वाळपई: गोवा पोलिस दलातील सर्व अधिकाऱ्यांना वाहतूक, किनारी सुरक्षा आणि गुप्तचर विभागांसह विविध क्षेत्रांमध्ये रोटेशनल पद्धतीने प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्रेरणा मैदानावर आयोजिलेल्या ४९ व्या बॅचच्या पोलिस भरती प्रशिक्षणार्थींच्या ‘पासिंग आऊट परेड’ समारंभात त्यांनी ही घोषणा केली. भरती केलेल्या नव्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस कॉन्स्टेबल, एएसआय वायरलेस ऑपरेटर, पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, अस्थिर ड्रायव्हर आणि एक्साईज कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की पोलिस दलात पारदर्शकता आणि व्यावसायिकता आणण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दरवर्षी वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव घ्यावा.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले की, सरकार पोलिस दलातील गैरवर्तन सहन करणार नाही. यापूर्वी अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर गैरवर्तन केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अशा कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या वर्तणुकीवर कठोर कारवाई केली जाईल.
‘पासिंग आऊट परेड’मध्ये मुख्यमंत्र्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पारितोषिके प्रदान केली. यावेळी डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. पोलिस दलात शिस्तबद्धता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असून, ‘रोटेशनल’ प्रशिक्षण आणि कठोर शिस्तीमुळे पोलिस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.