Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Political Satire: खरी कुजबूज! आता ‘आयआयटी’ कुठे?

Goa Political Satire Latest: टॅक्सी व्यावसायिकांनी डिजिटल मंचावर यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. नव्या वाहतूक समन्वय धोरणाचा तोच मुख्य गाभा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गिरीश राज्यात परततील?

काँग्रेस महासमितीचे कायम निमंत्रित असलेले गिरीश चोडणकर यांच्याकडे सध्या तामिळनाडू आणि पुडूचेरीचे कॉंग्रेस प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. या दोन्ही ठिकाणी विधानसभेची निवडणूक असल्याने त्यांच्या जबाबदारी निश्चितपणे वाढ झालेली आहे.

काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध पाहता ते ही जबाबदारी सोडून राज्यात परततील का हा प्रश्न आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची निवड झाली, तेव्हा चोडणकर यांनी खळखळ केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे चोडणकर विरुद्ध पाटकर असे जे चित्र निर्माण केले जाते, त्याचे नेमके कारण काय? असावे याचीही चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे. ∙∙∙

माविन यांचे पालुपद

टॅक्सी व्यावसायिकांनी डिजिटल मंचावर यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. नव्या वाहतूक समन्वय धोरणाचा तोच मुख्य गाभा आहे. ते धोरण सर्वांसाठी असले तरी टॅक्सी व्यावसायिकांच्या विरोधामुळे सरकारने ते लागू करणे पुढे ढकलले आहे.

गोवा माईल्सच्या कार्यक्रमात मंगळवारी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी टॅक्सी व्यावसायिकांना यापुढे डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, असे नमूद केले. सरकार हळूहळू ॲपवरील आधारित टॅक्सीसेवाची ही गोव्याची ओळख ठरवत आहे. गुदिन्हो यांनी तेच अधोरेखित करत पृष्टी केली आहे. ∙∙∙

झेडपींची संख्या वाढली का?

गोव्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी तयारी सुरू केली आहे. काहींनी तर आपल्या उमेदवारांची नावेही जाहीर केल्यात जमा आहे. पण मुद्दा तो नाही. काही पक्षांनी प्रत्यक्षात ‘त्या’ नावाचा मतदारसंघ नसतानाही नावेलीत-रुमडामळ नामक नवाच ‘झेडपी’ मतदारसंघ कसा काय तयार केला? अशी चर्चा दक्षिण गोव्यात सध्या सुरू आहे.

नावेलीत-दवर्ली हा झेडपी मतदारसंघ आहे, पण रुमडामळ हा नवा मतदारसंघ केव्हा निर्माण झाला? अशी चर्चा तेथे एका पक्षाने निवडणूक तयारीसाठी घेतलेल्या बैठकीनंतर सुरु झाली आहे. तेथील उमेदवाराचे नावही निश्चित केले गेल्याने तर या चर्चेला अधिक उधाण आले आहे. ∙∙∙

पेडण्यातील काँग्रेस कुठे?

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी व्यावसायिकांनी मोठे आंदोलन केले. आमदार विजय सरदेसाई आरजीचे मनोज परब आदी नेते तेथे पोहोचले. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला या आंदोलनाच्या निमित्ताने पेडण्यात पुन्हा जम बसवायला मोठी संधी होती मात्र ती त्यांनी हातची घालवल्याचे दिसते.

या आंदोलनात काँग्रेस कुठे आहे असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर नाही असेच येते. काँग्रेसचे नेते राज्यपातळीवर मोठी स्वप्ने पाहत आहेत. जनमानसात रुजविण्यासाठी अशी आंदोलने कारण ठरू शकतात हे मात्र त्यांच्या गावचेच नाही. मोपा आंदोलनाची संधी गमावल्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागणारच आहे, शी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ∙∙∙

काणकोणात इजिदोर सक्रिय

निवडणुका जवळ आल्‍या की सगळेच राजकीय नेते सक्रिय होतात. काणकोण मतदारसंघही त्‍याला अपवाद नाही. काणकोण मतदारसंघात आता माजी आमदार इजिदोर फर्नांडिस हे सक्रिय झाले आहेत आणि ते काणकोणात वेगवेगळ्‍या ठिकाणी दिसूही लागले आहेत. दुसऱ्या बाजूने कला आणि संस्‍कृती मंत्री रमेश तवडकर यांना अपशकून करण्‍यासाठी त्‍यांचे भाजप पक्षातीलच विरोधक असलेले गोविंद गावडे हेही काणकोणात सक्रिय झाले आहेत.

