Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: 'आप'चे गोव्यातील भवितव्य

Khari Kujbuj Political Satire: वाढदिवस होता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा. त्यानिमित्त साखळी येथे आयोजित सोहळ्यास माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पोचले आणि त्यांच्याच नावाची चर्चा नंतर रंगली.

गोमंतक ऑनलाईन टीम

‘आप’चे गोव्यातील भवितव्य

राधाराव ग्रासियस हे गोव्याच्या राजकारणातील एक चाणक्य मानले जातात. जरी ‘यूजीडीपी’ स्थापन करायला व त्याचे तीनतेरा वाजवायला राधारावच जबाबदार असले तरी राजकारणावर अचूक भाष्य करण्यात त्यांचा हात धरणारा दुसरा कोणी नाही. राघव चड्डा यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर गोव्यातील या पक्षाच्या भवितव्याचीही चर्चा सुरू झाली असून गोव्यातील त्यांचे दोन्ही सदस्य विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्‍याचे राधाराव म्हणतात. ‘आप’चे वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांना काँग्रेसशिवाय भवितव्य नसले तरी व्हेन्झी व्हिएगस यांनाही काँग्रेस प्रवेशाचे वेध लागले असतील, तर गंमतच आहे... एवढ्या डरकाळ्या फोडून शेवटी काँग्रेसच्या बिळात जायचे म्हणजे त्यांच्या निष्ठेची कमालच म्हणायची!

लक्ष्मीकांत पार्सेकर यांचीच चर्चा!

वाढदिवस होता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा. त्यानिमित्त साखळी येथे आयोजित सोहळ्यास माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पोचले आणि त्यांच्याच नावाची चर्चा नंतर रंगली. माजी आमदार दयानंद सोपटे व ते एकाचवेळी कसे पोचले येथपासून पार्सेकर यांना कोण कोण कसे भेटले. त्यांना भेटून पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना विशेष आनंद का झाला, याचा जो तो आपापल्या परीने अर्थ लावत होता. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर मांद्रेतील राजकारण आपल्या एकाच वाक्याने ढवळून टाकण्याची ताकद दाखवलेल्या पार्सेकर यांनी राज्यस्तरीय सोहळ्यात आपली उपस्थितीही कशी चर्चेची ठरू शकते, हे प्रत्यक्षात दाखवून दिले आहे. यापूर्वी माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून पार्सेकर यांनी लक्ष आपल्याकडे खेचून घेतले होते. गोवा फॉरवर्डने आगरवाडा येथे सुरु केलेल्या कार्यालयाच्यानिमित्ताने दीपक कळंगुटकर यांना शुभेच्छा देण्यासाठीही पार्सेकर गेले होते.

खट्टरचे समर्थन, पण मुंबईत!

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गौतम खट्टर याला पकडण्यात आले आहे. पोलिस त्याला आज रविवारी गोव्यातही आणतील. त्याला पकडण्याचे काही जणांना वाईट वाटले आहे. गौतम व त्याचा भाऊ माधव या दोघांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. गोव्यात नव्हे, पार दादर मुंबई येथे आज ही सभा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. हिंदूनो जागे व्हा, अवश्य, या असे या सभेच्या फलकावर म्हटले आहे. घटना गोव्यात पण सभा मुंबईत का अशी विचारणा यानिमित्ताने होऊ लागली आहे.

इच्छुकांचा हिरमोड..

नगरपालिका निवडणुका वेळेवर होतील, असे चित्र सध्या तरी दिसत नाहीय. उलट, या निवडणुका किमान सहा ते सात महिने पुढे जाण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकांच्या आशेने ज्यांनी आधीच ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधले होते आणि प्रभागातील गल्लीबोळांत जनसंपर्क वाढवला होता, त्या इच्छुकांची आता मोठी पंचाईत झाली आहे. विविध प्रलंबित मुद्दे हाती घेऊन प्रशासनावर तुटून पडणाऱ्या या भावी उमेदवारांचा उत्साह आता निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे पुरता मावळला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरात अनेक नव्या संघटना आणि आघाड्यांचा सुळसुळाट झाला होता. सुरुवातीला अत्यंत सक्रिय वाटणाऱ्या या संघटना आता निवडणुकांचे भवितव्य अधांतरी बघून शांत झाल्या आहेत. त्यांचा हा थंड पडलेला उत्साह पाहून सामान्य जनतेत आता चर्चा सुरू झाली आहे. या संघटना खरोखरच शहराच्या प्रश्नांसाठी जन्माला आल्या होत्या की त्यांचा हेतू केवळ निवडणुकीची पोळी भाजून घेणे इतकाच मर्यादित होता? निवडणुका लांबणीवर पडल्याने या संघटनांच्या प्रामाणिकतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ∙∙

पेलेकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

दक्षिण गोव्‍यातील सेलेब्रिटी मच्‍छीमार पेले फर्नांडिस यांच्‍या बाबतीत नेहमीच असे सांगितले जाते, ते म्‍हणजे, ज्‍या ज्‍या ठिकाणी राजकारणी आहेत, त्‍या त्‍या ठिकाणी हा पेले दिसतोच. शुक्रवारी पेले चक्‍क मुख्‍यमंत्र्यांचे अभिनंदन करण्‍यासाठी साखळीत पोहोचला. यासंबंधीचा एक व्‍हिडिओ त्‍याने आपल्‍या इन्‍स्‍टाग्रामवर पोस्‍ट केलेला आहे. गुरुवारी मुख्‍यमंत्री सोनसडो प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्‍यासाठी मडगावात आले असता, पेले यांनी त्‍यांची भेट घेऊन तुमच्‍या वाढदिवसापूर्वी गौैतम खट्टर याला अटक करा, अशी मागणी केली होती. शुक्रवारी गौतमला कुलू येथे अटकही झाली होती. मुख्‍यमंत्री आपल्‍या शब्दाला जागले म्‍हणून मी साखळीला जाऊन त्‍यांचे अभिनंदन केले, असे पेले यांनी आपल्‍या व्‍हिडिओत म्‍हटले आहे.

रसिक प्रेक्षक कुठे?

दहा वर्षांपूर्वी फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिर एखादे नाटक किंवा संगीत संमेलन आणि तत्सम कार्यक्रम असल्यावर प्रेक्षकांनी ओसंडून वहायचे. आज ती स्थिती नाही. लोक संगीत संमेलन किंवा नाटक अथवा तत्सम कार्यक्रमाला उपस्थिती कमी लावतात. पूर्वीपेक्षा आता लोकसंख्या वाढली आहे, पण लोकांची रुची मात्र कमी झाली आहे की काय? अशी स्थिती आहे. संगीत संमेलनाला तर अल्प उपस्थिती पाहून संगीत कलाकारांची होणारी गोची त्यांनाच माहिती असते. आता त्यात सुधारणा करायची म्हटल्यावर करायचे काय? रसिक प्रेक्षक गेले कुठे? हा यक्ष प्रश्‍न जसा आयोजकांना पडला आहे, तसाच तो सरकारलाही कदाचित पडला असेल, नाही का...!

बाबूंची वॉर्निंग...

माजी मंत्री बाबू आजगावकर हे शुक्रवारी मार्केटमधील व्यापाऱ्यांचे प्रश्न घेऊन मडगाव पालिकेत आले होते. मात्र मुख्याधिकारी मधू नार्वेकर हे आपल्या केबीनमध्ये नसल्याने बाबूचा पारा चढला. न्यू मार्केट व गांधी मार्केटमधील एकूण पाच व्यापाऱ्यांना वीज जोडणीसाठी पालिकेकडून ‘ना हरकत’ दाखला पाहिजे आहे. मात्र पालिका ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. बाबू सध्या संतापलेले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास पालिकेवर सोमवारी मोर्चा आणू असा इशारा त्यांनी दिला आहे. बाबूसाठी पालिकेवर मोर्चा आणणे, ही काही नवी बाब नाही. आता त्यांचा हा इशारा नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हे किती गांभीर्याने घेतात, हे बघावे लागेल. मडगाव पालिकेवर मडगावच्या बाबाची सत्ता आहे. दामूला त्यांचा राईटहँड म्हणून ओळखले जाते. बघूया सोमवारी काय घडते ते?

बाबूंची वॉर्निंग...

