Venzy Viegas demand full time home minister: गोव्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन आम आदमी पक्षाचे गोवा नेते आमदार वेन्झी व्हिएगस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याच्या राज्यपाल अशोक गजपती राजू यांना निवेदन सादर केले. राज्यात अलीकडच्या काळात घडलेल्या गुन्ह्यांची मालिका या निवेदनात मांडण्यात आली.
राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे कारण देत, प्रभावी देखरेख सुनिश्चित करण्यासाठी पक्षाने राज्यपालांना तातडीने पूर्णवेळ गृहमंत्री नियुक्त करण्याची विनंती केली.
यावेळीच मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत घेतलेली बैठक ही केवळ 'फोटोसेशनसाठी' होती, असा गंभीर आरोप आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केला. "कोणतीही घटना घडली की, एक चांगला फोटो काढणे हीच भाजपची नेहमीची रणनीती आहे, बाकी कोणतीही ठोस कृती नाही," असे व्हिएगस म्हणाले.
बाणावलीचे आमदार असलेले वेन्झी व्हिएगस यांनी या गंभीर प्रकरणाकडे राज्यपाल किमान आतातरी लक्ष देतील, अशी आशा व्यक्त केली. म्हणाले, "यापूर्वी कधीही गोव्यात दरोडेखोरी (Dacoity) झाली नाही. त्यामुळे अशा प्रकारे वारंवार घडणाऱ्या घटनांमध्ये सामील असलेल्या आरोपींना त्वरित ताब्यात घेतले पाहिजे."
व्हिएगस यांनी राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणाले, "येणारे प्रत्येक राज्यपाल 'मी इथे भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी आलो आहे,' असे विधान करतात, पण त्यावर कोणीही काम करत नाही. हे वाक्य कॉपी-पेस्ट केल्यासारखे ते बोलतात.
मी गेली ३.५ वर्षे आमदार आहे आणि मी कायम हेच ऐकत आलो आहे. राज्यपालांनी त्यांची जबाबदारी पार पाडली असती, तर आज अशा घटना घडल्या नसत्या. राज्यपालांनी गृहमंत्र्यांना सांगून हे प्रकार थांबवले पाहिजेत, मात्र कोणीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही," असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.