नवीन उटा संघटनेचे उद्‍घाटन काणकोणात आयोजित करून आणि त्‍या कार्यक्रमाला बऱ्यापैकी गर्दी जमवून गोविंदरावांनी काणकोणातही आपली वट आहे हे दाखवून दिले. यामुळे इजिदोर समर्थकांमध्‍ये म्‍हणे आणखीनच उत्‍साहाचे वारे संचारू लागले आहे. ∙∙∙

‘सोशल मीडिया एक्स्पोज’चा बाजार

सध्या बघावं तिकडे फक्त ‘व्हिडिओ एक्स्पोज!’ हा प्रकार सुरू आहे. प्रत्येक जण स्वतःला पत्रकार किंवा कार्यकर्ता समजून व्हिडिओ काढतात. काहीही झाले की लगेच कॅमेरा काढायचा, सरकारच्या धोरणांवर, स्थानिक समस्यांवर बोलून व्हिडिओ अपलोड करायचा.

आधी अधिकृत चॅनल असायचे, आता तर गल्लोगल्ली एक-एक चॅनल! प्रत्येकाचा एक ‘सोशल मीडिया एक्स्पोजर’ नावाचा वेगळा कार्यकर्ता तयार झाला आहे. जणू काही हीच लोकांची ‘नाराजी व्यक्त करण्याची नवी पद्धत’ आहे. पण यात गंमत बघा, व्हिडिओ टाकून ‘धमकी’ द्यायची की, ‘माझं ऐका नाही तर...’ आणि मग जर काम झालं नाही, तर याचिका दाखल करणारे फार कमी! दहा पैकी दोन जण फक्त खरंच कायदेशीर मार्गाने जातात.

बाकीचे केवळ ‘व्ह्यू’ आणि ‘पब्लिसिटी’ पुरतेच मर्यादित राहतात. लोकांना पण आता ‘सत्य’ कमी आणि ‘मसाला’ जास्त आवडायला लागलाय. जोपर्यंत एखादा व्हिडिओ ‘व्हायरल’ होत नाही, तोपर्यंत तो कोणाला ‘गंभीर’ वाटत नाही. आता तर सोशल मीडिया म्हणजे जणू काही ‘तातडीचा कोर्टाचा दरवाजा’ बनलाय अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

१०० जणांची हजेरी आवश्यक!

आज डॉ. फ्रान्सिस लुईस गोम्स यांच्या पुण्यतिथीनिमित्त मडगावच्या कोमुनिदाद इमारती जवळील त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सरकारी पातळीवर कार्यक्रम असून सुद्धा सहा सात मान्यवर, तीन चार पत्रकार, पाच सहा पोलिस सोडले तर इतर कोणीही नव्हते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सरकारी कार्यक्रमात आपल्याला बोलावता, कमीत कमी १०० जण तरी उपस्थित राहतील याची खबरदारी घ्या. जिल्हाधिकारी कचेरीतील कर्मचाऱ्यांना बोलवायला पाहिजे होते, असे ते म्हणाले. नंतर त्यांनी आपला मोर्चा नगराध्यक्षाकडे वळवला.

नगरपालिकेतील नगरसेवकांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तरी आमंत्रित करायला पाहिजे होते, असे ते म्हणाले. मडगाव येथील कार्यक्रम केवळ उपचार म्हणून आयोजित करण्यात आला असेच वाटले. त्या मानाने नावेलीतील कार्यक्रम नीट नेटका, विद्यार्थी, मान्यवर व स्थानिकांच्या उपस्थितीत झाला. तिथेही दिगंबर बाब उपस्थित होते. एवढी संख्या बघून ते सुखावले असतील.

प्रश्न विचाराल तर...

आता कुणालाही प्रश्न विचारला, तर थेट घरी ‘एफआयआर’ झाल्याचा संदेश येणार! अशी चर्चा सध्या थिवी मतदारसंघात चांगलीच सुरु आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना प्रश्न विचारणाऱ्या आरजी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल झाल्याच्या घटनेने हा एक संदेश तर सर्व ठिकाणी पसरला आहे.