माजी मंत्री बाबू आजगावकर हे शुक्रवारी मार्केटमधील व्यापाऱ्यांचे प्रश्न घेऊन मडगाव पालिकेत आले होते. मात्र मुख्याधिकारी मधू नार्वेकर हे आपल्या केबीनमध्ये नसल्याने बाबूचा पारा चढला. न्यू मार्केट व गांधी मार्केटमधील एकूण पाच व्यापाऱ्यांना वीज जोडणीसाठी पालिकेकडून ‘ना हरकत’ दाखला पाहिजे आहे. मात्र पालिका ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. बाबू सध्या संतापलेले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास पालिकेवर सोमवारी मोर्चा आणू असा इशारा त्यांनी दिला आहे. बाबूसाठी पालिकेवर मोर्चा आणणे, ही काही नवी बाब नाही. आता त्यांचा हा इशारा नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हे किती गांभीर्याने घेतात, हे बघावे लागेल. मडगाव पालिकेवर मडगावच्या बाबाची सत्ता आहे. दामूला त्यांचा राईटहँड म्हणून ओळखले जाते. बघूया सोमवारी काय घडते ते?

बंगालमध्येही धोंड इफेक्ट?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९३ टक्क्यांच्या आसपास मतदान झालेले असून मतांची ही वाढीव टक्केवारी भाजपच्या फायद्याची ठरेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. पश्चिम बंगालमध्ये पूर्वी भाजपची राजकीय प्रकृती तशी तोळामासच होती. त्यामुळे या राज्यात भाजप कार्यकर्त्यांची फळी बांधून काढण्यासाठी गोव्यातून सतीश धोंड यांना त्या राज्यात पाठविले असून गेली काही वर्षे त्यांनी बंगालमध्ये आपले काम कुठलाही गाजावाजा न करता चालू ठेवले होते. आता विधानसभा निवडणुकीत जर दीदींच्या राज्यात भाजपला फायदा होत असेल तर त्याचे श्रेय भाजप कार्यकर्त्यांनाच द्यावे लागेल. सतीशरावांनी यापूर्वी जी गोव्यात कमाल करून दाखवली, तीच आता पश्चिम बंगालमध्ये करून दाखवली, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार का?

खात्याचे नाव बदलाला विलंब का?

‘नदी परिवहन खात्याचे’ रिव्हर नेव्हिगेशन नाव बदलून ‘अंतर्देशीय जलमार्ग विभाग’ असे करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन आता आठ महिने उलटले. मात्र, ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मंत्री सुभाष फळदेसाई हे खात्याचे नाव बदलण्यासाठी आग्रही आहेत, पण नक्की माशी कुठे शिंकते आहे, हेही कदाचित त्यांना समजून येत नसावे. एका बाजूला आयूष खात्याची निर्मिती सरकार करते, पण खात्याचे नाव बदलण्यासाठी एवढा काळ कशासाठी लागतो, यामागील नेमके गमक काय आहे? याचा शोध आता म्हणे खात्यातील अधिकारी घेऊ लागले आहेत. विशेष बाब अडथळा आणणाऱ्या काही बाबी प्रथमदर्शनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनासही आल्या आहेत. केंद्र सरकारचा वॉटर मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी खात्याचे नाव बदल प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्य सरकार ही नाव बदलाची प्रक्रिया कितपत पुढे नेते, हे पहावे लागणार आहे. ∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa mining: आनंदम, व्यंकटेश्वरना प्रत्येकी दोन खाण पट्टे, चार खाणपट्ट्यांचा लिलाव पूर्ण; दोन पट्ट्यांचा निर्णय सुनावण्‍यांनंतर

Pahalgam tourism: पहलगाम पर्यटकांनी बहरले, वर्षभरात 10 लाख पर्यटकांनी दिली काश्‍मीरला भेट

Goa Weather Update: गोव्यात उन्हाचा 'हिट'मॅन! सलग 3 दिवस पारा 35 अंशांवर, नागरिक उकाड्याने हैराण

अपघाती मृत्यूंची संख्या वाढली, तरी गुन्हे नोंद कमीच; पोलिसांची आगळी तऱ्हा, मृत्यूत 7 टक्क्यांची वाढ; कारवाईत 35 टक्क्यांनी कपात

Drowning Death: सुटीत मावशीकडे आलेल्या ऋग्वेदवर काळाचा घाला, 6 वर्षांच्या मावसभावासह दोघांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT