‘जिसकी लाठी उसकी भैस’ अशी हिंदीत एक म्हण आहे. विधानसभेच्या निवडणुकीला अजून दोन वर्षांचा काळ असला तरी काही मतदारसंघात आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. मायकल लोबो उत्तरेत आपले बस्तान मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपले राजकीय काम सुरू केले आहे, तसेच इतर नेते व पक्षही कामाला लागले आहेत. यात सगळ्यात जास्त गाजतोय तो मांद्रे मतदारसंघ. मांद्रे मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणणार अशी घोषणा केल्यावर हा मतदारसंघ चर्चेत यायला लागला आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार जीत आरोलकर यांना भाजपात जाण्याचे वेध लागले असल्याची चर्चा आहे. जीत आरोलकर जरी स्पष्ट बोलत नसले, तरी ‘इशारो इशारो में’ ते भाजपाबद्दलचा प्रेम व्यक्त करतात. आता ते भाजपात गेले, तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी आमदार दयानंद सोपटे यांचे काय होणार? जीत यांची भाजप एन्ट्री पार्सेकर व सोपटे यांची राजकीय एक्झिट ठरणार का? यावर चर्चा रंगत आहे
सध्या फोंड्यात राजकारण तप्त होऊ लागले आहे. प्रभुनगर येथील पाणीबाणी प्रश्नावरून वातावरण तापायला लागले आहे, पण पाण्याचा प्रश्न राहिला बाजूला इथे एकमेकांना टार्गेट करण्यातच धन्यता मानली जाऊ लागली आहे. परवा काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत फोंड्यातील दोन ‘प्रॉक्सी’ आमदारांचा उल्लेख केला गेला. आता याला उत्तर म्हणून म. गो. नेते डॉ. केतन भाटीकर यांनी कोणाचेही नाव न घेता ‘कुंभकर्ण’ आता दोन वर्षानंतर जागा झाला असून परत तो झोपी जाणार असल्याचे सांगून चेंडू काँग्रेसच्या रिंगणातच फेकला. तसे पाहायला गेल्यास ‘कुंभकर्ण’ हे रामायणातील सर्वात विनोदी पात्र. त्यामुळेच भाटीकरांनी उल्लेख केलेला ‘कुंभकर्ण’ व्हायरल होताच फोंड्यात तो प्रत्येकाच्या ओठावर खेळताना दिसू लागला आहे. आता भाटीकरांनी उल्लेख केलेला जो कोण ‘कुंभकर्ण’ असेल तो खरेच परत झोपी जातो की रामायणातील आणखी एक पात्र विभीषणासारखा कार्यरत होतो हे बघावे लागेल. पण आज तरी भाटीकरांचा हा ‘कुंभकर्ण’ फोंड्यात सुपरहिट ठरला आहे एवढे मात्र निश्चित.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर मासिक २५ लाख १५ हजार रुपयांच्या भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय सरकारने घेतला. तो कोणाला रुचला नाही याची खुमासदार चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनीच हा निर्णय घेतल्याने त्या विरोधात ब्र काढण्याची ताकद नसल्यानेच विरोधासाठी आपल्याच हस्तकांना पुढे करण्याची चाल खेळली जात असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. एका मंत्र्याला जवळ असलेल्याची यात महत्त्वाची भूमिका असल्याकडे अंगुलिनिर्देश केला जात आहे.