आरजी कार्यकर्त्यांनी तर थेट आमदारांवरच असा आरोप केला आहे, की आम्ही शांत बसावे आणि आवाज उठवू नये म्हणूनच ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला राजकीय सुडाची किनार असल्याचे बोलले जात आहे. ‘प्रश्न विचारायचा अधिकार’ हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे; जर तोच हिरावला जात असेल, तर राजकारणाचा प्रवास हुकूमशाहीकडे सुरू आहे का? अशी चर्चा आता प्रत्येक चौकात ऐकू येत आहे. ∙∙∙

प्रवाशांचा गरबा

सध्या नवरात्रीचे दिवस आहेत. गरबा आणि दांडिया सगळीकडेच पहावयास मिळत आहे. असे असले तरी विमानतळावर कधी गरबा दिसेल याची कल्पना कोणीही केली नसेल. सुरत येथे जाणाऱ्या विमानाला उशीर झाला. यामुळे कंटाळलेल्या प्रवाशांनी अखेर विमानतळावरच गरबा खेळणे पसंत केले. ते एवढे तल्लीन होऊन गरबा खेळू लागले की विमान कर्मचाऱ्यांनाही त्या सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही. ∙∙∙

आता ‘आयआयटी’ कुठे?

कोडार येथील आयआयटीचा विषय आता संपल्यात जमा आहे. खुद्द या भागाचे आमदार तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी कोडार येथे जाऊन तेथील ग्रामस्थांसमोर आयआयटी प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर केल्याने आता यापुढे कोडार येथे आयआयटी प्रकल्प होणार नाही, अशी अटकळ ग्रामस्थांनी बांधली आहे.

खुद्द लोकप्रतिनिधीने कोडार येथे आयआयटी प्रकल्प होणार नाही, असे सांगितल्यामुळे कोडारचा आयआयटी विषय संपला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सरकारला आयआयटीसाठी जमीन शोधावी लागते, की फर्मागुढीतील जमिनीतच आयआयटी साकारली जाते, ते पहावे लागेल. नेमकी ‘आयआयटी’ कुठे स्थिरावरणार? हा एक प्रश्‍नच आहे. ∙∙∙

ईडीच्या कारवाईचे गूढ

ईडी छापा टाकते, पैसे जप्त करते, पण पुढे काय? त्यांचे काय झाले, हे कळायला मार्ग नाही! अशी चर्चा सध्या गोव्यात सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात गोव्यात ईडीने छापे टाकून कोट्यवधी रुपये जप्त केल्याच्या बातम्या आल्या. कारवाईचा हा धडाका सुरूच आहे, पण त्या कारवाईचा निकाल काय लागला? याचा अंतिम अहवाल, मात्र जनतेसमोर येत नाही.

ईडी केवळ पत्रकाद्वारे माहिती देते, पण पत्रकार परिषद घेत नाही. या कारणामुळे बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी ‘गुपित’ राहतात, अशी खंत आता लोक व्यक्त करत आहेत. निडर ईडीने ज्या धाडसाने छापे टाकले, त्याच धाडसाने ‘छापा ते कारवाई’ असा संपूर्ण प्रवास लोकांसमोर स्पष्टपणे मांडायला हवा, अशी चर्चा प्रत्येक जागी चालू आहे. ∙∙∙

क्‍लाफास भाजपाबरोबरच!

मागच्‍या विधानसभा निवडणुकीत कुंकळ्‍ळीतून पराभव स्‍वीकारावा लागल्‍यानंतर कुंकळ्‍ळीचे माजी आमदार क्‍लाफास डायस हे राजकीय क्षेत्रापासून स्‍वत:ला थोडे दूरच ठेवत होते. त्‍यांच्‍या या लोप्रोफाईल वागण्‍यामुळे काहीजणांनी ते भाजपला विटले आहेत, असा तर्क व्‍यक्‍त करण्‍यास सुरुवात केली होती. त्‍यातच ते आम आदमी पक्षाच्‍या कुंकळ्‍ळीतील कार्यकर्त्यांबरोबर जास्‍त दिसत असल्‍यामुळे ते ‘आप’मध्‍ये जाणार, अशी भविष्‍यवाणीही केली होती.

पण काल पारोड्यातील नवीन सरपंच निवडण्‍याच्‍यावेळी क्‍लाफास आपल्‍या पत्‍नीसह पंचायतीत उपस्‍थित होते आणि या दोन्‍ही दाम्‍पत्‍यानी आपल्‍या गळ्‍यात भाजपचा शेला परिधान केला होता. त्‍यामुळे अजूनही आम्‍ही भाजपातच हे त्‍यांनी आपल्‍या कृतीने स्‍पष्‍ट करुन दाखविले. ∙∙∙

तो काऊंटर माझा नव्हे!

मोपा येथील विमानतळावर वाद झाला की पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर चर्चेत येतात. टॅक्सी व्यावसायिक मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना भेटले तरी आर्लेकर यांचीच चर्चा होते. आता ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.

जेमीस हा खासगी टॅक्सी काऊंटर हा आमदारांचा असल्याची चर्चा पेडण्यात सुरु झाली आणि तो काऊंटर माझा नव्हे असे सांगण्याची वेळ आर्लेकर यांच्यावर आली. त्या काऊंटरवरून पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांच्याच टॅक्सी चालतात असे त्यांचे म्हणणे आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांची तुफान ‘फलंदाजी’

वेर्णातील क्रिकेट स्टेडियमच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज जोरदार ‘फटकेबाजी’ केली. ते म्हणाले, या स्टेडियमलाही विरोधकांनी विरोध केला होता. विरोधाची परंपरा सुरूच आहे. गोव्यातील गरज ओळखून स्टेडियमची खासगी पद्धतीने निर्मिती करणे सोपे नव्हते. कारण, कमला प्रसाद सारख्या क्रिकेटवेड्या माणसावर आणि मंत्री माविन यांच्यावरही यासंदर्भात जोरदार टीका झाली.

असे असतानाही कमलाप्रसाद यांनी जिद्दीने स्टेडियमचे स्वप्न साकारले. गोमंतकीय हे अनेक वर्षांपासून अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमच्या प्रतीक्षेत होते. या स्टेडियममुळे निश्चितच गोमंतकीयांना फायदा होणार आहे. त्यामुळे कमलाप्रसाद कौतुकास पात्र आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर देण्याची संधी सोडली नाही. ∙∙∙

काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद अमित पाटकर यांच्याकडे आल्यापासून ते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत, अशी चर्चा सुरूच आहे. कठीण काळात त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले आणि आपल्या परीने काँग्रेस पुढे नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असे काँग्रेसच्या एका गटाचे म्हणणे आहे.

विरोधी पक्षांची मोट काँग्रेसने बांधावी, अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे. त्या आघाडीवर पाटकर यांचे प्रयत्न अपुरे पडण्याचे दिसते. त्यामुळेच काही जणांनी गिरीश चोडणकर यांचे नाव असा समन्वय ठेवण्यासाठी पुढे आणले आहे. काही का असेना काँग्रेस आता स्वबळावर लढेल की नाही, याची शंका असतानाच सर्वसमावेशक नेतृत्वाची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळेच पाटकर की चोडणकर अशी चर्चा आहे. ∙∙∙

पोलिसांचे असली दर्शन

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी व्यावसायिकांनी आंदोलन केले आणि पोलिस दलाच्या सक्षम जवानांचे दर्शन सर्वांना घडले. पोलिस दलातील भरती ही वशिलेबाजीने होत असल्याची चर्चा गेली काही वर्षे सुरू आहे. पोलिस दलात असे वशिल्याचे तट्टू भरल्यावर काय होणार हे मोपावर दिसून आले.

पोलिसांनी लावलेले अडथळे आंदोलकांनी तर ओलांडलेच पण आंदोलकांचा पाठलाग करतानाही पोलिसांची मोठी दमछाक झाली. ते धापा टाकू लागले. अखेर आंदोलकांनीच समजून घेतल्याने पोलिसांनी आंदोलकांना विमानतळ कार्यालयाबाहेर अडवल्याचे चित्र निर्माण झाले. आंदोलकांनी आक्रमकपणा कायम ठेवला असता तर पोलिसांची झाकलेली मूठ उघडली गेली असती. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आमका नाका मोबईल टॉवर! सरकारी प्राथमिक शाळेजवळ टॉवर नकोच

Balli Sarpanch: पारोडानंतर बाळ्ळी पंचायतीवरही भाजपचे वर्चस्व, हर्षद परीट झाले सरपंच

राजस्थानी तरुणाला हडफडे येथे अज्ञाताकडून जबर मारहाण; गॅस सिलिंडर अफरातफरीचा केला होता आरोप

Dussehra 2025 Wishes In Marathi: आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेऊनी आली विजयादशमी...प्रियजनांना पाठवा दसऱ्याच्या मराठीतून शुभेच्छा

Viral Video: महिलेची हातचलाखी, ज्वेलरी शॉपमधून चोरी केला सोन्याचा महागडा नेकलेस, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT