शिवसेनेच्या छत्र्यांना मागणी
वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेने राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवले. त्याअंतर्गत भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक छत्री भेट देण्यात येत होती. शिवसेनेचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांनी यासाठी ४० हजार छत्र्या आणल्या होत्या. गावकर यांच्याकडे छत्र्या मिळतात हे समजताच, त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी, ज्यात इतर पक्षांतील काही उत्साही कार्यकर्त्यांचाही समावेश आहे, छत्र्यांची मागणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या गावकर यांना छत्री कोणाकोणाला द्यावी, हा प्रश्न पडला आहे. सध्या ते ‘तुझ्यासाठी २० छत्र्या ठेवल्या आहेत,’ असे सांगून स्वतःची सुटका करून घेत आहेत. आता आणखी छत्र्या आणण्यासाठी त्यांना मुंबईवारी करावी लागणार आहे.
भाजपचा पाटकरांना चिमटा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतरही आपणच पक्षाचे खरे तारणहार आहोत हे दाखवण्याच्या नादात अमित पाटकर यांनी स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाचा बिगुल तर वाजवला, पण त्या रणशिंगाला अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही, असा टोला भाजपने लगावला आहे. ‘एकला चलो रे’ची हाक देत निघालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारीच दिसले नाहीत, त्यामुळे हे जनआंदोलन कमी आणि स्वतःची राजकीय उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न अधिक वाटला, अशी चर्चा रंगली आहे. पक्षातून बाजूला झाल्यानंतर उत्तराधिकाऱ्यापेक्षा आपणच सरस असल्याचे सिद्ध करण्याची धडपड, पण त्यासाठी स्वतःच्या पक्षातही पुरेसा पाठिंबा नसणे, यामुळे पाटकर यांची अवस्था ‘एकला चलो रे... कारण दुसरे कोणीच आले नाही!’ अशी झाल्याची बोचरी टीका भाजपने समाजमाध्यमावर केली आहे.
केव्हाही उगवणारी मासिके
करदात्यांच्या पैशातून सरकारी संस्थांची मासिके प्रकाशित होतात. परंतु त्यांची बेशिस्त बघा. ठरवून दिलेल्या कालबद्ध मुदतीत ती कधीच येत नाहीत. गोवा विद्यापीठाची ‘सासाय’ पत्रिका, गोवा कोकणी अकादमीचे ‘अनन्य’ आणि मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे ‘गोवापुरी’ मासिक. किती प्रती छापल्या, कुणाला पाठवल्या, याचा कसला हिशोब किंवा नोंद नाही. प्रती गुड्ड्याला (कोपऱ्यात) मारलेल्या असाव्यात. त्यांची ऑनलाइन विक्री का होत नाही? लोकांनी वाचावीत म्हणूनच तर ती अवाढव्य खर्च करून प्रकाशित करतात ना? तुम्ही त्या कार्यालयात पोचलात, तर ‘चावी याच्याकडे आहे’, ‘तो नाही’, ‘प्रती त्या विभागात आहेत’, ‘सरांनी अजून संमती दिली नाही’ अशी थातूरमातूर उत्तरे दिली जातात. कुणीतरी वाचेल व मूल्यमापन करेल, ही धास्ती असावी, असे लोकांना वाटते. तायखिळो भाजी पावसातच उगवते. ही मासिके मात्र कधीही उगवतात.
सरकारी डॉक्टर अन् खासगीतही सेवा?
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सरकारी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका अस्थिरोगतज्ज्ञाने नुकताच वास्को येथे नवा दवाखाना उघडला. त्याबाबतची जाहिरातही त्यांनी सोशल मीडियाद्वारे सुरू केलेली आहे. त्यामुळे सरकारी इस्पितळात सेवा देणाऱ्या डॉक्टरना खासगीतही सेवा देण्यास राज्य सरकारने अधिकृतपणे परवानगी दिली आहे का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
देर है, अंधेर नहीं
सरकारी कामे वेळेवर झाली तर शॉक बसण्यासारखेच. राज्य कला-संस्कृती पुरस्कार एकदाचे विलंबाने जाहीर झाले. ३३ टक्के महिलांचा समावेश आहे, ही समाधानाची बाब. मध्यंतरीच्या काळात एकाही महिला कलाकाराचा समावेश पुरस्कारार्थींमध्ये नसल्याने ‘नारी शक्ती’ने पत्रकार परिषद घेऊन आवाज उठवला होता. तो सार्थ होता. त्याचा परिणामही चांगला झाला. आवाज उठविल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. सहा जणांना युवा सृजन पुरस्कार देण्यात आला; त्यात एकही युवती नाही. प्रतिभावंत युवतींचे लेखन, अभिनय, तियात्र व अन्य क्षेत्रांत भरीव योगदान आहे. परंतु त्यांनी अर्ज केला नाही, अशी सबब असू शकते. पण राज्य पुरस्कारांसाठी अनेक लोक पात्र असतात, जे अर्ज करत नाहीत. तेच म्हणा युवतींचे. अशा गुणी कलाकारांची दखल ‘सु मोटो’ घेण्याची गरज असते, असे तज्ज्ञ बोलतात.
सावईकरांची ‘स्मार्ट’ चारोळी
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसमध्येच आता ‘दोन मीटर’ चर्चेचा विषय ठरले आहेत. अमित पाटकर यांच्या मोर्चापासून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्षाला दूर ठेवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी, ‘कॉंग्रेशीचे खंय दोन मीटर, पाटकार आनी चोडणकार, खंयचो मीटर स्मार्ट, हें जाचो "विजय" जाता तेन्नाच कळटलें!’ अशी चारोळी सादर करत उपरोधिक चिमटा काढला आहे. सरकारच्या स्मार्ट मीटरपेक्षा काँग्रेसमधील नेतृत्वाचे मीटरच सध्या अधिक चर्चेत असल्याचा टोला या चारोळीतून लगावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतभेद नसल्याचे दावे होत असताना प्रत्यक्षात वेगवेगळे संदेश जात असल्याने विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.
‘सांजाव’त रंगले बाबू
दोन दिवसांपूर्वी अगदी गंभीरपणे योगासने करताना दिसलेले माजी उपमुख्यमंत्री व कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर हे काल बेतूल येथे स्थानिक ख्रिश्चन बांधवांसोबत ‘सांजाव’ उत्साहात साजरा करताना दिसले. सर्व धर्मांचे उत्सव सर्वजण एकत्र येऊन साजरे करण्याची गोव्यात परंपरा असून, सर्व धर्मांचे उत्सव धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहेत, असे कवळेकर यांनी यावेळी म्हटले. वास्तविक, बाबू कुठल्याही धर्माच्या लोकांना दूर ठेवणारे नाहीत. मात्र, तरीही भाजपावर निवडणूक लढवली म्हणून मागच्या वेळी केपेतील ख्रिश्चन मतदारांनी त्यांना मतदान न करता पाडले. त्यामुळे आता आपण सर्व धर्मांच्या लोकांबरोबर किती मिसळून वागतो, हे दाखवण्यासाठी बाबूंचा हा उत्साह तर नव्हता ना?
मडगाव पालिकेचा धनी कोण?
‘सुंभ जळाला तरी पीळ जात नाही’ अशी एक म्हण आहे. काही राजकारण्यांच्या डोक्यात सत्तेचा एवढा माज असतो की, खुर्ची गेली तरी त्यांची गुर्मी जात नाही. मडगाव नगरपालिका मंडळाची मुदत संपून पालिकेवर सरकारने प्रशासक नेमला. मात्र, या पालिकेच्या माजी नगराध्यक्षांच्या पचनी हे पडले नसावे. त्यांना आजही आपणच पालिकेचे धनी असल्याचे वाटत असावे. या माजी अध्यक्षांचे अनेक कारनामे गाजलेले आहेत. पालिका अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना व विरोधी नगरसेवकांशी ते सावकार असल्यासारखे वागत होते, म्हणे. आता खुर्ची व पद नसतानाही ते स्वतःला पालिकेचे धनी समजत आहेत. परवा पालिकेच्या एका अधिकाऱ्याने न्यायालयीन कामासाठी जाताना, म्हणे हे माजी नगराध्यक्ष वापरत होते ती गाडी नेल्याने हे माजी नगराध्यक्ष चवताळले. पालिका अभियंत्याच्या केबिनमध्ये घुसून या महाशयांनी, म्हणे नगराध्यक्ष वापरत असलेल्या गाडीचा वापर करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला झापून काढले. पालिका अभियंते आपल्या अधिकाऱ्याचा अपमान आपल्या समोर पाहत राहिले. एका माजी नगराध्यक्षाला पालिकेच्या कामकाजात ढवळाढवळ करण्याचा अधिकार आहे का? मधुबाब, काय चालले आहे पालिकेत? कोणीही ‘आया राम, गया राम’ यावे आणि गोंधळ घालून जावे...
वेरेकरांचा पुढाकार; पण...
फोंडा तालुक्यातील लोकांचे नाजूक दुखणे म्हणजे येथील उपजिल्हा रुग्णालय. परिपूर्ण सुविधा नसल्यामुळे गंभीर रुग्णांना या इस्पितळातून ‘जीएमसी’ वा मडगावला पाठवले जाते व त्यातून अनेक खासकरून हृदयविकाराचे रुग्ण दगावतात. पूर्वी दिवंगत डॉ. केतन भाटीकर या बाबतीत सातत्याने आवाज उठवायचे. पण, त्यांच्या निधनानंतर परत एकदा सगळा मामला ठंडा पडला होता. परंतु काँग्रेस नेते राजेश वेरेकर यांनी ही आघाडी सांभाळलेली दिसते. परवा त्यांनी या इस्पितळावर धडक देत वैद्यकीय अधिकाऱ्याला जाब विचारला आणि दोन महिन्यांत सुविधा न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला. वेरेकरांनी पुढाकार घेतला खरा, पण मुदत जरा कमी दिली असती तर रिझल्ट लगेच कळला असता, नाही का?!
मडगावातील ‘ब्रँड ॲम्बेसेडर’
मडगावमधील सर्व गाडेवाले, टॅक्सीवाले, रिक्षावाले, मोटारसायकल पायलट हे आमदार दिगंबर कामत यांचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ आहेत. या ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ना आपण उपाशी ठेवणार नाही. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे स्वतः दिगंबर कामत यांनी सांगितले. यापूर्वीही त्यांनी असे म्हटले होते की, आपण गाडेवाल्यांच्या पोटावर कधीही पाय देणार नाही. बरोबर आहे. कामत यांनी या सर्व लोकांना जपले आहे. त्यांच्या समस्या जाणून त्यांना मदत केली आहे. म्हणूनच ते गेली ३० वर्षे मठग्रामवर राज्य करीत आहेत. बुधवारीही या गाडेवाल्यांनी कामत यांची भेट घेतली. कामत यांनी या गाडेवाल्यांना विश्वासात घेतल्याशिवाय जुन्या बसस्थानकाचे नूतनीकरण करणार नसल्याचे स्पष्ट केले. तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे ठासून सांगितले. म्हणजेच, आगामी निवडणुकीतही त्यांच्याच जोरावर ते यश मिळवणार, हेच तर त्यांना अशा विधानांतून सांगायचे नाही ना, अशी प्रतिक्रिया आता मडगावकर व्यक्त करू लागले आहेत.
एक हात, अनेक आंदोलक!
विद्युत भवनासमोर आंदोलन झाले, घोषणाबाजी झाली, गर्दी झाली आणि या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिले ते आंदोलन नव्हे, तर पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक! कारण आंदोलकांना अडवण्यासाठी ते अगदी आघाडीवर उभे राहिले होते. आता गर्दी किती होती यापेक्षा चर्चा याची जास्त रंगली की, साहेबांनी म्हणे एका हातानेच आंदोलकांचा रेटा थोपवला! ही गोष्ट खरी किती आणि रंगवून सांगितलेली किती, हे देव जाणे; पण पोलिस वर्तुळात मात्र या कथेला चांगलाच रंग चढला. काहींनी तर विनोदाने, ‘एका हातात काय ताकद असते,’ याचे प्रात्यक्षिकच साहेबांनी दाखवून दिल्याचे सांगितले. गर्दीत साहेबांची झालेली धावपळ, आंदोलकांना समजावणे, पोलिसांना सूचना देणे आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवणे हे पाहून अनेकांनी त्यांच्या संयमाचे कौतुक केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.