मोरजी: मांद्रेच्या विकासात योगदान देणार तसेच गोरगरीब जनतेला साहाय्य करू, असे कलंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. लोबो यांनी मंगळवारी मांद्रे येथील सुप्रसिद्ध श्री सप्तेश्वर भगवती पंचायतन देवस्थानला भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले. तसेच विविध भजनी पारांना भेटी दिल्या.
यावेळी मांद्रेचे माजी सरपंच तथा पंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक, महेश कोनाडकर, उपसरपंच तारा हडफडकर आदी उपस्थित होते. लोबो यांनी हॉटेलवर इतरांसोबत चहाचा आस्वाद घेतला. खाजाच्या दुकानांनाही भेटी देऊन विक्रेत्यांशी चर्चा केली. तसेच अनेक मुलांना खाऊसाठी पैसेही दिले. दरम्यान, सभापती रमेश तळवडकर व आमदार जीत आरोलकर यांनीही सप्ताहाला भेट दिली.
लोबो यांनी गणेश चतुर्थीच्या काळातही मांद्रे मतदारसंघात भेट दिली होती. आता पुन्हा मांद्रेच्या भजनी सप्ताहाला उपस्थित राहिल्याने लोबोंच्या माद्रे मतदारसंघातील प्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २०२७ ची विधानसभा निवडणूक त्यांचे पुत्र किंवा पत्नी लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याविषयी छेडले असता त्यांनी स्मित हास्य करून या मतदारसंघात माझे अनेक चाहते आहेत, अनेकांशी माझे सौहार्दपूर्ण सबंध आहेत.
प्रशांत ऊर्फ बाळा नाईक हे माझे जुने मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव मी आज मुद्दाम उपस्थित राहिलो आहे. २०२७ विधानसभा निवडणूक लढवण्याचा तसा अजून निर्णय झाला नाही, मात्र तसा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार जीत आरोलकर आणि आमदार मायकल लोबो यांची एका मैफलीच्या ठिकाणी भेट झाली. त्यांच्यात काही वेळ चर्चाही झाली, मात्र कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मात्र कळू शकले नाही.
कलंगुटचे आमदार मायकल लोबो हे आपले मित्र आहेत. त्यांना मांद्रे मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी स्वतः निवडणूक लढवून लोकमत आजमावून घ्यावे, असे आवाहन मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केले.
आरोलकर पुढे म्हणाले की, लोकशाही सर्वांना निवडणूक लढवण्याचा हक्क देते. त्यामुळे कोणीही निवडणूक लढवू शकतो. कुणी कुणाला अडवू शकत नाही. इच्छा असेल त्या प्रत्येकाने आपली क्षमता तपासून घ्यावी.लोबो यांनीही स्वतः उभे राहून आपली क्षमता तपासून पहावी, असे ते म्हणाले. आरोलकर पुढे म्हणाले की, मांद्रे हा एक सर्वोत्कृष्ट मतदारसंघ आहे. त्यामुळे अनेकांची नजर या मतदारसंघावर असते. मात्र येथील जनता जो विकास करतो, त्यालाच संधी देते, असे म्हणाले.
तुयेचे पंच उदय मांद्रेकर यांनी या विषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना मांद्रेतील जनता स्वाभिमानी आहे. येथील लोक गरीब असतील परंतु ते लाचार नाहीत. परंतु लोबो यांनी जे वक्तव्य केले आहे, ते मांद्रेतील जनतेचा अवमान करणारे आहे, असे ते म्हणाले. लोगो यांना विकास करायचा असेल तर त्यांनी आपल्या मतदारसंघाचा करावा असा सल्लाही त्यांनी दिला.
तुयेचे पंच उदय मांद्रेकर यांनी या विषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना मांद्रेतील जनता स्वाभिमानी आहे. येथील लोक गरीब असतील परंतु ते लाचार नाहीत. परंतु लोबो यांनी जे वक्तव्य केले आहे, ते मांद्रेतील जनतेचा अवमान करणारे आहे, असे ते म्हणाले. लोगो यांना विकास करायचा असेल तर त्यांनी आपल्या मतदारसंघाचा करावा असा सल्लाही त्यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.