Goa Police Takes Action Against 4,160 People Violating Traffic Rules
पणजी: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करताना पोलिसांविरुद्ध होणारे लाचखोरीचे आरोप टाळण्यासाठी वाहतूक पोलिस विभागातर्फे ई-चलन पद्धत मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. आठवडाभरात वाहतूक पोलिसांनी ४१६० वाहन चालकांविरुद्ध ई-चलन द्वारे कारवाई केली आहे. राज्यातील १६ वाहतूक पोलिस कक्षात २७० उपकरणांचा ई-चलन स्वीकारण्यासाठी वापर केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) सतावणूक तसेच लाच घेतल्याच्या तक्रारी येत असल्याने तसेच काही दिवसांपूर्वी एका पोलिस स्थानकात दंडात्मक रक्कमेचा गैरव्यवहार झाल्याने त्यावर पारदर्शकता व रोख रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय खात्याच्या पोलिस प्रमुखांनी घेतला. वाहतूक पोलिसांना रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दंड देण्यासाठी उभे असताना ‘बॉडी कॅमेरा’ यापूर्वीच देण्यात आला आहे.
आता ई चलन सुविधा सुरू केल्यामुळे रोख पैशांचा व्यवहार बंद झाला आहे. दंडात्मक रक्कम ही क्रेडीट वा डेबिट कार्ड अथवा ऑनलाइन पेमेंटनेही (Payment) करता येते. जर एखाद्याकडे ही सुविधा नसल्यास त्याला ही दंडात्मक रक्कम ई चलनाद्वारे संबंधित वाहतूक पोलिस स्थानकात येऊन जमा करण्याची नोटीस बजावली जाते. ही नोटीसही आता ऑनलाइन त्याने उल्लंघन केलेल्या गुन्ह्यासह पाठविली जाते.
ही ई चलन सुविधा सुरू झाल्यानंतर एकाचवेळी काही उपकरणांचा वापर करताना अडचणी येऊ लागल्या होत्या. काहींमध्ये तांत्रिक बिघाडामुळे त्याची गती मंदावली होती. एनआयसीच्या संबंधित आयटी अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क साधून हा बिघाड सोडवण्यात आला आहे. दंडाची रोख रक्कम स्वीकारणे कायम बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ई चलन द्वारे दंड भरण्यासाठी ऑनलाइन सेवेची सुविधा नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे. त्यांना ज्याच्याकडे ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे त्यांची मदत घ्यावी लागत आहे.
या ऑनलाइन सेवेमुळे एखाद्या वाहनाला कितीवेळा कोणत्या विविध नियमाच्या उल्लंघनासाठी कारवाई झाली आहे याचीही माहिती त्वरित मिळत आहे. सॉफ्टवेअर अपग्रेड करून वारंवार नियम उल्लंघन करणाऱ्यांविरुद्धही यापुढे कठोर कारवाईसंदर्भात विचार करण्यात येईल. सध्या वाहतूक पोलिस विभागाकडे ई -चनलची ३५० उपकरणे असून त्यापैकी आता सध्या २७० चा वापर केला जात आहे असे अधिकाऱ्याने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.