गिरीश चोडणकर स्पष्ट बोलणारे... काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यांचा सहभाग किंवा राहुल गांधींशी त्यांचे मैत्रित्वाचे असलेले नाते हे सर्वांना परिचित. भाजप सरकारवर असो की कोणत्याही नेत्यावर ते सडेतोड बोलतात. प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना पायउतार का व्हावे लागले, हे काही लपलेले नाही. त्याशिवाय अधूनमधून ते बरेच सल्ले देतात, त्यांच्यात ज्येष्ठपणा आल्याचे जाणवते. गोव्याला गिरीश हे युवा नेते असल्यापासून माहीत आहे. जसजशी पक्षाची जबाबदारी येते, तसतसे मार्गदर्शकाच्या भूमिकेत त्या-त्या व्यक्तीला जावे लागते. तसाच प्रकार सध्या गिरीश यांच्याबाबतीत झाला आहे. पक्षाने त्यांना इतर राज्यांचे प्रभारी बनविले आहे. यापूर्वी लोकसभेला ते पूर्वोत्तर चार छोट्या राज्यांचे प्रभारी होते. आता ते दक्षिणेतील मोठ्या राज्याचे प्रभारी आहेत. त्यांनी महिला काँग्रेसच्या पदग्रहण सोहळ्याला मार्गदर्शन केले. त्यांनी प्रतीक्षा खलप यांना सबुरीचे सल्ले दिले आहेत. बरेवाईट आरोप झाले तरी प्रत्युत्तर न देता सर्वांना बरोबर घेऊन जायचे, हे त्यांचे अनुभवाचे बोल. इतरही त्यांनी सल्ले दिलेले आहेत, त्यामुळे खलप यांना नक्कीच त्या सल्ल्यांचा फायदा होईल, अशी अपेक्षा.
ल्युसोफोनिया गेम्स गोव्यात झाल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राज्यात सुविधा निर्माण झाल्याचा धांडोरा पिटण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्षात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची वेळ आली तेव्हा काही गेम्ससाठी तंबू उभारण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपये सरकारच्या तिजोरीतून खर्च करावे लागले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमची उभारणी झाली खरी, पण त्याचा वापर क्रीडा स्पर्धेसाठी कमी आणि इतर इव्हेंटसाठीच अधिक होत राहिला. विविध प्रदर्शनासाठी भाड्याने स्टेडियम दिले जात असल्याने त्याच्या भाड्यातून देखरेखीवर खर्च तरी होत आहे. आता हे स्टेडियम खासगी वापरासाठी सरकार देणार आहे. त्यातून सुमारे तीन कोटींच्यावर भाडे सरकारच्या तिजोरीत येणार आहेत. मात्र, याला आता विरोध होऊ लागला आहे. हे स्टेडियम शहरापासून दूर असल्याने त्याचा वापर केवळ क्रीडा स्पर्धेसाठीच होतो, तेथे विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी सुविधा नाहीत, हा भाग वेगळा. पेडे क्रीडा संकुलाचीही स्थिती बिकट झाली आहे. खरे तर क्रीडा संकुले निश्चित उभारली जावीत, परंतु त्याचा वापर झाला तरच ती व्यवस्थित राहू शकतात अन्यथा ते पांढरे हत्ती बनण्यास वेळ लागणार नाही.
श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी शुक्रवारी पणजीत ‘भारत माता की जय संघटने’चे सुभाष वेलिंगकर यांची भेट घेतली. गेली पाच वर्षे सरकारने मुतालिक यांच्या राज्य प्रवेशावर बंदी घातली होती. मुतालिक जहाल नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी वेलिंगकर यांच्या निवासस्थानी हिंदू जागरण, हिंदू रक्षा, लव जिहाद व हलाल या विषयावर चर्चा केली. यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे राज्याध्यक्ष नितीन फळदेसाई व श्री परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर उपस्थित होते. मुतालिकांचा हा दौरा अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.
म्हापसा पालिकेचा भोंगळ कारभार सर्वश्रुत आहे. अशातच, पालिकेत कामासाठी येणाऱ्या लोकांच्या फाईल्स गायब होण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. शुक्रवारी स्थानिक आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा हे पालिकेत लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास बसतात. यावेळी दोघा - तिघांनी हा विषय मांडला. त्यामुळे उपसभापतींनी थेट पोलिस निरीक्षकांना पालिकेत बोलावले अन् गायब फाईल्स कुणामुळे गहाळ झाल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हा नोंदवून संबंधितांवर कारवाई करा असे थेट सांगितले. त्यानंतर काही वेळातच ज्यांच्या ज्यांच्या फाईल्स गायब झाल्या होत्या, त्या सापडल्या, हे विशेष. आता प्रश्न पडतो की, इतके दिवस जे फाईल्स गायब होण्याचे प्रकार घडत होते, ते खरच मिस-प्लेस व्हायच्या की कथित मलईसाठी मुद्दामहून लोकांची कामे अडविण्याची या युक्त्या? काहीही असले तरी उपसभापतींनी आज घेतलेल्या दबंग भूमिकेमुळे म्हापसेकर खूष झाले. कारण प्रशासकीय कर्मचारी जेव्हा आपल्या कर्तव्यात कसूर ठेवतात, तेव्हा संबंधितांचे कान टोचणे गरजेचे ठरते. ∙∙∙
शिवजयंतीला एका राजकीय व्यक्तीने गोव्यात शिवशाही असल्याचे वक्तव्य केले. त्या विधानाला आक्षेप घेऊन काही जणांनी समाज माध्यमांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका रात्रीत शेकडो इतिहासकार गोव्यात प्रकट झाले. आता तर ‘कायलीकार वायंगणे’ इतिहासकार समाज माध्यमांवर व्हिडिओ टाकून लोकांचे मनोरंजन करत आहेत. गोव्यासमोर इतके प्रश्न असताना हे नसते उद्योग करण्याचे प्रयोजन कळत नाही. इतिहासाने इतिहासातच रहावे, वर्तमानात डोकावून भविष्याचे तोंड काळे करू नये, ही साधीसुधी गोष्ट यांना कळत नाही, हे दुर्दैव!
मुख्यमंत्र्यांनी मांद्रे भाजप मेळाव्यात पुढील निवडणुकीत भाजपचाच उमेदवार असेल असे जाहीर केल्यानंतर सुरू झालेला राजकीय वाद शमता शमेना असे झाले आहे. त्यातच मगोच्या नेत्यांत स्थानिक पातळीवर असलेले मतभेद ठळक झाले आहेत. मगोचे सुदीप कोरगावकर यांनी मांद्रे व पेडणे विधानसभा मतदारसंघात मगोचे उमेदवार असतील असे जाहीर केले. त्याच्या २४ तासांत आमदार जीत आरोलकर समर्थकांनी आमदार भाजपात गेल्यास आम्हीही भाजपात जाऊ असे नमूद केले. त्यामुळे मांद्रेत दोन मगो असल्याचे समोर आले आहे.
मडगावचे माजी आमदार व माजी उद्योगमंत्री अनंत नरसिंह नायक हे एकेकाळचे मुरब्बी राजकारणी. त्यांना सगळे बाबू या नावाने ओळखायचे आणि ते दिवंगत झाले असले तरी अजूनही त्यांची आठवण लोक काढतात. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे एका नवीन बाबूंचे झालेले आगमन. बाबू नायक यांचे नातू प्रभव नाईक यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले असून त्याचेही नाव अनंत असेच ठेवण्यात आले आहे. सध्या तो आपल्या आजोळी डिचोली येथे असून नुकत्याच डिचोली येथे झालेल्या शिमगोत्सवाच्या निमित्ताने तिथे उपस्थित असलेले पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार डॉ. शेट्ये, प्रेमेंद्र शेट यांनी आवर्जून त्यांच्या घरी भेट देऊन या छोट्या बाबूचे दर्शन घेतले. बाबू नायक यांची भेट घेण्यासाठी अनेक मंत्री आणि आमदार त्यांच्या आके - मडगाव येथील घरी यायचे. आता या नवीन बाबूच्या भेटीलाही मंत्री आणि आमदार येऊ लागले असे म्हणायचे का?
आगोंद येथील वाणिज्यिक आस्थापनांना उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सील ठोकण्यात आले आहे. कासवांच्या अंडी घालण्यासाठी आरक्षित जागेजवळ ही आस्थापने आहेत. या व्यावसायिकांनी स्थानिक आमदार रमेश तवडकर यांच्याकडे धाव घेतली. ते त्यांना घेऊन शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना भेटले. आता मुख्यमंत्री यातून कसा मार्ग काढतात याकडे त्या व्यावसायिकांचे डोळे लागले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.