Sunburn Festival 2022 : गोव्यातील वागातोर किनाऱ्यावर आयोजित सनबर्न फेस्टिव्हलसह नववर्ष पूर्वसंध्येसाठीच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा सज्ज आहे. रात्रीच्या संगीतरजनी, रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्जची विक्री तसेच ड्रग्ज सेवन केलेल्या संशयास्पद व्यक्तींची घटनास्थळीच तपासणीसाठी किनारपट्टी परिसरात फॉरेन्सिक लॅब व अंमलीपदार्थविरोधी पथके तैनात केली आहेत. पार्ट्यांचे आयोजन केलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट्सनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई होईल, असा इशारा उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिला आहे.
वागातोर येथे आज 27 डिसेंबर पासून राज्यातील सर्वात मोठा व बहुचर्चित सनबर्न महोत्सव प्रारंभ होत आहे. या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची वर्णी लावली असून त्यांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. तीन दिवस होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन ड्रग्ज प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्यात आली आहे. काही जण संगीतरजनी पार्ट्यांना ड्रग्जचे सेवन करून जातात. अशा लोकांवर संशय आल्यास त्यांची तेथेच फोरेन्सिक लॅब कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत तपासणी केली जाईल. त्यामुळे हे पथक सोबत तपासणी कीट घेऊन तयार असतील. या पार्ट्यांवेळी ड्रग्ज विक्रेत्यांवर पोलिसांची करडी नजर असेल.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न
किनारपट्टी परिसरातील कोंडी रोखण्यासाठी यावेळी वाहतूक पोलिस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. पार्किंग क्षेत्रातच वाहने उभे करण्याच्या सूचना देणारे फलक किनारपट्टी भागात जागोजागी लावण्यात आले आहेत. जंक्शनच्या ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात केले जाईल. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. प्रत्येक दिवशी वाहतुकीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आवश्यक वाटल्यास काही बदल वा सुधारणा केली होईल.
दोषींवर कठोर कारवाई
यापूर्वीच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मालक, संगीतरजनी पार्टी आयोजकांना सर्व नियम, सुरक्षिततेची खबरदारीबाबत सांगितले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही झुकते माप दिले जाणार नाही व राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे वाल्सन म्हणाले.
..तर लोकांनी तक्रार करावी
राज्यात 10 वाजल्यानंतर कर्कश आवाजाने संगीतरजनी पार्ट्या सुरू असल्यास लोकांनी क्रमांक 100 वा 112 वर संपर्क साधावा. पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच त्या त्या परिसरातील तैनात असलेले पोलिस पथक घटनास्थळी त्वरित दाखल होतील. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संगीत यंत्रसामग्री तसेच हॉटेल्स वा रेस्टॉरंट किंवा पार्टी आयोजकाविरुद्ध गुन्हा केला जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.