकळळीकरही खुश आहेत. आता ही खुशी निवडणुकीपर्यंत टिकते की नाही, हे पाहावे लागणार. पण स्वप्ने पाहण्यात गैर तरी काय?
पाटकरांच्या मनात काय?
चार वर्षे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळताना अमित पाटकर यांनी पक्षाला काही प्रमाणात रुळावर आणण्याचा प्रयत्न केला, हे नाकारता येणार नाही. मात्र, निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या असताना गिरीशबाबांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आणि त्यानंतर पाटकर हे काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात काहीसे बाजूला पडल्याचे चित्र दिसू लागले. बैठकींसाठी आमंत्रण न मिळणे, पत्रकार परिषदेसाठी पक्षाच्या कचेरीची दारे बंद होणे, असे प्रकार चर्चेत आहेत. कुडचडे येथे ‘गोय राखण यात्रे’च्या तयारीसाठीच्या बैठकीला पाटकर, कुडचडे काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी गैरहजर राहिल्याने चर्चेला आणखी उधाण आले. एका बाजूला काँग्रेसमन असल्याचे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला पक्षाच्या कार्यक्रमांपासून काहीसे दूर राहायचे, याचा नेमका अर्थ काय? हल्ली काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासोबत पाटकर हे अधिक दिसत असल्याने पाटकरांच्या मनात नेमके चाललेय तरी काय?
भक्तीचा ‘नवा डाव’!
बुद्धिबळाच्या पटावर दिग्गजांना आपल्या चालींनी गारद करणाऱ्या महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णीने आता आयुष्याच्या पटावरही ‘नवा डाव’ सुरु केला आहे. भक्ती विवाहबद्ध झाल्याची बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याचा फोटो शेअर केल्यानंतर ही ‘चाल’ सगळ्यांच्याच लक्षात आली! काही काळापासून भक्तीने स्पर्धांमध्ये खेळणे कमी केले होते; मात्र ‘कोचिंग’मध्ये ती सक्रिय होती. त्यामुळे भक्ती सध्या काय करते, याचीही चर्चा होती. पण आयुष्याच्या पटावर तिने एवढी मोठी ‘चाल’ शांतपणे खेळली की, प्रतिस्पर्ध्यांनाच काय, चाहत्यांनाही कळले नाही! आता या नव्या डावात प्रेम, सुख आणि समृद्धीची ‘चेकमेट’ कायम राहो, एवढ्याच शुभेच्छा!
अपघात सत्र कधी थांबणार?
‘एआय’ कॅमेऱ्यांद्वारे चलन देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर अपघात थांबतील, अशी एक आशा होती. फोंडा आणि बागा येथे दोन वेगवेगळ्या अपघातांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गाडी भरधाव वेगाने हाकणे हे धोकादायकच असते. त्यात रात्रीच्या अंधारात चालकाला कसलाच अंदाज येत नाही. त्यामुळे हे अपघात घडले. जीव घेणारे हे भीषण अपघात ठरले. अपघात कसलेही असोत, त्यांचे परिणाम घातक असतात. काही लोक गंभीर जखमी होतात. रस्त्यावर गाड्यांची मागाहून टक्कर झाली, तर दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. ती कोंडी सुटण्यास तासभर लागतो. किती वेळ खर्च होतो, याला सुमार नसतो. सुरक्षितपणे आणि खास करून रात्री वाहने चालवणे ही एक जबाबदारी आहे.
नगरपालिकेच्या की विधानसभेच्या निवडणुका?
न्यायालयाने नगरपालिकेच्या निवडणुका स्थगित करून प्रशासक नेमता येत नाही, असे स्पष्ट केल्याने आणि २ जानेवारी २०२७ पूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने राज्य सरकारसमोर पेच निर्माण होणे स्वाभाविकच. आता नगरपालिकेच्या प्रथम की विधानसभेच्या प्रथम निवडणुका, हा प्रश्न सरकारपुढे आहे. ज्याप्रकारे निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे, ती पाहता निवडणुका जवळ आल्याचे स्पष्ट आहे. पण, आधी कुठल्या निवडणुका होणार, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनीही आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र, सरकार नगरपालिकेच्या निवडणुका आधी घेणार की विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय? गोव्यात ऑलिम्पिक?
मनात असेल व इच्छाशक्ती असेल, तर अशक्य काहीही असत नाही. गोवा ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार सदानंद तानावडे यांची निवड झाल्याने आतापर्यंत संथ असलेल्या गोवा ऑलिम्पिक संघटनेला कधी नव्हे तेवढे महत्त्व आले आहे. गोव्यात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याबाबत शक्यता पडताळून पाहायला लागले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याबद्दल आशावादी असून, गोव्यात ऑलिम्पिकचे आयोजन करणे अशक्य नसल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे. गोव्यात बऱ्याच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत; मात्र गोवा ऑलिम्पिक स्पर्धेतील एखाद्या खेळाचे आयोजन करण्यास समर्थ आहे काय? हाच खरा प्रश्न आहे.
मोर्चाला ‘शिंदे’ पाठबळ!
गोवा विधानसभेवर सोमवारी मराठीला कोकणीसोबत अधिकृत भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्रातून आलेल्या या ‘पाठबळा’ची गोव्यात सध्या चांगलीच चर्चा आहे. गोव्याच्या भाषेच्या प्रश्नात शेजारच्या राज्यातील राजकीय पक्षाने उडी घेतल्याने मोर्चाची रंगत तर वाढणारच! मात्र, गोव्यातील भाषेचा निर्णय गोवेकर घेणार की शेजारच्या ‘शिंदे’च्या पाठबळावर? हा प्रश्नही चर्चेत आहे. त्यात सोमवारच्या मोर्चात शिंदे सेनेचे किती कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात दिसतात, याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना हे ‘भाषाप्रेम’ किती टिकते, की हा केवळ राजकीय स्टंट ठरतो, हे काळच सांगेल!
म्हणे, पक्ष करणार रस्ता दुरुस्त...
मये मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था पाहता वाहनचालकांच्या सहनशीलतेचीच परीक्षा सुरू आहे. चतुर्थी तोंडावर आली, तरी रस्ते मात्र ‘जैसे थे’! त्यामुळे गोवा फॉरवर्डचे नेते संतोषकुमार सावंत यांनी सरकारला चार दिवसांची मुदत देत, रस्ते दुरुस्त न झाल्यास पक्षाच्या वतीनेच दुरुस्ती करणार, असा इशारा दिला. सरकारने रस्ते दुरुस्त करायचे की पक्षाने, यावर आता मात्र मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. पंचवीस वर्षे हॉटमिक्सची वाट पाहणाऱ्या रस्त्यांना आता चार दिवसांत नवे रूप मिळणार की राजकीय श्रेयासाठीच रस्त्यावर ‘हॉटमिक्स’ होणार? हे पाहावे लागेल. चतुर्थीपूर्वी रस्ते खरोखर गुळगुळीत झाले, तर वाहनचालकांच्या तोंडून आपसूकच ‘गणपती बाप्पा मोरया’ निघेल, हे मात्र नक्की!
पंचबाब, तुम्हीसुद्धा?
नुवे येथील खूनप्रकरणी अटकेत असलेले डॉम्निक फर्नाडिस हे सुरावली पंचायतीचे पंच सदस्य. पोलिसांनी बेड्या ठोकताच त्यांच्या तोंडून नकळत ‘पंचबाब, तुम्हीसुद्धा?’ असेच उद्गार बाहेर पडल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, महाशयांनी जिल्हा पंचायत निवडणुकीतही नशीब आजमावले होते; मात्र मतदारांनी त्यांना नकार दिला. आता तेच कदाचित कायदाप्रिय नागरिकांना ‘बरं झालं’ असे वाटण्याचे कारण ठरत आहे. सत्ता असो वा पद, त्याची नशा डोक्यात गेली की माणूस कायद्यापेक्षा स्वतःला मोठे समजू लागतो. चोर असल्याच्या संशयावरून एखाद्याला मारहाण करणे हा कायदा हातात घेण्याचाच प्रकार. मर्दुमकीच्या नावाखाली केलेल्या अशा कथित धाडसाचा शेवट अखेर पोलिसांच्या बेड्यांत झाला. ‘करावे तसे भरावे’ ते यालाच म्हणतात.
कोणासाठी, तिकिटासाठी!
न्यायालयाच्या निर्देशानंतर पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होताच म्हापसा शहरात इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. कार्यकाळ संपल्यापासून सार्वजनिक कार्यक्रमांतून पार गायब झालेले अनेक माजी नगरसेवक आता निवडणुकांचे बिगुल वाजताच पुन्हा सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, आपल्या आधीच्या कारकिर्दीत वादग्रस्त आरोप आणि चौफेर टीकेचे धनी ठरलेल्या काहींना तर पुन्हा नगरसेवक बनण्याची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. सध्या हे इच्छुक विद्यमान लोकप्रतिनिधींसोबत सावलीसारखे फिरताना आणि अचानक रस्त्यांच्या पाहणीचे दौरे करताना दृष्टीस पडत आहेत. पाच वर्षांचा वादग्रस्त इतिहास मागे सारून सुरू असलेला समाजसेवेचा हा सगळा खटाटोप जनहितासाठी नसून, केवळ पक्षाचे पुरस्कृत तिकीट पदरात पाडून घेण्यासाठीच चालला आहे, अशी चर्चा आता म्हापशाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.